पसाय-धन : आम्हां सापडले वर्म.. Print

अभय टिळक, शुक्रवार, ११ मे  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नीतिमय आणि लोकहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून केलेला प्रपंच हाच परमार्थ, अशी संतांची धारणा आहे. टिळकांचे ‘गीतारहस्य’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ आणि सेनापती बापटांची ‘गांवगीता’ म्हणजे याच सगळ्या प्रयत्नवादाचे पुढील पर्व. संतांच्या कार्याचे हे मर्म लोकमान्यांना अचूक उमजले परंतु इतिहासाचार्य राजवाडय़ांना मात्र ते उमगले नाही.. प्रपंच आणि परमार्थ या दोन प्रांतांची सुसंगत सांगड घालून देणे, हा संतांच्या कार्याचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू. सांसारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन या दोन वेगवेगळ्या आणि एकमेकींच्या विरुद्ध प्रकृतीच्या बाबी आहेत, असेच आपल्या मनावर बिंबवले जाते. यथावकाश, प्रपंच आणि परमार्थ या जोडगोळीची गाठ घातली जाते प्रवृत्ती आणि निवृत्ती या दुकलीशी. प्रपंचातून निवृत्त झाल्यावर परमार्थाला लागायचे, हे समीकरण उत्क्रांत होते त्यातूनच. या पद्धतीने विचार करत आपण आपल्या जगण्याची जणू कप्पेबंद विभागणीच करून टाकतो. अशा विभागणीतून निपजते द्वंद्व आणि परिणामी आपले सगळे जगणेच द्वंद्वमय होऊन जाते. आपण या प्रपंचात शेंडीपर्यंत ‘अडकलेलो’ असल्याने ‘श्रेष्ठ’ अशा पारमार्थिक जीवनापासून आपण वंचित आहोत, या द्वंद्व भावनेने कष्टी झालेले बहुसंख्य लोक प्रपंचात एक प्रकारच्या अपराधी भावनेने जगत असतात.
जगण्यातील या द्वंद्वाचा निरास घडवून आणण्यासाठी संतांनी आधार घेतला तो भागवत धर्माचा. भागवत धर्माचे संस्कार मराठी मनावर करणे, हा संतांचा महाराष्ट्रावरील सर्वात मोठा उपकार होय. जगण्याकडे बघण्याची सुदृढ, निकोप आणि रसरशीत दृष्टी आपल्याला शिकविली ती भागवत धर्माने. जबाबदार, संस्कारित आणि नीतिमय प्रपंचनिष्ठा केंद्रवर्ती ठेवणाऱ्या भागवत धर्माचे जागरण मराठी भूमीत घडवून आणून सामाजिक परिवर्तनाच्या एका व्यापक प्रयत्नाचे बीजारोपण संतविचाराने महाराष्ट्रात केले. संतांच्या या अचाट कार्याचे मर्म समजायला हवे असेल, तर प्रथम भागवत धर्माचे वर्म आपल्याला उमजले पाहिजे.
भगवंताच्या भक्तांना म्हणतात, ‘भागवत’. अशा भागवतांची कर्तव्ये अथवा आचार म्हणजे ‘भागवत धर्म’. संतांनी ज्या भागवत धर्माची ध्वजा महाराष्ट्रात उभारली त्या भागवत धर्माचा उगम ज्या धर्मविचारातून झालेला आहे त्या धर्माचे नाव ‘नारायणीय’. या नारायणीय धर्माचे विवरण सापडते महाभारतात. ही सगळीच खूप मजा आहे. महाभारतीय युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिराने पितामह भीष्मांना दोन प्रश्न विचारले. ‘गृहस्थाश्रमी लोकांचा श्रेष्ठ धर्म कोणता?’, हा त्या दोहोंतील पहिला प्रश्न. तर, ‘प्रपंचातील घात-आघातांनी मनाला जे क्लेश होतात ते उद्भवूच नयेत अशी बुद्धी सांगणारा धर्म कोणता?’ हा झाला दुसरा प्रश्न. या दोन्ही प्रश्नांना भीष्मांनी एकच उत्तर दिले - नारायणीय धर्म! गृहस्थाश्रमी लोकांचा श्रेष्ठ धर्म म्हणजे नारायणीय धर्म, असे भीष्मांचे उत्तर लक्षणीय ठरते कारण नारायणीय धर्म हा निखळ प्रवृत्तिपर धर्म आहे. अशा प्रवृत्तिपर नारायणीय धर्मातून भागवत धर्माचा उगम झालेला आहे. लोकहिताच्या विचाराला नारायणीय धर्मात महत्त्वाचे स्थान आहे; तर, प्रपंचनिष्ठा हा त्या नारायणीय धर्माच्या मुख्य घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक. सर्वसामान्य जनमानसावर या प्रवृत्तिपर नारायणीय धर्माचा प्रभाव इसवीसनाच्या  आठव्या-नवव्या शतकापर्यंत होता, असा तज्ज्ञांचा दाखला आहे. निवृत्तिवादी विचारसरणीने प्रवृत्तिपर जीवनदृष्टीवर कुरघोडी केली ती १० व्या शतकापासून पुढे.
नारायणीय धर्म आणि त्यातून उगम पावलेला भागवत धर्म ‘प्रवृत्तिपर’ आहे म्हणजे नेमके काय, याचाही उलगडा करून घ्यायला हवा. व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनाची भरभराट घडून यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, हा ‘प्रवृत्ती’ या शब्दाचा अर्थ. तर, ‘संन्यास न घेता, वाटय़ाला आलेले कर्म आमरणान्त करीत राहणे,’ असा ‘प्रवृत्ती’ या संकल्पनेचा अर्थ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या सुरुवातीस स्पष्ट करतात. भागवत धर्म हा ‘प्रवृत्तिपर’ आहे तो या अर्थाने. ऐहिक जीवनाचा अभ्युदय इथे गाभाबिंदू आहे. भागवत धर्माचे हे प्रवृत्तिपर रूप लोकमान्यांनी अधोरेखित केलेले आहे त्यांच्या ‘गीतारहस्या’त. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश हा प्रवृत्तिपर भागवत धर्माचाच आहे, असे लोकमान्यांचे प्रतिपादन. गीता धर्म म्हणजेच भागवत धर्म, असा स्वच्छ आणि स्पष्ट खुलासा लोकमान्य करतात. साहजिकच, भागवत धर्म आणि नारायणीय धर्म हे दोन्ही लोकमान्यांच्या लेखी एकच आहेत. गीतेमध्ये उपदेशलेला धर्म हा प्रवृत्तिपर भागवत धर्मच असल्याने गीतार्थाची उकल कर्मयोगाच्या अंगाने करण्यास लोकमान्यांना मुळीच ओढाताण करावी लागली नाही.
अशा प्रवृत्तिपर भागवत धर्मविचाराला संजीवनी प्रदान करण्यासाठी १३ व्या शतकात ज्ञानदेवांना भगवद्गीतेचाच आधार का सवरेचित वाटला, त्याचे रहस्य इथे असे उलगडते. १० व्या शतकापासून पुढे समाजमनावर पगडा बसत चाललेल्या निवृत्तिपर, ऐहिक जीवनविन्मुख विचारसरणीचा सामना करायला आवश्यक असणारा परंपरामान्य तत्त्वविचार ज्ञानदेवांच्या हाताशी होता तो प्रवृत्तिपर जीवनदृष्टीचा परिपोष करणाऱ्या भागवत धर्माचा उच्चार करणाऱ्या गीतार्थाच्या रूपाने. ज्ञानदेवांची शैवागमाची तत्त्वज्ञान परंपराही निखळ ‘सेक्युलर’ असल्याने प्रवृत्तिपर भागवत धर्मविचार तिच्याशी सुसंवादीच होता. गीताग्रंथावर टीकाभाष्य करण्याच्या ‘मिषाने’ ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ नावाचा ‘गीता-अलंकार’ सिद्ध केला तो गीतेमधील प्रवृत्तिपर भागवत धर्मविचार लोकभाषा ‘मऱ्हाटी’ मध्ये मंडित करून समाजासमोर मांडण्यासाठी! तर, मूळ गीतेमध्ये प्रवृत्तिपर कर्मयोगी जीवनमार्गाचा उपदेशच प्रधान आहे, या निष्ठेतून तोच उपदेश प्रकर्षांने प्रकाशमान करण्यासाठी लोकमान्यांनी ‘गीतारहस्य’ हा प्रबंध सिद्ध केला २० व्या शतकात. म्हणजेच, व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनाची धारणा करणारा गीताप्रणीत प्रवृत्तिपर भागवत धर्मविचार या मराठी मातीत रुजावा यासाठी या भूमीतील प्रयत्न १३ व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत असे अव्याहत सुरूच राहिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ आणि सेनापती बापटांची ‘गांवगीता’ म्हणजे याच सगळ्या प्रयत्नवादाचे पुढील पर्व.
संतांच्या कार्याचे हे मर्म लोकमान्यांना अचूक उमजले परंतु इतिहासाचार्य राजवाडय़ांना मात्र ते उमगले नाही. राजवाडे नेमके तिथेच चकले! त्यातून मोठाच अनर्थ घडला. प्रवृत्तिपर भागवत धर्माचे पुनरुत्थान करणाऱ्या संतपरंपरेवर ‘निवृत्तिवादी’ असा शिक्का मारला गेल्याने संतांच्या मांदियाळीत  ‘निवृत्तिवादी’ आणि ‘प्रवृत्तिवादी’ अशी दुफळी निर्माण केली गेली. आजचा सर्वात मोठा दुर्दैवी विरोधाभास म्हणजे, इतिहासाचार्याच्या संशोधक दृष्टीतील तोच विकारांश मनोभावे जोपासून तीच दुफळी अधिकच रुंदावण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरूच आहेत! भक्ती करणे म्हणजे निवृत्तीच्या पंथाला लागणे, या अडाणी समजुतीचा चढवलेला चष्मा काढून ठेवायला आपण आजही तयार नाही. ‘भक्तिपंथाचा परिपोष करीत असतानाच संतांनी प्रपंचाचा त्याग करायला सांगितले नाही हे संतांच्या कार्याचे मोठेच वैशिष्टय़’ अशा आशयाची शुद्ध अज्ञानजन्य परंतु हमखास टाळी घेणारी वाक्ये फेकण्याची आमची हौस अजूनही उतरायला तयार नाही.
प्रपंच आणि परमार्थ यात भागवत धर्म द्वंद्व मानत नाही. नीतिमय आणि लोकहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून केलेला प्रपंच हाच परमार्थ, अशी संतांची धारणा आहे. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ ही ज्ञानदेवांची विश्वव्यापी प्रेरणा उमलते ती त्याच धारणेतून. त्यामुळे परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडण्याची भाषा भागवत धर्माला सहनच होत नाही. ‘जयाचे ऐहिक धड नाही’ त्याला परमार्थ काय झेपणार, असा प्रश्न ज्ञानदेव ‘ज्ञानेश्वरी’मध्ये सुरुवातीलाच विचारतात; तर, ‘प्रपंच सांडूनि परमार्थ केला। तरी अन्न मिळेना खायला,’ अशी दुर्दशा झालेल्या ‘करंटय़ाला’ काय परमार्थ साधणार, असा सवाल त्यानंतर चार शतकांनी समर्थ करतात.
या सगळ्या चर्चेवर सर्वार्थाने कळस चढवतात आमचे तुकोबा! परमार्थाच्या प्रांतातील पानही ज्या वैराग्यावाचून हालत नाही त्या वैराग्याची प्राप्ती प्रपंचातच होते, असे तुकोबा स्वानुभवाने सांगतात. परमार्थाच्या प्रांतातील वाटचाल ज्या वैराग्याच्या बळावर करायची त्या वैराग्याची प्राप्ती करून देणारे ‘परमपद’ म्हणजे प्रपंच, असा तुकोबा प्रपंचाचा गौरव करतात. ‘तुका म्हणे हे चिं आश्रमाचे फळा। परमपद बळ वैराग्याचे,’ हे तुकोबांचे कथन म्हणजे प्रवृत्तिपर भागवत धर्माचे गाभासूत्र होय. निकोप ऐहिक जीवनाचे वर्म ज्या प्रवृत्तिपर भागवत धर्मात एकवटलेले आहे त्याचे जागरण करणे हेच आमचे जीवितकार्य आहे, असे उद्घोषित करणारे, ‘आम्हां सांपडले वर्म। करूं भागवत धर्म,’ हे नामदेवांचे प्रतिज्ञावचन म्हणजे संतकार्याचे प्रधानसूत्रच जणू!