वाचावे नेट-के : आरशात आरसा.. Print

अभिनवगुप्त, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

‘मला सारखं काही तरी वाटत तरी असे किंवा मी वाटवून तरी घेत असे’ असं आधुनिक मराठीतल्या श्रेष्ठ लेखिका कमल देसाई यांचं वाक्य आहे. त्यापुढे- ‘एकदा मला वाटलं, पाणी व्हावं. मग मी बरेच दिवस पाणी होते. एकदा पाण्याला वाटलं, मी व्हावं. मग पाणी बरेच दिवस मी होतं. कुणाला कळलंच नाही, पाणी मी होतं ते’ अशी वाक्यं आहेत. ‘काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई’ या दोन लघुकादंबऱ्यांच्या पुस्तकात, ‘काळा सूर्य’मध्ये ही वाक्यं सापडतील. कथानक पुढे नेण्यासाठी फार उपयोगी नाहीत ती. तरलपणा कुठं आला, कसा आला याचं हे वर्णनही तरलच- असा याचा एक अर्थ काढता येतो.

किंवा मग, अर्थबिर्थ काढायचा नाही आणि वाचत जायचं, असं ठरवून पुढे वाचलं तरी पुढलं सगळं नीट कळतंच. त्याला अर्थच असतो असं नाही, त्यामुळे ‘अर्थ समजणं’ आणि ‘कळणं’ यापैकी कळण्याची निवड वाचक करतो.
अवधूत डोंगरे यानं ज्या अनेक लेखकांचे ब्लॉग तयार केले, त्यात कमल देसाई यांचा समावेश आहे. कमल देसाईंचं लिखाण समजत नाही अशी तक्रार आजकालचे वाचक करतील, पण समीक्षेचा जागतिक दर्जा मराठीत आणू पाहणारे रा. भा. पाटणकर यांनी ‘कमल देसाई यांचे कथाविश्व’ हे पुस्तक लिहिलं. तर, दुर्गा भागवत, अशोक शहाणे यांनी कमल देसाई यांची तारीफ करणारे लेख लिहिले आहेत. लिखाण ‘समजणं’ महत्त्वाचं की ‘कळणं’ महत्त्वाचं, असा प्रश्न देसाईंच्या लिखाणातून उभा राहिला, त्यापैकी कळणं महत्त्वाचं मानल्यास लेखक अख्खा कळला पाहिजे, यासाठी हा ब्लॉग. तो देसाई यांच्या हयातीत सुरू झाला होता. हल्ली फार वेळा अपलोड होत नाही. डेड ब्लॉगसारखाच; पण उघडून पाहता येतो, एवढय़ाच अर्थानं जिवंत. कमल देसाई यांचं निधन दीड वर्षांपूर्वीच झालं. त्यामुळे त्यांची नवी मुलाखत वगैरे या ब्लॉगवर येण्याची शक्यता शून्यच.
याच ब्लॉगवरला एक लेख दुर्गा भागवत यांचा. भागवत आणि देसाई यांची ओळख होती. भागवत यांनी देसाईंचं कौतुक केलं. फक्त लिखाणाचं नव्हे, व्यक्ती म्हणूनही! हे कौतुक कमल देसाईंच्या ब्लॉगवरच जेव्हा वाचायला मिळतं, तेव्हा प्रश्न पडतो की, आजचे ब्लॉगलेखकही एकमेकांचं असंच (लिखाण आणि व्यक्ती -दोन्हीचं) कौतुक करत असतात. मग काही ब्लॉगांवर दर नोंदीगणिक प्रतिक्रियांमधून चालणाऱ्या ब्लॉग-ब्लॉगर कौतुक सोहळय़ात वावगं काय आहे?
खरं आहे. वावगं काही नाही. पण भागवत यांचं देसाईकौतुक आणि एका ब्लॉगरनं दुसऱ्या ब्लॉगरचं केलेलं कौतुक यांत फरक आहे तो हेतूचा. (दुर्गाबाई कमल देसाईंच्या लिखाणानं ‘पॅरानॉइड- म्हणजे स्थिरभ्रम वृत्तीचं- दर्शन घडवलं, असं सहज सांगून टाकतात).
हा हेतू कुणाचा? एकटय़ा लेखकाचाच का? ब्लॉगलेखकांकडून लिखाण होतच असतं. पण स्वत:चं कौतुक व्हावं, दबदबा वाढावा, ‘इमेज’ तयार व्हावी, असा हेतू ठेवूनच ब्लॉगमधून स्व-दर्शन घडवणारे अनेकजण-जणी आज आहेत. ब्लॉग लिहायचा, फेसबुक  किंवा अन्य कट्टय़ांवरून नव्या नोंदीची वर्दी संभाव्य वाचकांपर्यंत जाईल असं पाहायचं, त्यांपैकी मित्रमंडळींनी- समविचारींनी, छान नोंद आहे म्हटलं, की प्रत्येकाचे आभार मानायचे आणि (कुणा परक्या वाचकानं काही टीका केलीच, तर) वर ‘मी- माझ्यासाठी- माझी गरज म्हणून’ लिखाण करतो/करते असंही म्हणायचं, ही सोय ब्लॉगविश्वानं स्वाहिलीपासून जपानीपर्यंत सर्व भाषांना दिली असल्यानं मराठीसारखी महत्त्वाची भाषा अपवाद कशी असेल? अशात लिखाणावर प्रतिक्रिया म्हणून मानवी पातळीवर, सदिच्छांची देवाणघेवाण (तुझं लिखाण छान, माझंही वाच) पद्धतीनं जे सुरू असतं, तेही पुन्हा सर्व लोकांना वाचण्यासाठी खुलं होऊ शकतंच.
या प्रतिक्रिया- कौतुक- कॉम्प्लिमेंट हा त्यांचा खासगी मामला आहे आणि आपण त्यात उगाच तोंड घालतोय, असं वाचकाला का वाटू नये?
पुन्हा अवधूत डोंगरेकृत कमल देसाईंच्या ब्लॉगकडे वळू. कमल देसाई पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आवडीनं वाचणाऱ्या होत्या. फँटसीची त्यांना आवड होती आणि दुर्गाबाईंनी म्हटल्याप्रमाणे, अखेर स्वत:च फँटसी होणं हा मार्ग देसाईंना कबूल होता. या फँटसी जगण्याचा त्रास इतरांना होऊ शकायचा, हेही दुर्गा भागवत यांनी न बोचकारता सांगितलेलं आहे. कमल देसाईंना एक पुरस्कार मिळाल्याच्या निमित्तानं चित्रकार प्रभाकर कोलते यांचा, तर निधनानंतर अशोक शहाणे यांचा लेख, एवढीच या ब्लॉगवरली ताजी भर आहे. कोलते, शहाणे यांनी व्यक्ती म्हणूनच कमल देसाईंबद्दल लिहावं हे स्वाभाविक होतं.कमल देसाई यांचा ब्लॉग, हा लिखाणाइतकंच व्यक्तीलाही महत्त्व देणारा आहे. तो मुद्दाम आजकालच्या ब्लॉगांखालच्या प्रतिक्रियांच्या संदर्भात वाचून पाहावा..  हितचिंतक- प्रतिक्रियादार- मित्र कसे असावेत, याचं दर्शन घडेल.
पण आजच्या ‘ओपन’ ब्लॉगजगतात हे व्यक्तिविषयक संदर्भ देणारं लिखाण ‘प्रतिक्रिये’च्या साच्यात बसतं, तात्कालिक होतं आणि तरीही कोण किती कौतुक करतंय, त्यापैकी व्यक्तिगत किती, सदिच्छेची देवाण किती नि घेवाण किती, हे वाचकाला कळत असतं. म्हणून तर, परकं वाटू लागतं.
 आज जिवंत असणारे, छान चालणारे अनेक ब्लॉग पाहून, त्याखालच्या प्रतिक्रिया वाचून असं लक्षात येतं की, व्यक्ती आणि लिखाण यांवरल्या प्रतिक्रियांची गल्लत होतेय खास! आणि हा दोष मूळ ब्लॉगलेखकांचा कसा मानायचा? प्रतिक्रिया देणारी मित्रमंडळी आहेत वा झालीत, हाही दोष नाहीच. मग दोष कसला?- ‘समजणं’ आणि ‘कळणं’ यांमधलं अंतर ज्या मित्रमंडळींना पार करता येत नाही, ते बहुतेकजण फक्त व्यक्तिगत वाटेल अशी तारीफ करून थांबतात.
या मजकुराला ‘आरशात आरसा’ हे शीर्षक का, याचं कारण अन्य एका ब्लॉगशी निगडित आहे. अनघा निगवेकर यांच्या ‘रेस्टइजक्राइम’ या ब्लॉगवर, एका मुलीच्या निवेदनातली नोंद आहे. (जाऊन शोध घ्याल तर : नोंदीचं नाव असूया. २७ फेब्रुवारी २०१२ रोजी.) भूत कोणत्याही रूपात येतं, मग बाबाच भूत नाहीत कशावरून, असंही या मुलीला वाटलेलं आहे! तर, ‘आरशात आरसा.. खरी मी कुठली ते कळतच नाही’ असं एक वाक्य या नोंदीत आहे. कमल देसाईंचा स्थिरभ्रम, आत्मविलोपी फँटसी, हे सारं या दोन वाक्यांत सापडतं. या नोंेदीतला ‘आरशात आरसा’ हा ‘खास अनघा टच’ आहे, अशी अगदी साधी- म्हटलं तर ओळखीतूनच आलेली कॉम्प्लिमेंट आहे- गौरी यांनी दिलेली, पहिलीच.
पुढं अख्खा ब्लॉग वाचलात, तर अनघा यांच्या गौरीकृत कौतुकातला खरेपणा पटेल. माणूस म्हणून सुसंस्कृतपणा, सामाजिक शिस्तीचे विविध आग्रह अनघा यांच्या लिखाणात डोकावतात; पण त्या दृश्यात ‘कायपण’ विचार करू शकतात, हे लेखक म्हणून त्यांचं बलस्थान आहे.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचे पत्ते :
http://kamaldesai.blogspot.in/
http://restiscrime.blogspot.in
सूचना, प्रतिक्रियांसाठी : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it