अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २२७. महद् अवधानम् Print

चैतन्य प्रेम, बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२
आदि शंकराचार्य सांगतात, ‘‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महद्अवधानम्।।’’ अनेकजण याचा अर्थ असा घेतात की अष्टांगयोगाची साधना फार लक्षपूर्वक करा, असंच आचार्याना सांगायचं आहे. प्रत्यक्षात या योगानं काय साधलं पाहिजे, या योगाची पूर्ती कशात आहे किंवा हा योग साधत असताना सर्वात महत्त्वाचं काय आहे किंवा या योगापेक्षाही महत्त्वाची गोष्ट काय आहे, हेच आचार्य सूचित करीत आहेत. ती आहे, ‘महद् अवधानम्’! महद् म्हणजे सर्वोच्च, महद् म्हणजे सर्वात मोठा अर्थात परमात्मा. अवधान म्हणजे केवळ एकाचंच ध्यान. एकाशीच एकरूपता. योगानं जर साधायचं असेल तर हे परमात्मऐक्यच आहे. अशाश्वताचं अवधान सुटेल तेव्हाच शाश्वताचं अवधान साधेल. ज्याला ते साधलं, ज्याला महद् अवधान साधलं त्याचा कोणता योग शेष राहीला? आणि ज्यानं अष्टांग योग साधण्याची पूर्ण खटपट केली पण ज्याला हे परमात्मऐक्य साधलं नाही त्याला तरी कोणता योग साधला? गीतेत साक्षात् भगवंतांनी हे ‘महद्अवधानम्’च सांगितलं आहे. ते कसं? त्यासाठी थोडं  तपशीलात विचार करावा लागेल. गीता एकमेव योग सांगते. हा योग आहे परमात्म्याचा. आता परमात्म्याशी योग साधायचा म्हणजे तरी मुळात काय हो? योग म्हणजे जोडलं जाणं आणि योग म्हणजे युक्ती किंवा कला. तर इथे दोन्ही अर्थ आहेत. भगवंताशी जोडलं जाण्याची कला आणि भगवंताशी जोडलं जाणं. भगवंतापासून विभक्त जो राहात नाही तो भक्त. भगवंताशी ऐक्य साधण्याचा मार्ग तो भक्ती. ही भक्तीच भगवंतानं अर्जुनाला सांगितली. आता भगवंताशी असं ऐक्य साधावं कसं? त्याला उपाय दोनच. एकतर साक्षात परमात्म्याचा सहवास किंवा जो त्याच्यात सदोदित विलीन आहे, जो त्याच्याशी पूर्ण समरस आहे, भगवंताशी ज्याचं ऐक्य झालं आहे अशाचा सहवास! आता हे वाचून वाटेल की जो त्याच्याशी समरस आहे अशाच्या सहवासापेक्षा भगवंताचा सहवास अधिक लाभदायक. तर नामदेवांच्या कथेतून भगवंतानं सांगितलं आहे, माझा सहवास लाभला तरी माझ्यात निमग्न सद्गुरूच्या सहवासाशिवाय खरा लाभ अशक्यच! त्यातही गंमत अशी की साक्षात भगवंत जरी अवतार घेऊन खाली आला तरी त्याला ओळखणं कठीण आणि जो त्याच्याशी एकरस आहे अर्थात जो परमात्मरूपच आहे, त्यालाही ओळखता येणं फार कठीण. स्वत: भगवंतच अर्जुनाला सांगतात, ‘‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्। परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्।।’’ (गीता/ अध्याय ९, श्लोक ११) बाबा रे मी जेव्हा मनुष्यरूपात अवतीर्ण होतो तेव्हा मूढ लोक माझा उपहासच करतात. प्रत्यक्षात चराचरातील सर्व अस्तित्वाचा मुख्य आधार असे माझे जे दिव्य स्वरूप ते ते जाणत नाहीत! आता या पाश्र्वभूमीवर विषयांतराचा धोका पत्करून नामदेवांच्या आयुष्यातील दिव्य योगाचाही संक्षेपाने विचार करू.
चैतन्य प्रेम