अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९८. इशारा Print

 

बुधवार, १२ सप्टेंबर २०१२
आदि शंकराचार्य सांगतात, ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम्। पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति:।।’ याचा सरळ अर्थ असा की अर्थ हाच अनर्थाचं कारण आहे, हे नित्य लक्षात ठेव. त्यात लेशमात्रही सुख नाही. धनाढय़ाला पुत्राकडूनही भीती असते हे जगात दिसतंच. आता हा श्लोकाचा वरकरणी यथायोग्य असा अर्थ झाला.

आता या श्लोकाचा आध्यात्मिक पातळीवरचा आणि साधकाला बोधकारक असा दुसरा अर्थ काय? या श्लोकातला ‘अर्थ’ म्हणजे पैसा आहेच पण त्यापुढेही जे काही मी कमावलं आहे त्याचा साठा हा देखील ‘अर्थ’ आहे. आता साधक काय कमावणार? त्याचा साठा असतो तो आध्यात्मिक, साधनेचा, तपस्येचा. त्यातून अनर्थ कसा काय होणार? तर मनात दुनियादारीचा सूक्ष्मसा तंतू जरी उरला असेल, दुनियेच्या मोहाचा सूक्ष्मसा तंतू जरी उरला असेल तरी उपासनेचं जे संचित आहे, आध्यात्मिक प्रगतीची जी मिळकत आहे ती अनर्थ घडवू शकते, असा इशारा यात आहे! तेव्हा माझ्या आध्यात्मिक प्रगतीतून मनात सात्त्विक अहंकार निर्माण होत नाही ना, याबाबत मी दक्ष राहणं आणि त्या उपासनेचं अवडंबर माजविण्याच्या मोहापासून कटाक्षानं स्वतला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम्’ ही जाण पक्की करणं आहे. आपण धड साधकसुद्धा परिपूर्णपणे झालो नसताना स्वतला कुणीतरी झाल्यासारखं मानू लागतो, ही गोष्ट मोठी धोक्याची असते. श्रीसद्गुरू एकदा म्हणाले, ‘निंदेचा चिखल कुणालाच आवडत नाही पण स्तुतीचा चिखल आवडतो. शेवटी चिखलच. तो रुतवल्याशिवाय कसा राहील?’ साधकालाही कुणी त्याची निंदा केली तर आवडत नाही पण त्याची थोडी स्तुती कुणी केली तर मनाला किती आनंद होतो! पण त्या स्तुतीचा चिखलच अनर्थाला कारणीभूत होतो. धड साधनेत आपण स्थिर झालो नसताना अध्यात्मप्रसाराचा वसा आपल्या शिरी घेऊन काहीबाही करू लागतो आणि हळुहळू दुनियादारीच्या जाळ्यात अलगद अडकूही शकतो. आता असा साधकदेखील एकवेळ जगापासून अलिप्त राहील पण ‘पुत्रादपि धनभाजां भीति’ आहेच! आपला आध्यात्मिक वारसा हा आपल्या मुलानं किंवा आपल्या परिवारातील कुणीतरी पुढे चालवावा, या ‘पुत्रमोहा’त अडकण्याचीही भीती उरतेच! किंवा लोकेषणेत अडकून ‘स्वयंसिद्ध’ झालेल्या साधकाच्या आजूबाजूच्या वा परिवारातल्यांच्या मनातही तो वारसा आपल्याकडे यावा, अशी इच्छा वास करू लागते, हे जगभर दिसतं, असंही आचार्य सांगतात. तेव्हा वाचन, मनन, चिंतन, सत्संग, नामस्मरण या टप्प्याने उपासनेचा मार्ग विशद करून झाल्यावर साधनेच्या पुढील मोठय़ा टप्प्याकडे वळण्याआधी आचार्य साधकाला या श्लोकातून सावध करतात. जी काही उपासना करायची त्यातून आध्यात्मिक ‘मी’सुद्धा पक्का होऊ देऊ नकोस, असा इशारा ते देतात.
चैतन्य प्रेम