अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०२. प्राणायामं Print

चैतन्य प्रेम, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
साधकाला कृतीशील मार्गदर्शन करणारे जे सात श्लोक ‘भज गोविंदम्’ या स्तोत्रातून आपण निवडले त्यातला सातवा आणि अखेरचा श्लोक आहे ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानम् कुर्ववधानं महदवधानम्।।’ हा साधनेचा परिपूर्ण नकाशा आहे.

यातला प्रत्येक शब्द हा साधनेचा एकएक टप्पा मांडतो आणि या श्लोकावर कित्येक महिने हा सत्संग सुरू राहू शकतो. पण आपल्याला कालमर्यादा पाळायची आहे म्हणून जमेल तितक्या आटोपशीरपणे आपण हा मागोवा घेणार आहोत. या श्लोकातला पहिला शब्द आहे प्राणायाम! त्यातही आपल्याला अत्यंत परिचित आहे प्राण! आपला प्राण कधीमधी कासावीस होतो, कधीमधी कंठाशी येतो, कधी घुटमळतो. प्राण गेला तरी चालेल पण हा भोग नको, असंही काहीजण म्हणतात. आता योगायोग म्हणजे हे सारे अनुभव भौतिकापुरतेच असतात. भगवंतासाठी नव्हे तर भौतिकासाठीच आपला प्राण कासावीस होतो, भौतिकाच्या संकटाने तो कंठाशी येतो, भौतिक लालसेभोवतीच तो घुटमळतो आणि एखाद्या दुखभोगापेक्षा प्राण गेलेला आपल्याला बोलण्यापुरता चालतो! भगवंतासाठी प्राणावर आपण उदार होत नाही. तर अशा आपल्या या प्राणाच्या नियमनावर आधारित आहे तो प्राणायाम! आता हा प्राण सर्वपरिचित असला तरी त्याचे खरे महत्त्व आपण जाणत नाही. प्राण ही या विश्वाचा विकास करणारी अनंत, सर्वव्यापी, कारणभूत अशी शक्ती आहे, असं विवेकानंद यांनी नमूद केलं आहे. ते म्हणतात, ‘‘भारतीय तत्त्वज्ञांच्या मते हे समस्त विश्व दोन पदार्थानी निर्मिले आहे. त्यातील एका पदार्थाला ते ‘आकाश’ म्हणतात. हे आकाश म्हणजे सर्वव्यापी, सर्वत्र अनुस्यूत असलेली अशी सत्ता आहे. ज्या वस्तूला आकार आहे, जी वस्तू कित्येक वस्तूंच्या संमिश्रणाने उत्पन्न झालेली आहे, ती प्रत्येक वस्तू या आकाशापासूनच उत्पन्न झालेली असते. हे आकाशच वायुरूप बनत असते. हे आकाशच द्रवपदार्थ बनत असते, हे आकाशच घनपदार्थ बनत असते; हे आकाशच पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे इत्यादि बनत असते. मनुष्यशरीर, पशुशरीर, वनस्पती सारेकाही या आकाशाचेच बनले असते. जे काही आपण पाहतो, ज्या कशाचा आपल्याला इंद्रियांद्वारा अनुभव येऊ शकतो, या विश्वात जी जी वस्तू अस्तित्वात आहे, ती ती या आकाशापासूनच निर्माण झालेली आहे. या आकाशतत्त्वाला आपण इंद्रियांनी जाणू शकत नाही; ते इतके सूक्ष्म आहे की ते साधारण अनुभूतीच्या पलीकडे आहे. स्थूल होऊन ते ज्यावेळी आकार धारण करते त्याचवेळी ते आपल्या अनुभवास येऊ शकते. सृष्टीच्या प्रारंभी केवळ हे आकाशच असते. कल्पाच्या अंती सारे वायुरूप, द्रव आणि घन पदार्थ वितळून त्या आकाशातच विलीन होतात.’’ कोणत्या शक्तीच्या प्रभावाने हे आकाश विश्वरूपात परिणत होते? विवेकानंद म्हणतात, प्राणशक्तीच्याच प्रभावामुळे! प्राणशक्तीचं महात्म्य इतकं व्यापक आहे.