पसाय-धन : अवघिया पुरतें वोसंडलें पात्र.. Print

अभय टिळक ,शुक्रवार, २० जुलै  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सर्वसमावेशकता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नयनाची तळमळ हा संतविचार आणि संतआचार यांचा गाभा. सर्व समाजाच्या आध्यात्मिक-सांस्कृतिक उन्नयनासाठी संतांनी भक्तितत्त्वाचा डांगोरा पिटला. सर्वसमावेशकता या संतविचाराच्या गाभामूल्याशी भक्तीचे असलेले नाते असे स्वाभाविक आणि जैविक आहे..


‘आकाश कोसळून पडले माझ्या अंगावर तरी त्यावर पाय ठेवून मी उभा राहेन..’, असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे एक वाक्य आहे. लोकमान्यांच्या अशरण वृत्तीचा दाखला देते वेळी ते उद्धृत केले जाते. हे वचन विलक्षण तेजस्वी आहे, यात वादच नाही. परंतु, या वाक्याचा उत्तरार्ध अधिक रसरशीत आहे. ‘पायाखाली आलेल्या त्या आभाळाचा विनियोग स्वराज्यप्राप्तीच्या माझ्या अंगीकृत कामासाठी कसा करून घेता येईल, याचा विचार पुढच्या क्षणापासून मी करायला लागेन,’ असा त्या वाक्याचा उर्वरित अर्धाश. आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीमध्ये घडवून आणण्याची ही धमक, प्रतिकूलतेचा वेढा चौफेर पडलेला असला तरी त्यातून अनुकूलतेची एखादी फट शोधून तिचा राजमार्ग बनवण्यासाठी धडपडण्याची अशी अदम्य ऊर्मी लोकमान्यांमध्ये कोठून आली असावी, असे कुतूहल मग इथे जागृत होते. संतविचाराच्या वारशामधून लोकमान्यांनी ही जीवनदृष्टी उचलली असावी, असे मानण्यास भरपूर जागा आहे.
मराठी मातीला लाभलेल्या संतविचाराच्या पाथेयामधून अंगीकृत कार्यासाठी प्रेरणा आणि दिशा घेणाऱ्यांत थेट महात्मा फुल्यांपासून तुकडोजी महाराजांपर्यंतच्या द्रष्टय़ांची एक भरगच्च मालिकाच महाराष्ट्रात सापडते. न्या. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सगळी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे त्याच मालिकेतील. या मांदियाळीत टिळकही बसतात. संतविचाराचा टिळकांना चांगला परिचय होता. ‘गीतारहस्या’त तुकोबांच्या वचनांची ठायी ठायी झालेली पखरण टिळकांच्या व्यासंगाची साक्ष पुरवते. अंगावर कोसळलेल्या आपत्तीला इष्टापत्ती मानणे, हा खास तुकोबांचा बाणा. इ.स. १६३० ते १६३२ च्या दरम्यान दख्खन प्रांतात पडलेल्या दुष्काळाने तुकोबांचे सर्वस्व हरण केले. परंतु, त्या नैसर्गिक अरिष्टापायी  लौकिक व्यवहाराबाबतची प्रगाढ अनासक्ती तुकोबांच्या ठायी स्थिर झाली. त्यामुळे, दुष्काळ ही तुकोबा इष्टापत्ती मानतात. ‘बरें जालें देवा निघालें दिवाळें। बरी या दुष्काळें पीडा केली।।’  हे तुकोबांचे उद्गार त्याच भावनेचे द्योतक होत. या संकटाद्वारे, शाश्वत-अशाश्वताचा नेमका उलगडा होऊन, ‘अनुतापें तुझें राहिलें चिंतन। जाला हा वमन संवसार।।’ हे विचारातील परिवर्तन घडून आले त्यामुळे अवर्षण पथ्यावर पडले, अशी तुकोबांची धारणा. प्रतिकूलतेमुळे खचून न जाता तिच्यावर मात करण्यासाठी कल्पकतेने उद्योगप्रवण बनणे, ही संतदृष्टीची खासियत.
‘पिटू भक्तीचा डांगोरा,’ अशा प्रेरणेने भक्तिमार्गाचा उद्घोष करण्यामागे संतांची नेमकी हीच भूमिका दिसते. सर्वसमावेशकता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नयनाची तळमळ हा संतविचार आणि संतआचार यांचा गाभा. त्यामुळे भौतिक-आर्थिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक उन्नयनाची गुरुकिल्ली समाजव्यवस्थेतील त्रवर्णिकांच्या (आणि त्यातही त्रिवर्णातील केवळ पुरुषवर्गाच्याच!) हाती सुपूर्द करणाऱ्या सनातन धर्मव्यवस्थेने उपेक्षिलेल्या विशाल जनसमूहांना आत्मभान प्रदान करणे, हे संत परंपरेसमोरील १३ व्या शतकातील मुख्य आव्हान होते. ही कोंडी फोडली ती ज्ञानदेवांनी. भगवद्गीतेचे अंतरंग लोकभाषा मराठीमधून सर्वसामान्यांच्या आकलनकक्षेत आणणे, हे त्या प्रयत्नांतील जणू पहिले पाऊल.
ज्ञानदेवांच्या प्रतिपादनानुसार, ज्ञान-कर्म-उपासना अशा तीन कांडांनी मिळून बनलेल्या श्रुतींचे ‘सुसेव्य’ रूप म्हणजे श्रीमद्भगवद्गीता! ‘सुसेव्य’ हा शब्द ज्ञानदेवांचा.  ज्ञानेश्वरीचा उपसंहार करत असताना १८ व्या अध्यायात ‘वेदाची सुसेव्यता’ असे विशेषण ज्ञानदेव गीतेला बहाल करतात. वेदवाङ्मयातील संहिता आणि ब्राह्मणग्रंथांचा सारा भर हा यज्ञयागादी कर्मकांडावर तर, आरण्यके व उपनिषदे ज्ञानचर्चेला वाहिलेली. या दोन मार्गाना अनुसरायचे तर अनुक्रमे कर्माचाराचे यथाविधी ज्ञान हवे आणि निखळ ज्ञानमार्गाची कास धरायची तर बुद्धीवर संस्कार हवेत. शिवाय, तत्कालीन धर्मव्यवस्थेप्रमाणे कर्म आणि ज्ञानपंथाने पाऊल घालायचे तर जन्मवर्णाधिष्ठित पूर्वअधिकार हवेत! मग, अशा कोणत्याही जन्मजात अधिकारांची कवचकुंडले न लाभलेल्या वरकड जनसमूहांच्या उन्नयनाची वाट काय?
ज्ञानदेवांच्या लेखी गीतेचे खरे माहात्म्य हेच. औपनिषदिक ज्ञानाचे सार श्रीकृष्ण नावाच्या गोपालकाने अर्जुननामक वत्साच्या निमित्ताने दोहून काढले आणि तो ज्ञानठेवा उभ्या विश्वासाठी ‘सुसेव्य’ बनवला! त्या ठेव्याचेच नाव ‘गीता’. हे करत असतानाच, श्रुतींमधील ‘उपासना’ या तिसऱ्या कांडाला अग्रस्थान देऊन जगद्गुरू योगेश्वर श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून भक्तिशास्त्राची प्रतिष्ठापना केली. गीता नावाचे ते भक्तिशास्त्र संस्कृतसारख्या अनघड भाषेत बंदिस्त झाल्याने सर्वसामान्यांना दुष्प्राप्य बनले होते. त्या ज्ञानसरोवरात उतरणे सगळ्यांना सोपे जावे यासाठी लोकभाषा मराठीचे सोपान मी माझ्या गुरूंच्या प्रेरणेने सिद्ध केले, अशी ज्ञानदेवांची ‘ज्ञानेश्वरी’च्या निर्मितीमागील भूमिका. ‘गीतार्थे विश्व भरू’ ही ज्ञानदेवांची प्रेरणा या सगळ्या व्यूहामधून प्रसवलेली आहे. ज्ञानप्राप्तीखेरीज उन्नयन नाही. वेद हे तर ज्ञानाचे कोठार. वेदाध्ययनाचा हक्क मूठभरांनाच. अशा प्रतिकूलतेच्या कोंडीतून वाट काढण्यासाठी भागवतधर्मीय संतपरंपरेने श्रीकृष्ण नावाच्या नावाडय़ाची कास धरली. ज्ञान, कर्म आणि उपासना या तीन कांडांपैकी श्रुतींनी पुरेसे चर्वण न करताच नुसते उष्टावून सोडून दिलेले उपासना कांड हाती घेऊन योगेश्वर कृष्णाने कुरुक्षेत्रावर गीतेच्या रूपाने भक्तिशास्त्राची पायाभरणी केली आणि भक्तीची सर्वसमावेशकता अचूक हेरून  सर्व समाजाच्या आध्यात्मिक-सांस्कृतिक उन्नयनासाठी संतांनी त्याच भक्तितत्त्वाचा डांगोरा पिटला. सर्वसमावेशकता या संतविचाराच्या गाभामूल्याशी भक्तीचे असलेले नाते असे स्वाभाविक आणि जैविक आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन्ही मार्ग मुळातच दुस्तर. त्यामुळे अधिकारभेदानुसार या दोन्ही मार्गावर पाऊल घालण्यास बहुजनांना तत्कालीन धर्मव्यवस्थेने घातलेली बंदी ही जणू इष्टापत्तीच मानून संतांनी भक्तीचा राजपथ सताड खुला केला. ‘मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर। केला राज्यभार चाले ऐसा।।’ हे तुकोबांचे उद्गार भक्तीची सर्वसमावेशकताच अधोरेखित करतात. भक्तिपंथाची कास धरण्याच्या संतांच्या भूमिकेची ही तत्कालीन धार्मिक-सामाजिक पाश्र्वभूमी नीट जाणून घेतली की संतकार्याचे अपूर्वत्व आपल्याला अधिकच भावते.  सर्वसामान्य मनुष्याच्या सामाजिक-नैतिक-आध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचे उन्नयन घडवून आणणारी सारी सामग्री या भक्तितत्त्वाच्या ठायी विद्यमान असल्यानेच मराठी संतमंडळाने ‘भक्ती नवविधा भावशुद्ध बरी। अलंकारावरी मुकुटमणि।।’ या भावनेने ती शिरीमस्तकी धरली.
सर्वसमावेशकता हा संतांच्या लेखी भक्तीचा सर्वात मुख्य गुण. भक्तिपंथाने वाटचाल करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पूर्वाधिकाराची गरज नाही. ‘ अवघियां पुरतें वोसंडलें पात्र। अधिकार सर्वत्र आहे येथे।।’ असे तुकोबा गर्जून सांगतात. त्यामुळे, भक्तिपंथावर प्रवेश सोपा आहे. ‘भक्तिपंथ बहु सोपा,’ अशी ग्वाही तुकोबा देतात त्यामागील इंगित हेच. ‘खटनट यावें शुद्ध होऊनियां जावें’ असा हाकारा चोखोबा देतात तो भक्तीच्या सुलभ समावेशकतेला अनुलक्षून. बरे, हे साधन इतके सोपे की कर्मकांडाचा बडिवार नाही. म्हणजेच, भक्ती खर्चिकही नाही. ‘भावें तुलसीदल पाणी जोडा हात,’ इतका हा सोपा विधी! साधक आणि आराध्य दैवत यांच्यात पंडे-पुरोहितांसारख्या मध्यस्थाचीही भक्तीच्या या प्रांतात प्रस्तुतता नाही.
अर्थात, इथेही तारतम्याला फाटा देऊन चालणार नाही. ‘भक्ती सोपी आहे,’ याचा अर्थ भक्तिपंथात प्रवेश काय तो सोपा आहे! परंतु, भक्तीच्या मार्गाने करायची वाटचाल मात्र, ‘विष खावे ग्रासोग्रासी। तरी उत्तरें यें कसी।।’ इतकी अवघड. खास तुकोबांच्याच शब्दात सांगायचे तर ‘भक्ती तो कठिण शुळावरील पोळी’. आज आपल्या भवताली तथाकथित भक्तीला जो सवंग पूर आलेला दिसतो ती भक्ती आणि तुकोबांना अभिप्रेत असलेली भक्ती यात महदंतर आहे. तुकोबा जिला भक्ती म्हणतात तिच्यात मनावर विवेकाचा अंकुश असल्यामुळे तिची परिणती, ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ यात होते. संतप्रणीत भक्तीचा संपूर्ण भर अंत:शुद्धीवर आहे. ‘विवेकासहित वैराग्याचे बळ,’ हा त्या भक्तीचा पाया. आजचे चित्र काय दिसते?
आजच्या आमच्या वरपंग भक्तीचे सार्थ वर्णन करायचे तर पुन्हा तुकोबांचेच शब्द उसने घ्यायला हवेत..
 ‘पायाविण भिंत तांतडीची’।।