अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२८. सहवास Print

 

चैतन्य प्रेम, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
बाळ मंदिरातल्या विठोबाला नैवेद्य दाखवून ये, लहानग्या नामदेवाला वडिलांनी सांगितलं. मुलगा धावतच मंदिरात गेला आणि बराच वेळ गेला तरी आला नाही. असेल कुठेतरी खेळत, असे वाटून नंतर वडीलही विसरून गेले.

दिवस कामात सरला. संध्याकाळी घरी आले तर बायको गोणाई म्हणाली, नामू आज दुपारी उशिरा घरी आला. धड जेवलाही नाही. कशातच लक्ष नव्हतं त्याचं. मुलावर दामाजींचा जीव होता. त्यामुळे  ‘हुंदडायचं वय त्याचं. खेळताना भान नसेल राहिलं’, असं वाटून बायकोच्या तक्रारी त्यांनी ऐकून न ऐकल्यासारख्याच केल्या. पण मग असं रोजच होऊ लागलं. नैवेद्य घेऊन नामदेव मंदिरात जात आणि तासन्तास गायब होत. एकदा वडिलांनी ठरवलंच की मंदिरातून हा जातो तरी कुठे ते पाहायचंच. नामदेव नैवेद्य घेऊन मंदिरात गेले आणि वडील लांबूनच मंदिराच्या दाराकडे लक्ष ठेवून राहिले. खूप वेळानंतर नामदेव बाहेर आले. चेहरा आनंदाने भारलेला. वडील धावतच गेले आणि पाहिलं, नैवेद्याचं भांडं रिकामं झालं होतं. ‘‘नाम्या, एकटय़ानं एवढं खाल्लंस? अरे घरी सर्वासाठी जेवणात टाकायचं ते’’ वडिलांकडे आश्चर्यानं पाहात नामदेव म्हणाले, ‘‘मी नाही खाल्लं’’. वडिलांनी आश्चर्यानं विचारलं, ‘‘अरे मग कुणी खाल्लं? आणि इतका वेळ मंदिरात तू काय करीत होतास?’’ नामदेव अधिकच आश्चर्यानं म्हणाले, ‘‘कुणी म्हणजे? ज्याच्यासाठी तुम्ही नैवेद्य दिलात त्या विठ्ठलानंच तर खाल्लं. इतका वेळ त्याच्याबरोरबच तर मी खेळत होतो!’’ वडिलांना धक्काच बसला. मुलगा खोटं बोलतोय, असं वाटलं पण मन स्वीकार करेना. दगडाचा देव कधी नैवेद्य खाईल तरी का? वडील काही बोलले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी गुपचूप मंदिरात येऊन लपले. लहानगा नामदेव प्रसादाचं भांडं घेऊन आला आणि विठूसमोर उभा राहून हाका मारू लागला. विठोबा काहीच बोलेना, हलेना, डोलेना.. हाका मारून मारून नामदेव रडू लागले. ‘आजच असं काय झालं? रोज तर तू लगेच विटेवरून उतरून माझ्या हातनं खातोस, माझ्याशी खेळतोस. मग आजच काय झालं?’ ते विचारू लागले आणि त्यांना रडू अनावर झालं. मूर्तीतून आवाज आला, ‘आज मंदिरात तू एकटा नाहीस. तुझ्यासमोर मी येतो ते तुझा माझ्यावर दृढ विश्वास आहे म्हणून. ज्याच्यात तो दृढ भाव नाही त्याच्यासमोर दगड दगडच राहाणार!’ वडिलांनी हे ऐकलं आणि त्यांची शुद्धच हरपली. जाग आली तेव्हा ते घरी होते. आजूबाजूला लोक जमलेले. त्यांनी काही न बोलता लहानग्या नामदेवाला जवळ घेतलं. विठोबा याच्याशी बोलतो, खेळतो हे खरं आहे.. एवढंच त्यांना जाणवलं. नामदेवांना मग हळूहळू ‘मित्र’ही मिळाले ते अद्भुतच! निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरोबाकाका यांचा सहवास नामदेवांना लाभत होता आणि त्यांच्यातली विठ्ठलभक्तीही सहस्रदल कमळाप्रमाणे उमलत होती. मग तेरढोकीचा तो कलाटणी देणारा प्रसंग घडला!