पसाय-धन : वैष्णव चालिले गर्जत.. Print

अभय टिळक ,शुक्रवार, २२ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सत्विचार रुजवू पाहणारे मुळातील अल्पसंख्य विखुरलेले असतील तर त्यांचा आवाज दडपून टाकणे आसुरी प्रवृत्तींना सहजशक्य बनते.. अशा वेळी सत्विचारांचे आणि प्रवृत्तींचे रोपण-संगोपन समाजात घडावे यासाठी समूहरूपाने कार्यरत असणाऱ्या वैष्णववीरांचा चालता फिरता मेळा म्हणजे आषाढीची पायवारी

संतविचार हा व्यक्तिप्रधान नाही. संपूर्ण समाज आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचे हित, हा संतविचाराचा केंद्रबिंदू होय. भागवतधर्मीय संतविचाराचे हे मुख्य वैशिष्टय़. मुक्तीची मातबरी संतविचाराला कधीच वाटली नाही. समजा, ‘मुक्ती’ हे अंतिम ध्येय म्हणून नजरेसमोर ठेवायचेच, तर संतांना व्यक्तिगत मुक्तीपेक्षाही सामूहिक मुक्तीचेच ध्येय प्रेयस वाटले असते, हे नि:संशय! ‘पुरुषार्थ’ या संकल्पनेची व्याख्याही, संतांच्या लेखी, समूहभावनेशीच जोडलेली आहे. एकटय़ाने भवसागर तरून जाणे यात काय पुरुषार्थ? आपण तरून जगाला तारणे, ही संतांच्या दृष्टीने पुरुषार्थाची कसोटी. ‘तुम्ही तरुनी विश्व तारा’, असा आवाहनवजा उपदेश मुक्ताबाई ‘ताटीच्या अभंगां’त ज्ञानदेवांना करतात, त्या मागील वर्म हेच. ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। उतरावया भवसागर रे’, ही तुकोक्ती म्हणजे संतकुळीच्या मनीमानसी अहोरात्र वसणाऱ्या समाजप्रेमाचा पडसादच जणू. परंतु त्याच तुकोबांना एके ठिकाणी पायवाटसुद्धा अपुरी वाटू लागते. पायवाटेवरून तरी एका वेळी किती माणसे जाऊ शकतील? संपूर्ण समाजाचेच उन्नयन घडायचे तर आत्मोन्नतीची पायवाट नव्हे तर चांगला ऐसपैस राजमार्गच हवा! असा राजमार्ग तयार करणे, हा संतकार्याचा गाभा आहे. ‘मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर। केला राज्यभार चाले ऐसा।।’ या शब्दांत तुकोबा संतांच्या मांदियाळीचे नेमके कार्यकर्तृत्व मांडतात. ही अशी सवरेदार सर्वसमावेशकता (इन्क्लुझिव्हिटी) हे भागवतधर्माचे आगळेपण ठरते.
संतविचारातील ही समूहप्रधानता आपल्याला ठायी ठायी प्रतीत होते. भजन-कीर्तन हे ईश्वराधनेचे संतपुरस्कृत मार्ग समूहभक्तीच शिकवतात. पंढरीची पायवारी म्हणजे तर अशा सामूहिक भक्तीचे गतिमान दर्शनच! वारीला जाणारे वारकरी एकेकटय़ाने प्रवास करत असले तरी वाटचाल मात्र करतात दिंडीतून. ‘दिंडी’ म्हणजे वारकऱ्यांचा समूह. ‘होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।’ असे तुकोबा जे म्हणतात त्यात फार मोठा अर्थ आहे. ‘वारकरी’ होऊन पंढरीला जाणे म्हणजे दिंडीतून जाणे. व्यक्तिगत आणि सामूहिक अशा भक्तीच्या उभय परिमाणांची अनुभूती येते ती दिंडीत वाटचाल करताना. संतविचाराच्या समाजसन्मुखतेचे दर्शन घडते दिंडीत. पंढरीच्या वाटेवर पाऊल घालणारा वारकरी एकाच वेळी एकटाही असतो आणि समाजाशी जोडलेलाही असतो. वाहत्या नदीच्या पृष्ठभागावर उमटणाऱ्या लाटेसारखा हा नातेसंबंध. म्हटले तर प्रत्येकच लाट ही पृथक असते. पण तीच पृथक लाट नदीच्या प्रवाहाशी अभिन्नपणे जोडलेली असते. नदीचे लघुरूप म्हणजे लाट, तर त्याच लाटेचे व्यापक रूप म्हणजे नदी. संतविचाराचे अधिष्ठान असणाऱ्या आगम तत्त्वज्ञानातील शिवतत्त्वाच्या विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण (एकाकी) अशा दोन्ही रूपांचे दर्शन पंढरीच्या पायवारीत घडते. भागवतधर्मप्रणीत लोकाभिमुख नीतिमय भक्तिविचाराचा लघुतम (विश्वोत्तीर्ण) आविष्कार म्हणजे वारकरी, तर त्याच साधनेचे विश्वात्मक परिमाण म्हणजे अगणित दिंडय़ांनी मोहोरलेला पालखी सोहळा. आषाढीची पायवारी ही संतविचाराचे अधिष्ठान असणाऱ्या आगम तत्त्वज्ञानाचे मूर्त दर्शन घडवते ते असे.
साधारणपणे १३व्या शतकापासून या मराठी प्रदेशात संतविचाराने जे परिवर्तन घडवून आणले ते बाह्यत: आध्यात्मिक आणि सामाजिक स्वरूपाचे होते यात वादच नाही. परंतु त्या परिवर्तनाच्या मुळाशी एक अत्यंत मूलभूत असे मूल्यात्मक स्थित्यंतर सक्रिय होते, याचा विसर पडून चालणारे नाही. शतकानुशतके संपूर्ण समाजावर हुकमत चालविणाऱ्या एका बलाढय़ आणि बंदिस्त आचारविचारप्रणालीला संतविचाराच्या रूपाने एक पर्याय उभा ठाकत होता. खास मार्क्‍सवादी परिभाषा वापरायची तर या भूमीवर प्रगाढ पकड राखणाऱ्या निगमदर्शनरूपी ‘थिसिस’समोर आगमप्रणीत संतविचाराचा ‘अँटिथिसिस’ साकारत होता. त्यामुळे हा सगळाच कालखंड आणि ती सगळीच प्रक्रिया प्रचंड संक्रमणशील आणि पर्यायाने संघर्षप्रवण होती. स्थित्यंतराचा कोणताही कालखंड हा संघर्षमय असतोच. कारण, कोणताही नवीन विचार अथवा दर्शन समाजमनात रुजत असताना त्या ठिकाणी पूर्वापार प्रस्थापित झालेल्या विचारप्रणालीशी घर्षण अपरिहार्यच ठरते.
नेमका असाच संघर्ष संतांना त्यांच्या हयातीतच अहोरात्र करावा लागला. त्या संघर्षांत धारण करावा लागणारा लढाऊ बाणा, त्यामुळेच संतविचारात ठिकठिकाणी प्रत्ययास येतो. संतांना करावा लागलेला तो संघर्ष, ढोबळ मानाने, तीन पातळय़ांवरचा होता. पूर्वापार प्रस्थापित अशा संकुचित आणि भेदाभेदप्रवण वैदिक धर्मविचाराचा मुकाबला, हा झाला आद्य संघर्ष. कथित धर्माचरणाच्या नावाखाली समाजात चौफेर बोकाळलेल्या विकृत श्रद्धा-संकेत-रूढी व त्यांचे आविष्करण घडविणाऱ्या अवनत उपासनापद्धती व कर्माचार यांच्या विरोधातील लढा, ही झाली त्या संघर्षांची दुसरी आघाडी. तर या सगळय़ा प्रक्रियेत स्वत:चे आंतरिक उन्नयन घडवून आणताना स्वत:मधीलच शूद्र, अभद्र, संकुचित, अमंगल भावभावना, विचार, प्रेरणा, वासना यांचे उच्चाटन करण्यासाठी छेडलेले युद्ध हे झाले त्या संघर्षांचे तिसरे परिमाण! हा तिसऱ्या पातळीवरील संघर्ष सर्वाधिक सूक्ष्म, व्यापक आणि म्हणूनच सर्वाधिक कसोटी पाहणारा. ‘रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग। अंतर्बाहय़ जग आणि मन।।’, हे तुकोबांचे आत्मप्रचितीचे बोल याच त्रिपदरी संघर्षांचा निर्देश करतात.
युद्ध लढायचे तर त्यासाठी शस्त्रसज्ज सैनिकांच्या फौजा लागतात. विशेष म्हणजे, व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनातील कुप्रवृत्तींविरुद्ध पुकारलेले युद्ध हे स्वरूपत: निरंतर चालणारे असते. संतविचारात केंद्रस्थानी असलेल्या समूहविचाराचे परिमाण आपण या संदर्भातही आवर्जून ध्यानी घेतले पाहिजे. सत्प्रवृत्ती आणि सत्विचार यांचे बीजारोपण करायचे तर कुप्रवृत्तींशी लढा द्यावाच लागतो. सत्प्रवृत्त लोक आणि दुष्प्रवृत्त दैत्य यांचे समाजातील प्रमाण कायमच व्यस्त असते. त्यामुळे सत्विचार रुजवू पाहणारे मुळातील अल्पसंख्य विखुरलेले असतील तर त्यांचा आवाज दडपून टाकणे आसुरी प्रवृत्तींना सहजशक्य बनते. आपल्या समाजातील ‘व्हिसल ब्लोअर्स’ची आजची अवस्था आपण पाहतोच आहोत.
शुद्ध, सात्त्विक, मंगल विचारांचे आणि प्रवृत्तींचे रोपण-संगोपन समाजात घडावे यासाठी समूहरूपाने कार्यरत असणाऱ्या वैष्णववीरांचा चालता फिरता मेळा म्हणजे आषाढीची पायवारी. वारकऱ्यांच्या दिंडय़ा म्हणजे दुष्प्रवृत्तींवर चाल करून निघालेल्या सैनिकांच्या जणू तुकडय़ाच! हा स्वैर कल्पनाविलास नाही. हे रूपक आहे खुद्द ज्ञानोबा-तुकोबांचे. समाजातील दुरितांचा अंधार दूर करण्यासाठी कटिबद्ध झालेल्या वीरांच्या गतिमान वाटचालीचे वर्णन, ‘वैष्णव चालिले गर्जत। महावीर ते अद्भुत’, अशाच शब्दांत ज्ञानदेव करतात. तुकोबांची साक्ष काढायची तर हे वीर हातामध्ये ‘रामनामांकित’ बाण घेऊन चाल करायला सिद्ध झालेले आहेत. वारकऱ्यांना ज्ञानदेव ‘वीर विठ्ठलाचे सुभट’, अशा शब्दांतच संबोधतात. प्रेम आणि समता अशा शाश्वत, सात्त्विक मानवी मूल्यांचा परिपोष करण्यासाठी आक्रमकपणे सक्रिय बनलेले हे वीर पाहून ‘भेणे जाहले दिक्पट। पळती थाट दोषांचे’ असा माहौल सर्वत्र अवतरला, अशी ज्ञानदेवांची भावना आहे. तर याच वैष्णववीरांचे प्रतिनिधित्व स्वीकारलेले तुकोबा, ‘आम्ही वीर जुंझार। करू जमदाढे वार’, अशा प्रेरक शब्दांत वैष्णववीरांच्या अंगीकृत कार्याचे सूचन घडवतात. या वीरांनी व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनातील कुप्रवृत्ती व पापबुद्धीवर कसून हल्ला चढविल्याने ‘मोड जाला दोषांचा,’ अशी विमलावस्था सृष्टीत प्रगटली, असे तुकोबा कथन करतात. ‘वारी’ आणि ‘वारकरी’ यांचे संतांना अभिप्रेत असलेले रूप-स्वरूप हे असे आहे. या दृष्टीने आपण वारी पाहतो, अनुभवतो का?