मार्केट मंत्र : चोखंदळ खरेदी ठरेल लाभकारक! Print

निमिष शाह
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शेअर बाजारातील व्यवहारात देशातील सर्वात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)ने जगात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजेस (डब्ल्यूएफई)’ने दिलेल्या माहितीप्रमाणे, सरलेल्या सप्टेंबर महिन्यात इक्विटीमध्ये जगात सर्वाधिक उलाढाली ‘एनएसई’वर झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कोरिया आणि न्यूयॉर्क आहेत. आपल्या बाजाराच्या मुख्य चालकशक्ती या विदेशी संस्थागत गुंतवणूकदार संस्था आहेत हे सर्वश्रुतच आहे आणि उत्तरोत्तर त्यांना भारतीय बाजारात गुंतवणुकीशिवाय फारसे अन्य पर्याय सध्या दिसून येत नाहीत, इतकाच याचा याचा भारतातील गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयाचा अर्थ आहे. परंतु यातून हुरळून जाण्याचे कारणही नाही. अन्यथा दिवाळी नजीक येऊन ठेपली असतानाही बाजाराचा नेमका कल काय, हे अद्याप पुरते स्पष्ट झालेले नाही. कारण एक दिवस निर्देशांक वधारतो, तर दुसऱ्या दिवशी तो आपटलेला दिसतो. छोटय़ा गुंतवणूकदारांसाठी ही अनिश्चितता फारशी मानवणारी आणि पेलवणारीही नसते.
सध्याच्या सणासुदीने उत्साही सूर मारला असल्याचे बाजाराकडे पाहून तरी वाटत नाही. त्याची चाहूल देणारी कामगिरी मात्र काही क्षेत्रांमधून जरूर दिसत आहे. सणांच्या दिवसात नवनवीन मॉडेल्स आणि अनेकानेक आकर्षक सवलती बाजारात आणल्याचा वाहन उद्योगाला फायदा होताना दिसत आहे. ऑक्टोबरमधील प्रमुख कारनिर्मात्यांच्या वाढलेल्या विक्रीने ते स्पष्ट केले आहे. सध्या मुंबईत एकामागोमाग एक सुरू असलेल्या गृहप्रदर्शन आणि त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाला पाहून, गृहनिर्माण क्षेत्रानेही उभारी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेतील या महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांनी गेल्या काही महिन्यांमध्ये विलक्षण मरगळ दाखविली होती आणि आता त्यांनी कलाटणी घेतली असल्याचे बाजारात ऑटो आणि रियाल्टी कंपन्यांच्या समभागांमध्ये भावातील चांगली हालचाल पाहूनही जाणून येत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सरलेल्या मंगळवारी जशी अपेक्षा केली जात होती, त्याप्रमाणे रेपो दर कमी केले असते तर बाजारात त्याचे पडसाद म्हणून दिवाळीची आतषबाजी पंधरवडय़ापूर्वीच नक्कीच पाहायला मिळाली असती. त्याऐवजी केवळ सीआरआरमध्ये पाव टक्क्यांची घट केली गेल्याने बँकांचे शेअर्सना झपाटय़ाने भाव-उतार लागल्याचे दिसून आले. पण बाजारातील प्रत्येक घसरण ही दीघरेद्देशी गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी असते, याचा प्रत्यय मंगळवारनंतर बाजाराने पुन्हा वरच्या दिशेने धरलेला फेर पाहून नेमका आलेला आहे.
बाजाराचा नेमका कल आगामी काळात कसा असेल, याचा काहीही नेम नाही. पण मोठय़ा घसरणीची शक्यताही दिसून येत नाही. त्यामुळे निर्देशांकाचा हालहवाल लक्षात न घेता, चांगली आर्थिक कामगिरी असलेल्या समभागांमध्ये ‘स्टॉक स्पेसिफिक’ दृष्टीकोन ठेवून छोटय़ा स्वरूपात गुंतवणूक करीत राहणे हे धोरण उपयुक्त ठरेल. नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही निकालांवरून हे गुंतवणूकयोग्य शेअर्स कोणते याची तड लावणे फारसे कठीणही नाही. एचडीएफसी बँक, लार्सन, युनायटेड स्पिरिट्स, येस बँक, कोलगेट हे शेअर्स नवनवीन उच्चांक बनवीत आहे आणि ते अनाठायीही नाही ते यासाठीच! बाजाराचा दीर्घकालीन ट्रेंड तेजीचा आहे हा आशावाद बाळगून आता केली जाणारी चोखंदळ खरेदी नक्कीच चांगला लाभ मिळवून देणारी ठरेल.