‘सेन्सेक्स’ आठवडय़ाच्या उच्चांकी टप्प्यावर; ‘निफ्टी’ ५,७०० नजीक Print

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी जवळपास २०० अंशांची भर घातली. जागतिक शेअर बाजारातील तेजीच्या जोरावर १८,७५५ च्या पुढे गेलेला ‘सेन्सेक्स’ आता आठवडय़ाच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ही आठवडाअखेर ५२.६५ अंश वधारणेमुळे ५,६९७.७० पर्यंत पोहोचला आहे. या आठवडय़ात ‘सेन्सेक्स’मध्ये दुसऱ्यांदा २०० अंशांची वाढ नोंदली गेली. तर ‘निफ्टी’ पुन्हा त्याचा ५,७०० चा स्तर गाठू पाहत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सकारात्मक आकडे जाहीर झाल्यानंतर एकूण जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारातील तेजीही आगेकूच करीत आहे.
याच आठवडय़ात २०० अंशांची भर घालणारा सेन्सेक्स कालही १३० अंशांनी वधारला होता. शेअर बाजारात आज बँक, वाहनसह भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांचेही समभाग वधारले होते. प्रमुख ३० पैकी तब्बल २६ समभागांचे मूल्य वधारले होते. यामध्ये गेल, बजाज ऑटो, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश होता. गेल्या काही दिवसात १८,५०० च्या पुढे राहणारा ‘सेन्सेक्स’ आजच्या वधारणेमुळे २५ ऑक्टोबरच्या १८,७५८.६३ या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. निर्देशांकातील आजची वाढ ही एक टक्क्यापेक्षा अधिक होती. तर निफ्टीनेही आजच्या अर्धशतकी वाढीमुळे ५,७०० नजीकचा पल्ला गाठला आहे.