दिवाळीमुळे व्यवसायात २५ टक्के वाढ अपेक्षित Print

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वाढीव विक्रीची आशा

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सणांच्या मोसमाने भारतीय बाजारपेठेच्या दृष्टिने अद्याप वेग घेतला नसला तरी यंदाच्या दिवाळी निमित्ताने होणारी ग्राहकोपयोगी वस्तूंची वाढीव खरेदी कंपनीच्या या व्यवसायात २० ते २५ टक्क्यांची भर घालेल, असा विश्वास विप्रोच्या विद्युत दिवे, साबण आदीच्या निर्मितीची जबाबदारी हाताळणारे अनिल चुग यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केला.

विप्रो ग्राहकोपयोगी वस्तू व विद्युत उपकरणे विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल चुग यांनी सांगितले की, महाराष्ट्रात क्रमांक एकचा ब्रॅण्ड ठरणाऱ्या संतूर साबणाने दुसऱ्या तिमाहीत २१ टक्के वाढ नोंदविली आहे. तर अरेना साबण, यार्डले फेसवॉश या उत्पादनांनीही २८ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या वाढीची कामगिरी बजाविली आहे.
विप्रोच्या याच व्यवसायात समाविष्ट होत असलेल्या फर्निचर निर्मिती उद्योगही सध्या आघाडीच्या तीन कंपन्यांमध्ये असून लवकरच तो क्रमांक एकचे स्थान प्राप्त करेल, असेही ते म्हणाले. दक्षिण-पश्चिम भारतात १४ टक्के बाजारहिस्सा राखणारा संतूर साबण महाराष्ट्रात क्रमांक एकवर तर शेजारच्या गुजरात राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
विप्रो समूहाच्या विद्युत उपकरण विभागाने गेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत महसुलातील वाढ २६ टक्के तर नफ्यातील वाढ २९ टक्के राखली आहे.