अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९४. संस्कार Print

चैतन्य प्रेम, शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२
भगवंतकेंद्रित जगणारा जो कुणी आहे त्याचा प्रभाव भोवतालच्या लोकांवर पडल्याशिवाय रहात नाही. अट एकच तो भक्त निव्वळ भगवंतकेंद्रित असला पाहिजे! मोठी साधनपरंपरा असलेल्या एका घरात महाराजांचा एक मठ आहे. महाराजांच्या पादुका असलेल्या मोठय़ा सभागृहाला लागून त्या साधकांच्या घराची खोली आहे.

पादुकांच्या दर्शनाला लोकांची गर्दी असते. काहीजण पादुकांसमोर पैसेही ठेवतात. एका माणसाच्या असं लक्षात आलं की एक म्हातारपणाकडे झुकत असलेले गृहस्थ रोज दर्शनाला म्हणून येतात आणि पादुकांजवळचे थोडे पैसे उचलतात. त्यानं ज्याच्या घरी मठ होता त्या श्रेष्ठ साधकाला ही गोष्ट सांगितली. ते काही बोलले नाहीत. दोन-चार दिवस तो गृहस्थ आल्यावर मात्र ते त्याला कळणार नाही, अशा रीतीने त्याच्या हालचाली पाहू लागले. त्या दोन्ही-तिन्ही दिवस त्यांनी पाहिले की त्या गृहस्थानं पैसे उचललेत. एक दिवस गर्दी अगदी तुरळक असताना हा प्रकार घडल्यानंतर या साधकानं त्या माणसाला थोडं आदरानंच हाक मारली आणि आपल्या खोलीत बोलावलं. ‘बाबा गेले काही दिवस मी पहात आहे की तुम्ही पादुकांजवळचे पैसे उचलता, असं का करता?’ त्यांनी मोठय़ा प्रेमानं प्रश्न केला. तो प्रश्न ऐकताच त्या बाबांना रडू कोसळलं. ते म्हणाले, ‘‘माझी चूक झाली. पण काय करू? मला चहा फार आवडतो. घरी कुणी मला चहा पिऊ देत नाही. मागितला तर उलटसुलट बोलतात. म्हणून चहापुरते पाच रुपये मी उचलतो..’’ दुसरं कुणी कशाला, आपणच त्या साधकाच्या जागी असतो तर काय केलं असतं, याची कल्पना करून पाहा. आपण सहज म्हंटलं असतं, हे पहा ते चहा-बिहा तुमचं तुम्ही पहा. इथे आमच्या पैशाला हात लावायचा नाही.. पण ते साधक मोठय़ा प्रेमानं म्हणाले, ‘बाबा हे महाराजांचं घर तुमचंच आहे. रोज दर्शनाला या आणि जाताना इथे न चुकता चहा पिऊन जा!’ त्या दिवसापासून तो माणूस त्या घराचाच झाला. असं असतं भगवंतकेंद्रित जगणं. स्वार्थ आणि निव्वळ स्वार्थानं भरलेल्या आणि भारलेल्या आपल्यालादेखील असं निस्वार्थ जगणं हलवून टाकतं. एक थोर सिद्धपुरुष निवर्तले. त्यांच्या घरी समाचाराला म्हणून जायची पाळी पंचविशीतील एका तरुणावर आली. तो त्यांच्या घरी गेला तेव्हा लोकांची गर्दी  फार होती. तो अवघडून एका कोपऱ्यात बसला असताना त्या सिद्धपुरुषाच्या वृद्ध पत्नीनं त्याला जवळ बोलावलं. काय बोलावं, हे त्या तरुणाला सुचेना तेव्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्या म्हणाल्या, ‘‘बाळ, राम ठेवील तसे राहावे, असे एरवी म्हणायचे आणि प्रसंग आला की आपणच ते विसरायचे का?’’ हे दोन्ही प्रसंग अगदी सत्य आहेत. खूप काही शिकवणारे आहेत. पहिल्या प्रसंगातील ज्येष्ठ साधक म्हणजे मालाडचे दिनूमामा केतकर आणि दुसऱ्या प्रसंगातील सिद्धपुरुष म्हणजे तात्यासाहेब केतकर आणि त्यांच्या पत्नी ताई..