अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१६. भवसागर Print

 

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
आत्मा अमर आहे आणि तो अनेकानेक देह धारण करीत असतो. ते देह नश्वर असल्याने देहाचा जन्म होतो आणि देहाचा मृत्यू होतो. देह सुदृढ राहातो आणि देह कमकुवत होतो, गलितगात्र होतो. देह निरोगी असतो आणि देहाला आजार होतो. आत्मा यापासून निर्लीप्त आहे. तो अमर आहे, अखंड आहे, आनंद अर्थात सच्चिदानंद हे त्याचं खरं स्वरूप आहे.

हे सारं आपण वाचतो पण तरी ज्या देहात आपण आत्ता आहोत त्याच्या जन्मापासून आजवर जे आयुष्य आपण जगलो, तेच आपल्याला पूर्ण खरं वाटतं. आपल्या देहाला जे नाव मिळालं आहे त्या नाव आणि आडनावाचं कुंपण हीच आपल्याला आपली खरी ओळख वाटते. आपला जन्म झाला आणि मृत्यूही होणार, हे वास्तव आपण जाणत असलो तरी मृत्यू आपल्याला नकोसाच वाटतो. असे असूनही जन्म-मृत्यूचा फेरा आणि भवसागर तरुन जाण्याचा बोध आपल्याला वास्तविक वाटत नाही! असा काही भवसागर असेल तर मला तो दिसत का नाही? श्रीरामकृष्णांची गोष्ट आठवते. एक मासोळी आपल्या आईला म्हणाली, ‘आई ते पाणी का काय म्हणतात ते खरंच असतं का गं? त्याचा समुद्रही असतो का गं? ते असेल तर मला ते दिसत का नाही?’ आई हसून म्हणाली, ‘माश्ये जन्मापासून तू पाण्यातच आहेस, पाण्यातच जगते आहेस आणि या पाण्यात असतानाच काळाच्या स्वाधीन होणार आहेस!’ चराचरात भरलेला भगवंत आम्हाला दिसत का नाही, हा प्रश्न विचारणाऱ्यांना श्रीरामकृष्ण या रूपककथेतून उत्तर देतं. हेच रूपक भवसागरालाही लागू आहे. या भवसागरातच आपण जन्मतो आणि या भवसागरातच मृत्यू आपल्याला मिठी मारतो आणि फिरून या भवसागरातच आपण जन्मतो! ‘भव’चा बराच विस्तार आहे पण त्याचा उगम जीवभाव, देहभावात आहे. ज्याला आपण भवताल म्हणतो ती बाहेरची दुनिया आहे. तिच्या तालावर नाचण्याची ओढ ही जीवभावात आहे. जन्मापासून मृत्युपर्यंत याच जीवभावाच्या अथांग वासनासमुद्रात आपण वहावत जात आहोत आणि हा सागर पार केला नाही तर जीवभावाच्या वासनेचा कोणता ना कोणता दोरखंड आपण इतका घट्ट पकडू की आयुष्याची मुदत संपल्याने देह सुटला तरी तो दोरखंड सुटणार नाही! त्याला धरूनच दुसरा देह आणि दुसरं आयुष्य आपल्या वाटय़ाला येईल. यालाच जन्ममृत्यूचं चक्र म्हणतात. या चक्रातून सुटण्याचा उपाय काय? हा भवसागर तरण्याचा उपाय काय? संत सांगतात की, शरीरानं दुनियेत राहून चित्त भगवंतापाशी दृढ झालं तरच या दुनियेत जिवाच्या वासना घुटमळत राहाणार नाहीत. एका नामाने भवसागर पार होईल, अशी ग्वाहीही संत देतात. पण दुनियेत विखुरलेल्या मनात नाम स्थिर होण्यासाठीही काही अभ्यासाची, प्रयत्नांची जोड लागते. बाहेर विखुरलेल्या या मनाला आत वळविण्यासाठी काही वळण लावावं लागतं. शिस्त बाणवावी लागते. बहिरंग साधनांनी ती प्रक्रिया सुरू होते.
चैतन्य प्रेम