विप्रोच्या महसुलात किरकोळ वाढ Print

पीटीआय
बंगळुरु

देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या विप्रो कंपनीला माहिती तंत्रज्ञान व्यवसायाच्या माध्यमातून यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत मिळालेला महसूल किरकोळ वधारला असून कंपनीने आगामी तिमाहीत मात्र ८४२७ कोटी रुपये महसुलाचा विश्वास व्यक्त केला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या विप्रो समूहाने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत २४ टक्क्यांची नफ्यातील वाढ नोंदविली असून जुलै ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत कंपनीला झालेला निव्वळ नफा १,६१०.६० कोटी रुपये आहे. या दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न १०,६०० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यातही वर्षभराच्या तुलनेत १७.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीत २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याने आयटी कंपनीतील मनुष्यबळ ३० सप्टेंबरअखेर १.४० लाख झाले आहे.
समूहातील ९० टक्क्यांपर्यंतचा महसुल माहिती तंत्रज्ञान व्यवसायातून येत असताना विप्रोच्या या व्यवसायातील महसुल मात्र अवघ्या १.७ टक्क्यांनी वधारला आहे. तो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ४.६ टक्क्यांनी वाढला होता. जुलै ते सप्टेंबर दरम्यान कंपनीचा महसुल ८१६२ कोटी रुपये झाला आहे. समूहातील हा व्यवसाय मात्र नव्या तिमाहीत ८,२६८ ते ८४२७ कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
विप्रो समूहातील बिगर माहिती तंत्रज्ञान व्यवसाय ‘विप्रो एन्टरप्राईजेस’च्या अंतर्गत एकत्र करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराला दिली होती. याअंतर्गत कंपनीचा ग्राहकोपयोगी वस्तू व विद्युत दिवे निर्मिती (फर्निचर निर्मितीसह), पायाभूत अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील उत्पादन व्यवसाय एकत्र करण्यात येत आहे.    

राजकारण आणि कॉर्पोरेट यांच्या हितसंबंधांबाबत सध्या जे आरोप म्हणा किंवा घडामोडी, त्या सध्या जोरात सुरू आहेत. मी एवढेच म्हणेन की, या बाबी काही चांगल्या नाहीत. अर्थव्यवस्था तसेच एकूण देशासाठीही. गेल्या एक-दोन वर्षांत अशा घटनांमध्ये केवळ लक्षणीय वाढच झाली नाही तर त्या दिवसेंदिवस अधिक सुमार होत चालल्या आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्रासह राजकारण्यांवर आरोप करणारे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे केजरीवाल हे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर सहज उडय़ा मारतात. आणि प्रसारमाध्यमेही त्यांना सहकार्य करतात. ते (केजरीवाल) भ्रष्टाचार उघड करण्याच्या माध्यमातून एका विषयावरून अचानक दुसरीकडे वळतात; आणि प्रसारमाध्यमेही तिच री ओढतात. खरे तर प्रसारमाध्यमे देशाच्या विकासात अधिक हातभार लावू शकतात. सद्यस्थितीत त्यावर अधिक लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे.
अझीम प्रेमजी, अध्यक्ष, विप्रो.

विप्रोच्या निकालाने मुंबई शेअर बाजारासह एकूणच माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाला आज उंचावले होते. यामध्ये विप्रोसह (०.९८%) टीसीएस, इन्फोसिसचेही समभाग मूल्य वधारले. विप्रोचा समभाग दिवसभरात कालच्याच प्रमाणे ३ टक्क्यांपर्यंत वधारला होता. दिवसअखेर मात्र त्याला ३६४.९५ रुपयांचा भाव मिळाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारावर तो ०.३३% वधारणेसह ३६२.४५ रुपयांवर स्थिरावला.