मुहूर्ताचे सौदे यंदा सव्वा तासाचे Print

मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने होणारे भांडवली बाजारातील मुहूर्ताचे सौदे यंदा तब्बल सव्वा तासांपर्यंत विस्तारले आहेत. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात मंगळवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी ३.४५ ते ५ वाजेपर्यंत संवत २०६९ च्या स्वागताचे व्यवहार होतील. तर वायदे बाजारांमध्ये मुहूर्ताचे सौदे सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत होतील.
आर्थिक सुब्बतेचे प्रतीक असलेल्या भांडवली बाजारात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समभागांची विशेष खरेदी अथवा अनेकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी मुहूर्ताच्या सौद्यांना गुंतवणूकदारांमध्ये महत्त्व आहे. शेअर बाजारात यापूर्वी ४५ मिनिटांपर्यंत मुहूर्ताचे सौदे होत असत, यंदा ते दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५ पर्यंत असे सव्वा तास चालतील. गेल्या वर्षी सायंकाळी ४.४५ ते ८ पर्यंत व्यवहार झाले होते. राष्ट्रीय शेअर बाजारात दुपारी ३.४५ ते सायंकाळी ४.३० पर्यंत व्यवहार होणार आहेत.
देशातील एमसीएक्स, एनसीडीईएक्स, एनएमसीई, एस आणि आयसीईएक्स या पाचही कमॉडिटी वायदे बाजारातही यंदा २.३० तासांचे मुहूर्ताचे सौदे होतील. सोने, चांदी, पोलाद, कच्चे तेल, पॉलिमर आदींच्या करारांचे येथे व्यवहार होतील.