गल्लीतील किराणा व्यापाऱ्याद्वारे चाकरमानी गावी पैसे पाठवू शकेल! Print

पोस्टाच्या मनी ऑर्डरपेक्षा स्वस्त आणि सर्वसमावेशक निधी हस्तांतरण सेवा
व्यापार प्रतिनिधी
मुंबई
देशभरातून कामधंद्यानिमित्त मुंबईत दाखल झालेले लक्षावधी स्थलांतरीत मजूर असो अथवा आपला पारंपरिक चाकरमनी, गावाकडे सोडून आलेल्या आपल्या स्वकियांना महिन्याकाठी पगारातून वाचलेले पैसे पाठविणे त्यांना आता खूपच सोयीचे बनले आहे. उल्लेखनीय म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती अध्यक्षपदी असलेल्या ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’च्या पुढाकाराने शक्य बनलेल्या मोबाईल निधी हस्तांतरणाची ही सेवा प्रत्यक्षात सुरू करण्यात येस बँक, अ‍ॅक्सिस बँक या नव्या पिढीच्या खासगी बँकांनी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रीयीकृत पंजाब नॅशनल बँकेने शुक्रवारी या सुविधेचे अनावरण केले.
शहरातून पैसे पाठविणाऱ्याचे बँकेत खाते असले वा नसले तरी चालेल, त्याला बँकेची पायरी चढावी न लागता नजीकच्या किराणा व्यापाऱ्यामार्फत पैसे इच्छित ठिकाणी सुरक्षितपणे आणि तेही पोस्टाच्या मनीऑर्डरच्या तुलनेत किफायती आणि शीघ्र स्वरूपात पोहचतील, अशी सोय ‘येस बँके’ने आपल्या ‘कॅश टू अकाऊंट’ या नव्या देशांतर्गत निधी हस्तांतरण सुविधेद्वारे शक्य केली आहे. मोबाईल फोनच्या वापरातील सध्याचे सार्वत्रिकीकरण पाहता, ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’ने प्रस्तुत केलेल्या ‘इंटरबँक मोबाईल पेमेंट सव्‍‌र्हिस’ अर्थात ‘इम्प्स’च्या मंचावरून अशी सुविधा देणे बँकांना आता शक्य झाले आहे, असे या सुविधेसंबंधी बोलताना येस बँकेचे प्रमुख नाविन्यता अधिकारी आनंद कुमार बजाज यांनी सांगितले.
देशभरातून वेगवेगळ्या शहरांमध्ये कामधंद्यांनिमित्त स्थलांतरण केलेल्यांची संख्या प्रचंड मोठी असून, त्यांच्याकडून दरसाल तब्बल ४०,००० कोटी रुपयांची रक्कम स्वकीयांना पाठविली जात असते, असे ताज्या पाहणीद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा सोयीस्कर निधी हस्तांतरण सेवेचे आत्यंतिक गरज होती आणि या क्षेत्रात आणखी बरेच काही करण्यासाठी ही मोठा वाव आहे. हे पाहता लवकरच अन्य बँकांकडून या धर्तीच्या सेवेचे अनुकरण केले जाण्याची शक्यता आहे.
येस बँकेने गेल्या वर्षी म्हणजे जून २०११ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या सेवेने सध्या खूपच उमदे रूप धारण केले असल्याचे बजाज यांनी स्पष्ट केले. या सेवेचा सोयीस्कर गुण असा की, ती दिवसभरात कोणत्याही वेळी आणि वर्षांचे ३६५ दिवस केव्हाही उपभोगता येईल. येस बँकेकडील निम्म्याहून अधिक उलाढाली या संध्याकाळी उशिराने झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आजकाल किराणा दुकाने आणि पानाच्या ठेल्यावर उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन, सुविधा, इट्झ कॅश, इझी बिल आणि या धर्तीच्या ‘इलेक्ट्रॉनिक पेमेंट’समर्थ सेवादालनात जाऊन गावाकडच्या इच्छित बँक खात्यात पैसा विनाविलंब धाडता येईल. पैसा पाठविणाऱ्याकडे मोबाईल फोन आणि स्वीकारणाऱ्याकडे कोणत्याही बँकेत बचत खाते असणे केवळ आवश्यक ठरेल.
मूळात बँकिंग सेवेपासून वंचित असलेल्या समाजघटकांच्या वित्तीय सर्वसमावेशकतेचा एक पैलू या सेवेला असण्याबरोबरच, बँकांसाठी चांगले महसुली उत्पन्नही या सेवेतून मिळण्याची चिन्हे आहेत. आनंद कुमार बजाज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दरमहा लाखभर उलाढाली या सुविधेमार्फत होऊ लागल्या असून, वर्षभरात जवळपास ५१० कोटी रुपयांचा निधी हस्तांतरीत केला गेला आहे. देशभरातील अन्य बँकांच्या १६,४८० शाखांमधील खात्यांमध्ये हा निधी येस बँकेच्या या सुविधेमार्फत पोहचविला गेला आहे. पैसा गोळा करणारी सध्या देशभरातील १४६ शहरात इलेक्ट्रॉनिक पेमेंटसमर्थ दालनांची संख्या १२,०००च्या आसपास आहे. येत्या काळात अशा दालनांची संख्याही ५०,००० वर नेण्याचे नियोजन असल्याचे बजाज यांनी सांगितले.
चालू आर्थिक वर्षांच्या अखेपर्यंत ‘कॅश टू अकाऊंट’ सुविधेतून ३० लाख उलाढाली आणि १५०० कोटी रुपयांचे हस्तांतरण येस बँकेने अपेक्षिले आहे.    

‘पीएनबी’चे एक पाऊल पुढे
पंजाब नॅशनल बँकेने देशांतर्गत निधी हस्तांतरणाच्या या सेवेत एक पाऊल पुढे टाकताना, ‘एक्स्प्रेस मनी’बरोबर सामंजस्य करीत ‘पीएनबी एक्स्प्रेस मनी रेमिट कार्ड’ हे बहुपयोगी उत्पादन दाखल केले आहे. हे प्रीपेड कार्ड असून, कार्डद्वारे बँकेत खाते नसतानाही नियमित बचतीची सवय स्थलांतरीतांमध्ये निर्माण होण्याबरोबरच, गरज पडेल तेव्हा त्याचा वापर गावाकडे निधी हस्तांतरणासाठीही करता येईल, असे याचे दुहेरी फायदे आहेत. हे कार्ड नि:शुल्क व कोणत्याही वार्षिक शुल्काविना वापरता येईल. तसेच अन्य डेबिट कार्डाप्रमाणे आवश्यक चीजवस्तूंची खरेदीसाठी तसेच एटीएममधून रोख काढून घेण्यासाठीही केला जाऊ शकेल.