अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१४. निसटलेला दुवा Print

मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
प्रत्याहार म्हणजे काय आणि प्रत्याहाराचा लाभ काय; हे आपण गेले काही भाग जाणून घेतलं. आज माझ्या वृत्तीचा ओघ बाह्य़ाकडे, दुनियादारीकडे आहे तो आत वळवणं, एकाग्र होऊन भगवंतापाशी दृढ करणं, हा प्रत्याहार आहे. तो साधण्याचे जे चार मार्ग पू. बाबा बेलसरे यांनी सांगितले, ते आपण पाहिले. त्यातील चौथा मार्ग, जो पू. बाबांच्या मते सोपा आहे,

आचरणात आणण्यासारखा आहे, तो म्हणजे मी जो प्रपंच ‘मी’पणाने करीत आहे तो भगवद्भावनेने करायचा. हा प्रपंच ‘माझा’ नाही, ‘त्याचा’ आहे- त्या भगवंताचा आहे, मी निमित्तमात्र आहे, ही वृत्ती रुजवायची. आता यातही एक धोका आहे, कारण जीव जन्मत:च धूर्त आहे! तो प्रपंच ‘माझा’ आहे असं तोंडानं म्हणणार नाही आणि त्या प्रपंचाची मालकी तोंडदेखली भगवंताकडे देईलही. त्या भौतिक प्रपंचाच्या प्रगतीसाठी तो अधिक जोमाने राबेल आणि वर म्हणेल, हा ‘त्याचा’ प्रपंच आहे! सामान्य माणसाला का दोष द्यावा? ‘भगवंताचं कार्य’ या नावाखाली धर्माच्या क्षेत्रात भौतिकाचा काय कमी बाजार भरतो? आलिशान वातानुकूलित आश्रम, उंची गाडय़ा.. हे सारं ‘त्याचं’ म्हणूनच तर सांगितलं जातं! याचा अर्थ माणसानं श्रीमंत होऊ नये वा श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणं गैर आहे, असा नाही. कष्टानं तुम्ही कितीही प्रगती करा, पण वृत्ती बिघडू देऊ नका. माझा हा जन्म, या जन्मी लाभलेली माणसं, मला लाभलेली परिस्थिती ही कशीही असो किंवा कशीही होवो; या जन्मातली खरी मोठी संधी भगवंतप्राप्ती हीच आहे, याचा विसर पडू देता कामा नये, तर ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेक विचारम्। जाप्यसमेत समाधिविधानं। कुरू अवधानं महद्वधानम्।।’ या श्लोकातील प्राणायाम आणि प्रत्याहाराचा मागोवा आपण घेतला, पण हा मागोवा अद्याप पूर्ण नाही. याचं कारण माझं अज्ञान! माझे एक गुरुबंधू म्हणाले, अहो, तुम्ही एकदम प्राणायाम आणि प्रत्याहार सांगितलात, पण यम, नियम, आसन यांचं काय? कारण यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार; ही पाचही बहिरंग साधनं आहेत. शंकराचार्य नुसतं ‘प्राणायामं प्रत्याहारं’ म्हणतात तेव्हा यम, नियम, आसनासह प्राणायाम व प्रत्याहारापर्यंत, असं त्यांना अभिप्रेत आहे. हे ऐकताच कुठे तरी साखळी तुटल्यासारखं वाटत होतं ती जोडली गेली! तेव्हा यम, नियम आणि आसनाचाही थोडक्यात मागोवा आवश्यक आहे. आपण ज्याला अष्टांगयोग म्हणतो त्याची यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही बहिरंग साधनाची पाच अंगे आहेत आणि धारणा, ध्यान व समाधी ही अंतरंग साधनाची तीन अंगे आहेत. ‘यमा’ची अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह ही पाच उपांगे आहेत. नियमाची शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्राणिधान अशी पाच उपांगे आहेत. आता बहिरंग म्हणून या साधनांना का ओळखतात आणि ही उपांगे काय, यांचा विचार करू. यम-नियमानंतर जे ‘आसन’ आहे ते काय दर्शविते, याचाही विचार करू.
चैतन्य प्रेम