पसाय-धन : कामामध्ये काम, काही ह्मणा रामराम.. Print

अभय टिळक, शुक्रवार, १७ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हाताने काम करत असताना मुखाने नाम जपण्याने लौकिक प्रपंचाचे संवर्धन घडते आणि त्याच वेळी नामाच्या प्रभावाने कर्तेपणाची भावना लोप पावून साध्या कर्माचे रूपांतर कर्मयोगात घडून येते..

‘एम्पॉवरमेन्ट’ ही आजची परवलीची संज्ञा! आजच्या शब्दांत सांगायचे तर परिघावरील आणि परिघाबाहेरील समाजघटकांची ‘एम्पॉवरमेन्ट’ घडवून आणणे, हा संतकार्याचा आणि संतविचाराचा केंद्रबिंदू. नवविधा भक्तीमधील नामस्मरणरूपी तिसरी भक्ती संतांनी अग्रक्रमाने पुरस्कृत केली ती नामचिंतनाच्या ठायी वसणाऱ्या सक्षमीकरणाच्या नानाविध अमोघ शक्यता अचूक हेरूनच. नामजपाच्या माध्यमातून भगवंताशी थेट ऐक्य साधता येत असल्याने मध्यस्थाची गरज उरत नाही आणि आपल्या उभ्या अस्तित्वावर नाममुद्रा उमटवल्याने लौकिक समाजव्यवस्थेने भाळी लेवविलेल्या कथित हीन जिण्याची बोचही लयास जाते, ही नामचिंतनाची अपेक्षित, वंचित समाजसमूहांच्या लेखी महत्त्वाची अशी सामाजिक आणि सांस्कृतिक-आध्यात्मिक बलस्थाने. परंतु, लोकव्यवहारात ठाम टिकून राहायचे तर केवळ एवढेच पुरेसे ठरत नाही.  नामस्मरण भक्तीचा अवलंब केल्याने सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक अथवा भावनिक सक्षमीकरण घडून आले तरी त्याला जोवर आर्थिक सक्षमीकरणाचे अस्तर जोडले जात नाही तोवर त्या सक्षमीकरणाला व्यवहारात अर्थ प्राप्त होत नाही, याची संतपरंपरेला जाणीव होती.
आजही आपल्याला याच वास्तवाचा अनुभव येतो. १९९०च्या दशकात आपल्या देशात साकारलेल्या ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्तीमुळे राजकीय निर्णयप्रक्रियेतील महिलांच्या सहभागास घटनादत्त अधिष्ठान प्राप्त झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील राजकारण आणि समाजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढला, की यथावकाश कुटुंबातील निर्णयप्रक्रियेतही त्यांना निर्णायक सहभाग घेता येईल, असा एक कार्यकारणभाव यासंदर्भात  मांडला जातो. तो खराही आहे. परंतु, विविध स्तरांवरील निर्णयप्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग वास्तवात अर्थपूर्ण बनताना दिसू लागला तो मात्र बचत गटांच्या चळवळीने मूळ धरल्यानंतरच. त्याचे कारण उघड आहे. बचत गटांच्या चळवळीने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या वाटा रुंदावल्या आणि आर्थिक सक्षमीकरण हाच अखेर सर्व प्रकारच्या सक्षमीकरणाचा पाया असल्यामुळे कुटुंबापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या निर्णयप्रक्रियेतील महिलांच्या सहभागाला व्यावहारिक अर्थवत्ता लाभली.
हेच तत्त्व नामस्मरण भक्तीलाही लागू पडते. नामस्मरण भक्तीचा पुरस्कार संतांनी मोठय़ा हिरिरीने केला, कारण नामसाधनाचा कर्माशी संपूर्ण अविरोध आहे. लौकिक प्रपंचाची घडी सुविहित राखत पारलौकिक श्रेयसाची जोपासना नामसाधनाद्वारे शक्य बनते, हे या साधनाचे सर्वात मोठे व्यावहारिक वैशिष्टय़. नामस्मरण सोपे तर आहेच, पण या साधनाचा अवलंब करण्यासाठी, तुकोबा हवाला देतात त्याप्रमाणे, ‘न लगती सायास जावें वनांतरा’ अशी ही मोठीच खुबी आहे. नामजपाचा आश्रय केला, की देवाला शोधण्यासाठी वनकाननाची वाट धरावी लागत नाही. उलट, नामामुळे ‘सुखें येतो घरा नारायण’, अशी हमीच तुकोबा देतात. सुखी आणि समृद्ध अशा लौकिक जीवनाच्या पायावरच पारलौकिकाची इमारत उठवता येते, याचे भान संतविचाराला प्रथमपासूनच आहे. त्यामुळे ‘आम्ही दैवाचे दैवाचे’ असे प्रखर आत्मभान नामाच्या माध्यमातून नामधारकाला प्रदान करत असतानाच त्या आत्मभानाला आर्थिक सक्षमीकरणाची बैठकही संतविचार पुरवतो ती नामभक्तीची कर्मप्रधान व्याख्या सिद्ध करून.  
 नामचिंतनासाठी लौकिक कर्मे सोडावी लागत नाहीत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास यांपैकी कोणत्याही आश्रमात तुम्ही असा, त्या त्या आश्रमातील आचारधर्म सुखेनैव आचरणात आणत असतानाच तुम्ही नामसाधनाद्वारे परतत्त्वाशी ऐक्य साधू शकता. केवळ इतकेच नाही तर श्रेष्ठ-कनिष्ठ अशा कोणत्याही कुळात जन्म झालेला असला तरी त्या कुळाची आनुषंगिक कर्मे न सोडताही पारलौकिकाची पायाभरणी नामचिंतनामुळे करता येते. ‘न लगें सांडावा आश्रम। उपजलें कुळींचें धर्म’ अशा शब्दांत नामचिंतन आणि लौकिक कर्म यांचा अविरोध तुकोबा स्पष्ट करतात. प्रपंचातील हजारोहजार कामे हाताने निपटत असताना मुखाने नामस्मरण केल्याने कामाच्या श्रमाचाच केवळ नाही तर भवश्रमाचाही परिहार होतो, हे आवर्जून सांगताना ‘कामामध्यें काम। काही ह्मणां रामराम’, असे तुकोबा जे म्हणतात ते नामचिंतनाद्वारे घडणाऱ्या पारमार्थिक व आर्थिक सक्षमीकरणाला अनुलक्षूनच. हाताने काम करत असताना मुखाने नाम जपण्याने लौकिक प्रपंचाचे संवर्धन घडते आणि त्याच वेळी नामाच्या प्रभावाने कर्तेपणाची भावना लोप पावून साध्या कर्माचे रूपांतर कर्मयोगात घडून येते. ‘कर्मे ईशु भजावा’, या ज्ञानदेवांच्या सूत्रात कर्मामध्ये गुंतलेले हात व भजनात रत झालेली वाणी यांचा समन्वय निर्देशित केलेला आहे.
प्रपंचातील लौकिक व आर्थिक स्थैर्य हे व्यवसायाशी निगडित आहे. व्यक्तीला तिचा व्यवसाय न सोडता पारलौकिकाचे संगोपन करता यायला हवे, ही संतांची तळमळ होय. त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक ठरतात. एक म्हणजे, पारलौकिकाच्या साधनाद्वारा आर्थिक-व्यावहारिक सुस्थिती बुलंद राखली जायला हवी. तत्कालीन समाजव्यवस्थेत व्यक्तीचे लौकिक स्थान वर्णाश्रमधर्मानुसार तिच्या वाटय़ाला आलेल्या कर्मानुसार ठरत असे. म्हणजेच, वर्णाश्रमप्रधान अशा त्या व्यवस्थेत विभागणी केली जात असे ती केवळ श्रमांची नव्हे तर श्रमिकांचीही. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या जात-वर्णानुसार वाटय़ाला आलेले काम करायचे. म्हणजे, व्यक्तीच्या किमान आर्थिक सुरक्षिततेची हमी तिच्या भागाला आलेला व्यवसाय ती किती नेटाने व नेकीने करते यावरच निर्भर. ही उतरंड मोडण्याची तेव्हा परवानगीच धर्मव्यवस्थेने नाकारलेली. जन्मजात व्यवसाय सोडायला बंदी. जन्मजात वर्णावर बेतलेली ही व्यवसाय प्रणाली ब्रिटिशसत्ता येथे स्थिरावून बाजारपेठीय स्पर्धेवर आधारलेली व्यवहारव्यवस्था स्थिरपद झाल्यावरच हळूहळू अप्रस्तुत ठरू लागली. त्यामुळे, परंपरेने चालत आलेला व्यवसाय न सोडताच उन्नयन घडवून आणणारे नामस्मरणरूपी साधन संतांनी हाती दिल्यामुळे चातुर्वण्र्य व्यवस्थेतील सर्वच घटकांना लौकिक-पारलौकिक हिताची सांगड घालणे शक्य बनले. अन्यथा, कर्मच्युतीचा दंड म्हणून तत्कालीन कथित हीनवर्णीयांची कोंडी त्यांना वर्णव्यवस्थेमधून बहिष्कृत करून केली गेली असती तर, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे, ‘जयाचें ऐहिक धड नाहीं। तयाचें परत्र पुससीं काई’ असा दुर्धर प्रसंग संबंधित समाजघटकांवर ओढवला असता.
अशा परिस्थितीत, मोक्षप्राप्तीसारखे ध्येय डोळय़ांसमोर ठेवणे केवळ अर्थहीनच नव्हे, तर आत्मघातकच ठरले असते. मोक्षसाधनाचे कर्माचरणही वर्णव्यवस्थेने ठरवून दिलेल्या पद्धतीतील संबंधित समाजघटकांनीच अवलंबायचे. मग, बाकीच्या समाजघटकांनी मोक्षमुक्तीची आशा करायचीच नाही का, या प्रश्नाची तडही संतांनी लावली ती ‘मोक्ष’ या संकल्पनेची व्याख्या मुळापासून बदलून. संतविचाराने घडविलेली अचाट अशी वैचारिक क्रांती खरे म्हणजे हीच. निर्हेतुक, निरभिमान कर्माचरण हाच मोक्ष, अशी मुळी संतांनी द्वाहीच फिरवली! वाटय़ाला आलेले कर्म आमरण करीत किमान लौकिक-आर्थिक सक्षमीकरण करत राहायचे आणि त्याचवेळी मुखाने नामजप करून कर्तेपणाच्या अहंकाराचे विसर्जन साधायचे ही युक्ती शिकवली संतांनी. ‘मुखी नाम हाती मोक्ष’, असा आश्वासक पुकारा तुकोबा करतात तो याच युक्तीला अनुसरून. तर, ‘स्वकर्मामध्ये व्हावे रत। मोक्ष मिळे हातोहात।।’ असा स्वानुभव उच्चरवाने सांगत ‘स्वकर्माचरण हाच मोक्ष’, हे सूत्र समाजमनावर बिंबवतात सावतोबा. अशा कर्मप्रधान नामभक्तीच्या आचरणामुळे एकीकडे प्रत्येक समाजघटकाला त्याच्या किमान आर्थिक सक्षमीकरणाची हमी मिळून त्याच्या सर्वागीण उन्नयनाची पायाभरणी शक्य बनली. तर, दुसरीकडे समाजव्यवस्थेत एक जबाबदार कार्यसंस्कृती फुलवण्यासाठी अवकाश निर्माण झाला. आज आम्ही या सगळय़ालाच फाटा दिलेला आहे. त्यामुळे, आज आमच्या समाजात ना दिसते विवेकाधिष्ठित कर्मप्रधान भक्ती, ना अनुभवास येते प्रगल्भ कार्यसंस्कृती!