दीपावलीच्या कोरडय़ा शुभेच्छा.. व्याजदरात सवलतीची भेट नव्या वर्षांतच! Print

‘सीआरआर’मध्ये अवघी पाव टक्क्यांनी घट
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

तूर्तास दीपावलीच्या कोरडय़ा शुभेच्छा, डिसेंबपर्यंत महागाईचा पारा उतरलाच आणि वित्तीय तसेच परराष्ट्र व्यापारातील दुहेरी तूट आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसल्यास कदाचित मोठय़ा व्याजदर कपातीची भेट नव्या २०१३ वर्षांतची दिली जाईल, असे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मंगळवारी स्पष्ट केले. खुंटलेल्या आर्थिक विकासापेक्षा वाढती महागाई हा चिंतेचा विषय असल्याचे पालुपद कायम ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर कपातीच्या सार्वत्रिक अपेक्षांवर पुन्हा पाणी फेरल्याचे दिसून आले.


रिझव्‍‌र्ह बँकेने छोटय़ा-मोठय़ा कर्जदारांना थेट दिलासा मिळेल अशा प्रमुख धोरण-दरांमध्ये म्हणजे रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल न करता ते अनुक्रमे ८ टक्के व ७ टक्के दरावर कायम ठेवले आहेत. त्याचबरोबर बँक दरही ९

टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जावरील मासिक परतफेडीचा हप्ता कमी होईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा दिवाळीच्या तोंडावर तरी पूर्ण होणे दुरापास्त आहे. येत्या ३ नोव्हेंबरपासून रोख राखीव प्रमाण (सीआरआर) म्हणजे वाणिज्य बँकांना आपल्या ठेवीतील हिस्सा रिझव्‍‌र्ह बँकेकडून राखून ठेवावयाच्या निधीत पाव टक्क्याने कपात करून मध्यवर्ती बँकेने सणासुदीच्या दिवसात कर्जवितरणासाठी बँकांसाठी निधी खुला करून दिला आहे. पाव टक्के सीआरआर कपातीतून १७,५०० कोटींची अतिरिक्त रक्कम बँकांना परत कर्जवाटपासाठी मिळणार आहे. परंतु बँकांच्या कर्ज पुर्नबांधणीसाठीची तरतूद २ टक्क्यांवरून २.७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याने, बँकांसाठी खुला झालेला हा निधी या तरतुदीपोटीच वळता होण्याची शक्यता दिसत आहे.     
भविष्याबाबत आशावाद
विकासापेक्षा महागाईला आजवर सतत प्राधान्य देणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने महागाईबाबत आपला समाधान-स्तर काहीसा उंचावला आहे. मार्च २०१३ अखेर ७.५ टक्क्यांचा महागाई दर तिने अंदाजला आहे. यापूर्वी जुलैमध्ये जाहीर केलेल्या पतधोरणात ७ टक्क्यांच्या महागाई दराची शक्यता तिने वर्तविली होती. महागाई दर डिसेंबर २०१२ पर्यंत वरच्या पातळीवर असेल; त्यानंतर चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत तो कमी होईल, असा विश्वास सुब्बराव यांनी व्यक्त केला.  त्यामुळे  चौथ्या तिमाहीत नरमाईचे धोरण स्वीकारले जाऊ शकेल, असा भविष्याबाबत आशावादही त्यांनी जागवला.