आशिषकुमार चौहान बीएसईचे सीईओ Print

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) हंगामी जबाबदारी हाताळणारे आशिषकुमार चौहान यांची अखेर व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. २००९ मध्ये ते मुंबई शेअर बाजारात उप मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झाले. तत्पूर्वी ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मुख्य माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. १३३ वर्षांच्या देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अध्यक्ष मधू कन्नन हे मे २०१२ मध्ये टाटा समूहात दाखल होण्याच्या घोषणेनंतर चौहान यांच्याकडे हंगामी म्हणून या पदाची जबाबदारी होती. मुंबई शेअर बाजाराच्या संचालक मंडळाने अखेर चौहान यांची या पदावर पूर्णवेळ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. कार्यकारी संशोधन संस्थेच्या सहकार्याने निवड समितीने केलेल्या शिफारशींवर ही नियुक्ती करण्यात आल्याचे बाजाराने म्हटले आहे.