वाचावे नेट-के : अर्धविरामांच्या अधेमधे.. Print

अभिनवगुप्त, सोमवार, ५ नाव्हेंबर २०१२

समजा कुणा ब्लॉगलेखक वा लेखिकेनं, स्वत:च्या आयुष्यातल्या अनेक तपशिलांची साररूप यादी एकाच पल्लेदार वाक्यात मांडली, तर वाचक काय करील? वाक्य मोठं आहे, याबद्दल नाकं मुरडेल की वाक्याच्या लांबीकडे लक्ष न देता अर्थाची सखोलता पाहील? स्पष्ट, पण कमीतकमी शब्दांत लिहिताना काही तडजोडी कराव्या लागतात. वाचक त्या स्वीकारतात का? कधी कधी- विशेषत: माहितीपर लिखाण करताना तर या तडजोडी लेखकाला आणखीच जाचक होत असतील..

जाणकारांकडे संदर्भ जास्त आहेत, वाचकांमध्ये सर्वच रंग-छटांचे लोक असतील असं मानलं असलं तरी त्यातही या विषयाचे काही जाणकारही आहेत आणि विषय सोपा करून सांगताना आपण किती तडजोडी केल्या, हे कुणाला तरी कळणारच आहे, याची अस्वस्थता नसते का लेखकाला?
या प्रश्नांच्या उत्तरांकडे नेणाऱ्या दिशा ‘अवघा रंग एक झाला’ या नावाच्या ब्लॉगवरच्या काही नोंदी वाचताना सापडेल. ब्लॉगलेखक आहे अश्विन. या ‘अश्विन’बद्दल ‘अश्विन ३००९’ या ई-मेल नावाखेरीज कोणताही संदर्भ सापडत नाही. आयुष्यातले संदर्भ मात्र सापडतात. भूगर्भशास्त्राचा अभ्यासक आणि त्याच क्षेत्रात सरकारी नोकरीत असलेल्या या ब्लॉगलेखकानं अशी वाक्यं लिहिली आहेत. ती आकारानं (शब्दसंख्येनं) मोठी आहेत, त्या वाक्यांमध्ये संदर्भही भरपूर आहेत आणि असं असूनही सहजपणानं भिडणारी आहेत. असं होतं, याचं कारण लेखक वाचकाला विश्वासात घेऊन, अगदी खरं काही तरी सांगत असतो. मग भाषा सोपी आहे का, समजते का, किंवा वाक्यं किती सुटसुटीत आहेत, याचा विचार करण्याऐवजी वाचकाला निराळं काम मिळतं! लेखकासोबत, त्याच्या दृष्टीनं विचार करण्याचं काम. (थोडक्यात, वाक्यांची लांबीरुंदी मोजत बसण्याची टेप समीक्षकांच्याच हाती उरते आणि या टेपेमध्ये ते गुरफटतात) याचं उदाहरण म्हणून तीन नोंदींमधली मोठी वाक्यं पाहू. त्यापैकी एका नोंदीत (१९ जुलै २०१२) मुकुल शिवपुत्र यांच्या मैफली कुठेकुठे ऐकल्या नि त्यांत मुकुलजी काय गायले याची उजळणी, दुसऱ्या नोंदीत (१० नोव्हेंबर २०११) सरकारी नोकरीत वर्षभर काढल्यानंतरच्या आठवणी, तर तिसऱ्या नोंदीत (१९ सप्टेंबर, २०१०) एक परिच्छेद आहे- ‘‘गेल्या काही दिवसांत माझ्यात असे काही बदल घडले आहेत की, एक तर मी स्वत:ला फार प्रश्न विचारू लागलो आहे आणि दुसरं म्हणजे दिवस किती वेगानं बदलतात हे मी पाहिलं आहे!’’ या वाक्यानं तो सुरू होतो. परिच्छेदभर शक्यतांचा पट आहे- स्वत:बद्दलच्याच शक्यता. नोकरीची पहिली मोठी संधी मिळण्याच्या वयातल्या.
एरवी कठीण म्हणता येतील, अशा विषयांवर अश्विन सहजपणे लिखाण करतो. ‘सहजपणे’ एवढय़ाच अर्थानं की, स्वत:चं आयुष्य जगताना अश्विननं जे मार्ग निवडलेले आहेत, त्याच मार्गावरले हे विषयही आहेत. विषय नेहमीचे नाहीत हे खरं आणि लेखकाच्या व्यवसायापासून ते अभिरुचीपर्यंत अनेक गोष्टींत-  म्हणजे निर्णय आणि त्यामागचे घटनाक्रम यांत- वेगळेपणा आहे, हेही खरं. त्यामुळे विषय कठीण आहेत, हा इथं मुद्दा नाही. मुद्दा आहे तो या विषयांची लेखनातली काठिण्यपातळी किती ठेवू असा लेखकाला पडला असावासा प्रश्न, आणि त्याची त्यानं शोधलेली विविध उत्तरं, यांचा. हा मुद्दा नीट पाहिल्यास ब्लॉगची काही मर्मस्थळं आपल्याला समजतील.
सरकारी नोकरी हा एक(च) प्रशस्त पर्याय असेल, असं अभ्यास+व्यवसायक्षेत्र लेखकानं निवडलं आहे. नोकरीबद्दल स्वत:ची मतं व्यक्त करताना, सामान्य माणूस असणं म्हणजे काय याची कल्पना (आयुष्यवाले आणि काळजीवाले) त्याला आहे आणि ‘सरकार’विषयी सामान्य माणसाच्या ज्या भावना असतात, त्यांचा थेट प्रत्यय त्याला जगतानाही येतो आहे. ‘सरकारी काम’ म्हटलं की जे निराळंच पॉवर रिलेशन येतं, त्यातून जे सूक्ष्म सत्तानाटय़ घडतं, त्याबद्दल ब्लॉगमधून सांगावंसं वाटतं आहे.
 मुकुल शिवपुत्र यांचं गाणं ऐकताना ‘चाहता ते भक्त’ असा लेखकाचा प्रवास होतो. मग, ‘गायकी येते कुठून’ हा प्रश्न स्वत:ला पडतो आहे. प्रश्न महत्त्वाचाच आहे हे कळतं आहे पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधनसामग्री आहे की नाही, ही स्वत:बद्दलची शंका आहे. यावरचं विनम्र उत्तर, ‘सामग्री नाही’ असं देऊनही विषय थांबत नाही (ताजी नोंद- १६ ऑक्टोबरची - वाचल्यास संदर्भ कळेल).  इथे बंदिशी सांगितल्या, त्या गायकानं कशा मांडल्या हे सांगितलं, पण म्हणून आपण गायकीपर्यंत पोहोचलो का, अशी अभ्यासू हुरहुर या ‘भक्त चाहत्या’च्या मनात उरते आहे.
याउलट, भूभाग कसे तयार होतात, जमिनीखालचे फॉल्ट म्हणजे काय, या प्रश्नांवरल्या अभ्यासाचा आवाका लेखकाला अगदी पक्का माहीत आहे. आता त्याला हे सोपं करून सांगायचंय. विकिपीडियासारखी माहिती देणं हे आपल्या ब्लॉगचं काम नसल्याचं जाणणारा हा लेखक, आवश्यक तिथे वाचकांना विकिपीडिया वा गूगलपर्यंत नेतो. विशिष्ट लिंक देतो. पण तरीही काही तपशील सुटत असतील.. ते का सोडून द्यायचे याची उत्तरं स्वत:कडे आहेत, पण अन्य अभ्यासकांनी केवळ आपापला अभ्यास दाखवण्यासाठी ‘हे नाही- ते नाही’ असं सांगितल्यास ते अनाठायी ठरेल, असं लेखकाला वाटतं (तशी मैत्रिपूर्ण ताकीदही तो २६ मे २०१२च्या नोंदीत देतो).
कठीण आणि सोपं यांच्यामधल्या नात्याचे, त्या नात्यातल्या ताणतणावांचे हे जे प्रसंग अश्विन यांच्या ब्लॉगवर उभे राहतात, ते पाहणं हाच आजच्या मजकुरातला महत्त्वाचा भाग ठरावा. ‘अवघा रंग एक झाला’ अशी भेद मिटवणारी आणि सूर जुळवणारी पातळी अश्विनला हवी आहे. फक्त ब्लॉगवर नसेल, जगतानाही हवी असेल; पण जगतानाच्या तडजोडी त्या-त्या वेळी करता येतात, असंही असू शकेल.. पण तिथं नाक खुपसणं हा आपला प्रांत नाही. गांभीर्यानं लिखाण करताना ही समपातळी अश्विन शोधतो आहे, असं लिखाणातून दिसतं. त्यासाठी त्यानं केलेल्या तडजोडी स्वस्त (चीप) अजिबात नाहीत. योग्य प्रश्न उपस्थित करणं आणि त्याच्या उत्तरांसाठी योग्य तपशील मांडणं असा अभ्यासू मार्गच त्यानं (अगदी पुरुषोत्तम करंडकाबद्दल तात्कालिक नोंदीतही) स्वीकारला आहे.
ब्लॉग लिहिण्यासाठी वेळ नाही, याची पूर्ण जाणीव असताना हा ब्लॉग लिहिला जातो. अनेकदा इथं ‘अर्धविराम’ येतात. मग अधेमधे काही तरी होत राहतं, पुन्हा वाक्य सुरू होतं. या साऱ्या प्रक्रियेत त्याच्या जोडीला आहे कबीर! कुमार गंधर्व आणि मुकुल शिवपुत्र यांच्या भूगर्भातला आवाज कबिराचा आहे. तो आवाज वाचकापर्यंत पोहोचवणाऱ्या या ब्लॉगनं अनेक नोंदींच्या अखेरीस कबिराचा शेला पांघरला आहे.
या शेल्याचेच आता कपडे शिवायला हवेत. शेला जसाच्या तसा (मूळ पाठाप्रमाणे) नाही राहिला तरी चालेल, पण कबीरानं या ब्लॉगमार्गे आजच्याही बाजारात येऊन जायला हवं.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता :
http://ashwin3009.blogspot.com
सूचना, प्रतिक्रियांसाठी : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it