अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१७. वावर Print

 

शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२
माणूस या जगात देहाच्या आधाराने वावरतो. जगाच्या व्यवहारात वावरताना त्याचं मन हे त्याचं मुख्य ऊर्जाकेंद्र असतं. कुणाशी कसा व्यवहार करायचा, कुणाशी कसे संबंध जोडायचे वा तोडायचे, आपली भूमिका काय ठेवायची; आदी सर्व गोष्टींपासून ते लहानसहान निर्णयांपर्यंत माणसाचं मनच मुख्य भूमिका बजावतं. थोडक्यात मनाच्या इच्छेनुसार आणि देहाच्या आधारे माणूस जगात वावरतो. या वावरात इतरांशी व्यवहार करताना तो वाणीचा वापर करतो.

आता इथे ‘वाणी’ हा शब्द नुसतं बोलण्यापुरता मर्यादित नाही तर ‘संवादा’साठी म्हणून माणूस जे जे मार्ग वापरतो किंवा अधिक अचूक सांगायचं तर इतरांशी व्यवहार करताना माणूस ज्या कोणत्याही मार्गाने व्यक्त होतो तिला ‘वाणी’ म्हणू. तर माणूस असा कायिक, वाचिक आणि मानसिक पातळीवरून बाहेरच्या दुनियेत वावरत असतो. या दुनियेत अपूर्त वासनांच्या पूर्तीसाठी म्हणून जीव जन्मतो, हे आपण मागेच पाहिलं. थोडक्यात वासनेतच जिवाचा जन्म होतो. अनंत वासना त्याच्या मनात उत्पन्न होत असतात. त्यातील काही पूर्ण होतात काही अपूर्ण राहतात. या स्थितीतच जिवाचा मृत्यू होतो. पण ज्या वासना अपूर्ण राहतात त्यांच्या पूर्तीची तळमळ शमली नसते. त्याच वासनांच्या ओढीनिशी ‘मेलेला’ जीव दुसरा देह धारण करून ‘जन्मतो’ आणि वासनापूर्तीसाठी नव्याने धडपडू लागतो. अर्थात जिवाच्या जन्मजन्मांतरीच्या भ्रमंतीला त्याची वासनात्मक ओढच कारणीभूत असते. ती ओढ नष्ट करणं हा बहिरंग साधनेचा मुख्य हेतू आहे. वासनेतच माणसाचा जन्म असल्याने माणसाचं मन वासनारहित कधीच नसतं. अनंत इच्छा आणि वासनांनी ते कायमच भरलेलं आणि भारलेलं असतं. आपल्याला मिळालेला हा मानवी जन्म दुर्लभ आहे, काळाच्या मर्यादेत जखडला आहे, त्याचा उपयोग शाश्वताच्या प्राप्तीसाठी केला पाहिजे या जाणिवेनुरूप ज्या इच्छा मनात उत्पन्न होतात त्यांना शुभवासना म्हणतात. पण मानवी जन्माची दुर्लभता, महत्त्व न जाणता, मिळालेलं आयुष्य काळाच्या मुदतीत आहे, याचं भान न राखता आपल्या क्षमतांचा, वेळेचा, भौतिकाचा गैरवापर स्वार्थपूर्तीसाठीच करण्याच्या जाणिवेनुरूप ज्या इच्छा मनात उद्भवतात त्यांना अशुभ वासना म्हणतात. प्रत्येक जीव हा स्वार्थकेंद्रितच असल्याने प्रत्येकाच्याच मनात अशुभ वासनांचे प्राबल्य असते. त्या अशुभ वासनांच्या जोरावर कायिक, मानसिक आणि वाचिक पातळीवर आपण जगात वावरतो आणि त्यामुळेच या जगात स्वार्थाधतेने जखडले जातो. हे जखडणंच आपल्या जन्म-मृत्यूच्या चक्राचं एकमेव भांडवल असतं. जर शुभ वासनांच्या जोरावर कायिक, मानसिक आणि वाचिक पातळीवर आपल्याला या जगात वावरता आलं तर? तर तो वावरच वेगळा असेल. व्यवहारापुरतं आपण या जगात आणि जगाचे असू पण ‘कायेनवाचामनसैंद्रिर्यैवा’ आपण ‘नारायणसमर्पित’च असू. बहिरंग साधनेमागील प्रेरणा तीच आहे.
चैतन्य प्रेम