अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : .२१५. बहिरंग साधना Print

 

बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
बहिरंग साधन आणि अंतरंग साधन! बाह्य़ स्थूल सृष्टीत माणूस अडकला आहे. त्यामुळे या बाह्य़ दुनियेत विखुरलेलं त्याचं मन, त्याचं चित्त गोळा करून, एकाग्र करून त्याला आत, अंतरंगात केंद्रित करायचं आहे. अर्थात बाहेरून आत असा हा प्रवास आहे. त्यासाठी बहिरंग साधनांनी सुरुवात करून अंतरंग साधनांच्या अनुष्ठानाने या यात्रेची पूर्ती करायची आहे.

बाहेर विखुरलेल्या मनाला गोळा करण्याची प्रक्रिया यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पाच बहिरंग साधनांनी होते तर गोळा केलेल्या मनाला आत केंद्रित करण्याची, स्थिर करण्याची प्रक्रिया ध्यान, धारणा आणि समाधी या तीन अंतरंग साधनांनी होते. भगवंत सूक्ष्म आहे. त्याला सूक्ष्म होऊनच जाणता येतं. माणसाची बुद्धी, माणसाचं मन, माणसाचं चित्त हे खरं तर सूक्ष्म आहे. पण स्थूलाशी चिकटल्यानं, दृश्य जगतात अडकल्यानं तेही स्थूलच झालं आहे. बाह्य़ात विखुरलेलं हे मन जोवर एकाग्र होत नाही, सूक्ष्म होत नाही तोवर भगवंत आकळणार नाही. सुईच्या अग्रातून दोरा ओवताना दोऱ्याचं टोक एकाग्र असावं लागतं. दोऱ्याचं टोक जर विखुरल्यागत असेल तर ते आपण तोडून, दाबून आणि वळून निमुळतं करतो. मगच ते सुईच्या सूक्ष्म छिद्रातून जाऊ शकतं. त्याचप्रमाणे मन, चित्त एकाग्र होईल, सूक्ष्म होईल तेव्हाच ते भगवंतात ओवलं जाईल. शंकराचार्यानी ‘प्रबोध सुधाकर’ ग्रंथात मानवी देहाचं महत्त्व सांगितलं आहे. भवसागर पार करण्यासाठी भगवंतानं दिलेलं मनुष्य शरीर म्हणजे जणू नौका आहे! मात्र या शरीररूपी नौकेला दोन डोळे, दोन कान, एक तोंड, दोन नाकपुडय़ा आदी नऊ छिद्रे आहेत. (छिद्रैर्नवभिरूपेतं) या नौकेचा मालक असलेला जीव जर आळसात बुडाला, आपल्या ध्येयाबद्दल गाफील झाला (जीवो नौकापतिर्महानलस:) जर त्या छिद्रांचा अर्थात बाह्य़ जगात वावरण्यासाठीची माझी सोय म्हणून मला लाभलेल्या स्थूल इंद्रियांचा मी जर संयम केला नाही तर त्या इंद्रियांद्वारे दुनिया आकलनापुरती न राहाता ती माझ्या अंतरंगात प्रवेश करते आणि मला तिच्यात बुडवून टाकते. अर्थात त्या छिद्रातून पाणी आत येऊन ती नौका बुडून जाते. (छिद्राणामनिरोधाज्जलपरिपूर्ण पतत्यध: सततम्।।) पण त्या छिद्रांचा निग्रह युक्तीने केला तर जीव सुखाने भवसागर पार करतो. (छिद्राणां तु निरोधात्सुखेन पारं परं याति।।) या स्थूल इंद्रियांद्वारे दुनिया माझ्या अंतरंगावर ताबा मिळवू शकते हे जाणून त्या इंद्रियांना माझ्या ताब्यात ठेवणे, स्वाधीन करणे यासाठीचे जे बाह्य़ प्रयत्न आहेत किंवा अधिक अचूक सांगायचे तर बाहेरून मला आत नेणारे जे काही प्रयत्न आहेत ती बहिरंग साधना! आता आपल्या मनात असेही येईल की या इंद्रिय निग्रहाची इतकी जरुर काय आहे? आणि हे भवसागर पार करण्याचे प्रकरण तरी काय आहे? असा काही खराच भवसागर आहे का की ज्यात मी अडकलो आहे आणि तो पार केल्यावाचून जन्ममृत्यूचं चक्र काही थांबणार नाही?
चैतन्य प्रेम