पसाय-धन : .. नीति जियाली दिसे Print

अभय टिळक, शुक्रवार, २५ मे  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘विकास अधिक होणे आणि क्षमता अधिक येणे’, हाच भागवत धर्माचा हेतू होय’ असे स्पष्ट करणारे न्या. रानडे यांनी संतप्रवृत्तीची सांगड नीतीशी आहे, हे ओळखले होते.. भक्तीऐवजी संतांचा नीतीवर भर का, याचे उत्तर भागवतधर्माच्या गाभ्यातच आहे..
संतविचार आपल्याला शिकवण देतो ती भक्तीची की नीतीची?  सर्वसामान्यपणे या प्रश्नाचे उत्तर, ‘संतांनी आम्हाला भक्ती शिकविली’, असेच येईल.

अर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण, मुळात भागवत धर्मच भक्तिप्रधान आहे! आता, संतांनी आम्हाला जर का भक्तीचे पाठ शिकवलेले असतील तर आज ‘भक्ती’ अथवा ‘परमार्थ’ म्हणून जे काही आपल्यासमोर नित्य साकारते त्यात ओंगळ अनाचाराचा बडिवार माजलेला का दिसतो? निवडणुका जवळ आल्या की काशी-हरिद्वारच्या यात्रांचे दणक्यात आयोजन करणे, हा इच्छुक उमेदवारांच्या आचारसंहितेचा जणू आवश्यक भागच बनलेला आहे. जत्थ्याने तीर्थाटन करून आलेले भक्त भाविक (?) ‘या माणसाने एवढय़ा लोकांना एका वेळी तीर्थयात्रा घडवण्याइतका पैसा आणला कोठून?’ या प्रश्नाने अस्वस्थ झालेले दिसत नाहीत. बेहिशेबी पैशाने करवून आणलेल्या अशा तीर्थयात्रेला ‘भक्ती’ म्हणायचे का? हे एवढय़ावरच थांबत नाही. मतदार संघातील लहानमोठय़ा मंदिरांची डागडुजी वा नूतनीकरण घडवून आणण्यापासून ते भजनमंडळींना भजनाचे साहित्य वाटण्यापर्यंत या भक्तिगंगेला पूर येतो! हा सगळा असा धुमधडाका बघितला की, ‘संतांना अभिप्रेत असलेल्या भक्ती संकल्पनेची नीतीपासून एवढी घाऊक फारकत झालेली आहे का?’ अशी शंका मनात उद्भवल्यावाचून राहात नाही. या शंकेचे निराकरण करायचे तर आपल्याला भागवत धर्माच्या गाभ्याकडे जायला हवे.
श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत हे भागवत धर्माचे दोन अधिष्ठान ग्रंथ. या दोहोंत एक आंतरिक सुसंगती आहे. योगेश्वर श्रीकृष्ण हा उभय ग्रंथांचा कर्ता; किंबहुना, ‘गीता’ आणि ‘भागवत’ हे दोन ग्रंथ म्हणजे सम्यक् श्रीकृष्ण दर्शनच जणू. गीतेमध्ये श्रीकृष्ण नामक विभूतीचे तत्त्वदर्शन घडते, तर भागवतामध्ये लीलादर्शन. आता, प्रत्यक्ष भगवंताने प्रवर्तित केलेला धर्म म्हणजे ‘भागवत धर्म’ अशी भागवत धर्माची व्याख्याच असल्याने, श्रीकृष्णाप्रमाणेच भागवत धर्माचेही अंतरंग यथार्थाने उमटते ते ‘गीता’ आणि ‘भागवत’ याच दोन ग्रंथात. या दोन ग्रंथांमधील आंतरिक नाते आणि त्यात भागवत धर्माच्या मूलतत्त्वांचे डोकावणारे प्रतिबिंब अधोरेखित केलेले आहे लोकमान्य टिळकांनी. भागवत धर्माच्या कर्मपर प्रवृत्ती तत्त्वाचे विवेचन श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आपल्याला सापडते; तर त्याच भागवत धर्मातील भक्तीचे रहस्य श्रीमद्भागवतामध्ये विशद केलेले आहे, अशी लोकमान्यांची उपपत्ती. भक्तीखेरीज निष्काम कर्म फुकट आहे, म्हणून कर्माला जोड हवी भक्तीची, या भागवत धर्माच्या शिकवणुकीचे सूचन ‘गीता-भागवत’ या जोड संज्ञेद्वारे घडते. ‘गीता-भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे’ हा भागवत धर्मीयांचा आचारधर्म तुकोबा स्पष्ट करतात, त्या मागील विचारसूत्र हेच.
प्रवृत्तिपर कर्माला भक्तीची जोड हवी, या भागवत धर्माच्या प्रतिपादनात कर्म आणि नीती यांचे साहचर्य अनुस्युत आहे. लौकिक अभ्युदयासाठी प्रयत्नांची जी पराकाष्ठा करायची तिच्याद्वारे व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवन संपन्न बनायचे असेल, तर अशा प्रवृत्तीपर कर्माला नीतीचे अस्तर हवे, हे उघड आहे. कारण, नैतिकतेचे अस्तर नसलेली कर्मप्रवृत्ती तामसी आणि म्हणूनच समाजविघातक ठरण्याची शक्यता बळकट असते. त्यामुळे, कर्मपर प्रवृत्तितत्त्वाला भक्तीची जोड पुरवत असतानाच त्या भक्तीला नीतीचे अस्तर जोडण्याचे अलौकिक भान संतांनी प्रगट केले. त्यासाठी ‘भक्ती’ या संकल्पनेची अभिनव आणि लौकिक व्यवहाराचा पोत उन्नत बनविणारी व्याख्या भागवतधर्मी संतांनी सिद्ध केली.
ही व्याख्या ज्ञानदेवांनी मांडलेली आहे ती ज्ञानदेवीच्या नवव्या अध्यायात. गीतेच्या नवव्या अध्यायातील १३ व्या श्लोकावरील भाष्यात दैवी प्रकृतीच्या साधुचरित भक्तांचे लक्षण सांगताना ज्ञानदेवांनी मोठय़ा मार्मिकपणे भक्तितत्त्वाचा गौरव केलेला आहे. भक्तितत्त्वाची प्राप्ती ज्याला झाली असा भक्त प्रत्यक्ष मोक्षालाही गणत नाही, असे ओवीच्या पूर्वार्धात स्पष्ट करून अशा भक्ताची अंतरंग खूण त्याच ओवीच्या उत्तरार्धात मांडताना ज्ञानदेव म्हणतात- ‘‘जयांचिये लीलेमाजी नीति। जियाली दिसे।।’’ इथे, ‘लीला’ या शब्दाचा अर्थ आहे - सहज कर्माचरण. ज्याला भक्तितत्त्व हस्तगत झालेले आहे तो भक्त मोक्षाची पत्रास बाळगत नाही, एवढेच केवळ नव्हे, तर अशा त्या भक्ताच्या सहज कर्माचरणाद्वारेही मूर्तिमंत, जिवंत नीतीचे दर्शन आपल्याला घडते, असे ज्ञानदेव स्पष्ट करतात. ‘भक्ती’ या संतप्रणीत संकल्पनेचा सांधा नीतीशी अभिन्नपणे जुळलेला आहे, तो असा! जो भक्त आहे तो नीतीच्या आचरणाचा पुतळा असतो, अथवा असलाच पाहिजे, ही भागवत धर्माची अनिवार्य अट  ठरते. जो भक्तिवान असतो तो नीतिवान असलाच पाहिजे; किंबहुना, जो नीतिवान असेल, तोच भक्तिवान म्हणता येतो, हा भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तितत्त्वाचा गाभा आहे.
ज्ञानदेवांनी केलेली भक्तीची ही अशी नीतिप्रधान व्याख्या संतविचाराचे अधिष्ठान असणाऱ्या अद्वय तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशीच आहे. शैवागमानुसार संपूर्ण जग म्हणजे शिवचैतन्याचे विलसन होय. त्यामुळे, या विश्वातील एकही जीवमात्र मुळात त्या शिवतत्त्वापासून विभक्त नाहीच. त्यामुळे यच्चयावत जीव स्वरूपत: (वि-भक्त नसलेले) ‘भक्त’च आहेत! म्हणजेच, शैवागमाच्या प्रतिपादनानुसार भक्ती हे साध्य नाही आणि साधनही नाही. भक्ती म्हणजे ऐक्याची अवस्था! त्यामुळे भक्ती ही स्वयंसिद्ध , जन्मजात आहे. त्यामुळे, जीवनात साध्य म्हणून जर काही असेल तर ती नीती; भक्ती नव्हे. या मराठी भूमीतील संतप्रणीत भक्तिविचार नीतिप्रधान आहे तो असा व या अर्थाने.
हा नीतिविचारच ज्ञानदेवांच्या पसायदानाचा मेरूदंड होय. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’, हेच ज्ञानदेवांचे विश्वात्मक देवाकडे असलेले आद्य मागणे. ‘व्यंकटी’ म्हणजे वाकडी बुद्धी. या पृथ्वीतलावर जीवन व्यतीत करणाऱ्या प्रत्येक जीवाला त्रलोक्यातील सर्व सुखांच्या प्राप्तीमुळे होणाऱ्या आनंदाची प्राप्ती घडायची असेल तर, मनुष्यमात्रांच्या ठायी निर्माण होणाऱ्या ‘व्यंकटी’चा, म्हणजे अनीतीच्या वाकडय़ा मार्गाकडे चालणाऱ्या बुद्धीचा निरास होवो, हाच ‘पसाय’ (म्हणजे ‘प्रसाद’) ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे दान म्हणून मागतात. पसायदानाच्या याचनेमागील प्रेरणा ही अशी विशुद्ध ऐहिक आहे. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ इतके सवंग मागणे मागण्याइतके ज्ञानदेव खुळे का होते? मनुष्याने प्रथम ‘व्यंकटी’ चा त्याग करावा, ही पूर्व अट ज्ञानदेवांनी घालून ठेवलेली आहे. प्रत्येक जीव नीतिमान बनावा, ही अपेक्षा म्हणजे पसायदानाचा गाभा होय. आमच्या संपूर्ण संत परंपरेत विचाराचा हा धागा अक्षुण्ण आहे. ‘दुर्बुद्धी ते मना। कदा नुपजो नारायणा’, अशी प्रार्थना करणाऱ्या तुकोबांच्या वाणीमधून उमटते ती प्रेरणा पसायदानाचीच.
कर्मपर प्रवृत्तीला भक्तीची जोड, त्या भक्तीला नीतीचे अस्तर आणि जीवन नीतिमय बनावे ही प्रेरणा, हे भागवत धर्माचे त्रिपदरी रहस्य होय. सुखप्रधान नव्हे तर नीतिपरायण जीवन प्रणाली हे भागवत धर्माचे ईप्सित आणि त्या ईप्सितातच या धर्माचे आगळेपण सामावलेले आहे, हे अचूक ओळखले ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. ‘सुख हे भागवत धर्माचे साध्य नव्हे’, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी एका व्याख्यानात मांडून, ‘विकास अधिक होणे आणि क्षमता अधिक येणे’, हाच भागवत धर्माचा हेतू होय असे नि:संदिग्धपणे सांगितले. मनुष्यमात्राला सुसंस्कारित आणि ‘नागर’ बनवणे हाच भागवत धर्माचा आद्यहेतू आणि विकास साधत प्रतिक्षणी उन्नत बनण्यासाठी सतत प्रगमनशील संघर्ष म्हणजेच धर्माचरण, अशी उपपत्ती मांडत न्यायमूर्ती रानडय़ांनी या बाबतीत समोर आदर्श ठेवला तो तुकोबांचा.
संतप्रणीत भक्तीची नीतीशी अशी जैविक सांगड आहे. भक्ती आणि नीती यांची सोयीस्कर फारकत केलेली आहे ती आपण. त्यामुळेच, अशी सवंग भक्ती आपल्याला सोपी वाटते! अशा कथित भक्तीला आज सर्वत्र उधाण आलेले दिसते ते त्यापायीच. आपल्याला इतकी ‘सोपी’ वाटणारी भक्ती तुकोबांना मात्र ‘कठीण’ आणि जणू ‘सुळावरील पोळी’ वाटते, या विरोधाभासाचे समाधान कसे करायचे? तुकोबांना भक्ती म्हणजे सुळावरची पोळी वाटते कारण तिथे अपेक्षित आहे मनावर सदैव रोखलेला नीतीचा अंकुश. नीतीचा हा अंकुश प्रतिक्षणी मनावर उगारलेला असेल तरच भक्तीची परिणती ‘जागृतीचा दिस’ नित्य नव्याने उजाडण्यात होते. इथे आपण नीतीच्या अंकुशालाच फाटा दिलेला आहे!