अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१८. अभ्यास Print

 

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन आधारांवर माणूस जगात वावरतो. यातील कायिक आणि वाचिक या गोष्टी व्यक्त असतात तर मानसिक अव्यक्त असते. मनाच्या ऊर्मीनुरूप जीव शरीराने जगात वावरतो आणि जगाशी वाणीने संवाद साधतो. तरी माणसाचं मन दुसऱ्याला कळणं फार कठीण. माणसाच्या मनात एक असतं आणि तो धूर्तपणे व्यवहारात जे सोयीचं तेच भासवत असतो. संधी मिळताच माणसाचं खरं मन प्रकटतं.

तेव्हा या कायिक,  वाचिक आणि मानसिक प्रवाहांना वळण लावण्याला भगवंतानं तप म्हंटलं आहे. स्वामी शिवानंद ‘ध्यानयोगरहस्य’ या ग्रंथात म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या ‘यमा’तील उपांगांचे अनुष्ठान म्हणजे काया, वाचा व मनाने हिंसेचा, असत्याचा, चोरीचा, व्यभिचाराचा आणि संग्रहाचा पूर्णपणे परित्याग करणे.’’ आता थोडा खोलवर विचार केला की जाणवेल की माणूस एकवेळ शरीराने आणि वाणीने िहसा करणार नाही, शरीराने आणि वाणीने खोटे आचरण वा वक्तव्य करणार नाही, शरीराने चौर्यकर्म आणि वाणीने पापोक्ती करणार नाही, शरीराने ब्रह्मचर्याचे पालन करील आणि वाणीने तसे प्रतिपादिलही, शरीराने व वाणीने संग्रह अर्थात भौतिक संपत्तीची तळमळीने कमाई आणि सांभाळ करणारही नाही पण मनानं? शरीरानं माणूस हिंसा करणार नाही किंवा वाणीने हिंसक, दुसऱ्याला दुखावणारं काही बोलणारही नाही पण त्याचं मन हिंसेनं भरलेलं असू शकतं! तो शरीरानं खोटं आचरण करणार नाही किंवा वाणीने खोटं बोलण्याचं टाळेलही पण त्याच्या मनात खोट असू शकते, खोटय़ाची वकिली करण्याचं चिंतन तो अहोरात्र करीत असू शकतो. तो शरीरानं चोरी करणार नाही किंवा मुखानं पापयुक्त बोलणार नाही पण त्याचं मन पापानं भरलेलं असू शकतं. तो शरीरानं ब्रह्मचारी असल्याचं भासवीलही आणि वाणीही त्याचा प्रत्यय देईल पण त्याचं मन दुराचरणाच्या ओढीनं भरलेलं असू शकतं. तो शरीरानं वस्तुसंग्रहापासून दूर राहील आणि वाणीनेही ‘यथालाभ संतोष:’चं पालुपद ऐकवील पण त्याच्या मनात भौतिकाची तीव्र ओढ असू शकते. याचाच अर्थ कायिक आणि वाचिक पातळीवर माणूस निर्लीप्त झाल्याची भूमिका वठवू शकला तरी मानसिक पातळीवर तो दुनियेत, अशाश्वताच्या ओढीत पूर्ण जखडला असू शकतो. त्यामुळे कायिक आणि वाचिक तपापेक्षा मानसिक तपच सर्वात कठीण आहे. पण मानसिक तप साधले नाही तर कायिक आणि वाचिक तप निर्थक आहे. आता ज्या अर्थी याला ‘तप’ म्हटले आहे त्याअर्थी ते सोपे नाही, हे तर उघडच आहे. पण अभ्यासानं कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं भगवंतच सांगतात. आता हा ‘अभ्यास’ कोणता? दुनिया हीच सुखाचा एकमेव आधार आहे, हा जिवाचा भास आहे. तो इतका व्यापून आहे की त्या आभासाचे निराकरण करण्यासाठीची, ‘अभास’ होण्यासाठीची प्रक्रिया हाच अभ्यास आहे!
चैतन्य प्रेम