पसाय-धन : अभ्यासासि कांहीं सर्वथा दुष्कर नाहीं.. Print

 

अभय टिळक - शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपण आपल्या ठायी विद्यार्थिवृत्ती सतत जागती ठेवली पाहिजे हेच दत्तात्रेयांच्या २४ गुरूंच्या कथेमधील सार. आपण केवळ कथा कवटाळून बसलो. अभ्यासूवृत्तीसाठी तरलता, निरीक्षणशक्ती यांचा संस्कार घेतला नाही..
सिद्धान्त मनावर ठसावा यासाठीच कथाकीर्तनामधून दृष्टान्तांची पेरणी केली जाते. परंतु, आपण सगळेच कमालीचे कथाप्रिय असल्यामुळे दृष्टान्त तेवढा मनावर बिंबतो आणि सिद्धान्ताचे (बहुतेकदा सोयीस्कर!) विस्मरणच होते. दत्तात्रेयांनी २४ गुरू केले, या कथाभागाचे उदाहरण या संदर्भात प्रकर्षांने आठवते.

गंमत म्हणजे, दत्तात्रेयांचे ते २४ गुरू कोणते, ते त्यांच्या जीवनात कसे आले, त्या प्रत्येक गुरूंकडून दत्तात्रेय काय शिकले, शिकण्याची ती प्रक्रिया नेमकी कशी होती, त्या सगळय़ा कथाभागाचे नेमके मर्म काय आणि आजच्या आमच्या शिक्षणप्रक्रियेच्या संदर्भात त्या कथेची प्रस्तुतता काय.. अशा विविध बाबींचा उलगडा मात्र ही कथा सांगणाऱ्यांना बरेचदा करता येत नाही. कारण सोपे आहे. सिद्धान्ताकडे बघतो कोण?    हा सगळा कथाभाग तपशीलवार उलगडून मांडलेला आहे एकनाथांनी. ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या, आठव्या आणि नवव्या अध्यायात नाथांनी हा सारा कथाभाग विस्ताराने कथन केलेला आहे. दत्तात्रेयांच्या २४ गुरूंचे विवरण ‘यदू-अवधूत संवाद’ या प्रकरणामध्ये गुंफलेले आहे. यादववंशाचा म्हणजेच पर्यायाने कृष्णाचा मूळ पुरुष म्हणजे ‘यदू’ तर, ‘अवधूत’ ही दत्तात्रेयांची उपाधी. यदू आणि अवधूत यांच्यातील संवाद श्रीकृष्ण उद्धवांना कथन करतात, असा हा प्रसंग आहे.
अपूर्व बुद्धिमत्ता आणि सात्त्विक ज्ञानाचा जणू पुतळाच भासणारे अवधूत आपल्याच ज्ञानानंदामध्ये सतत निमग्न असल्याचे पाहून यदुराजाचे कुतूहल जागे होते. ‘आपण इतके सतेज, टवटवीत कशामुळे असता?’ असा प्रश्न यदू मग अवधूतांना विचारतात. ‘अभ्यासपूर्वक प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानामुळे मी मुक्त आहे आणि त्या मुक्तीमुळेच मी सदासर्वकाळ टवटवीत असतो,’ असे उत्तर अवधूत राजाला देतात. अभ्यासाद्वारे ज्ञान पदरात पाडून घेण्यासाठी मी एकंदर २४ गुरू केले, असेही संभाषणाच्या ओघात अवधूत सांगतात आणि त्या गुरूंची यादीच सादर करतात. ही यादी जितकी मनोज्ञ तितकीच रोचक आहे. निसर्ग आणि प्राणिसृष्टी यांतील घटकांनाच अवधूतांनी गुरुत्व बहाल केले असल्याचे ती यादी नजरेखालून घातली की आपल्या ध्यानात येते. पंचमहाभूतांसह चंद्र, सूर्य आणि समुद्र हे निसर्गातील आठ घटक; कपोत, अजगर, पतंग, मधमाशी, हत्ती, भुंगा, हरिण, मासा, टिटवी, साप, कुंभारीण आणि कोळी हे प्राणिसृष्टीतील १२ घटक आणि वारांगना, लहान बालक, कुमारिका व लोहार हे मनुष्ययोनीतील चारजण अशी ही अवधूतांच्या २४ गुरूंची मालिका होय.
यादीतील या प्रत्येक गुरूकडून आपण काय शिकलो याचा अवधूतांनी पुरविलेला तपशील तर विलक्षण आहे. तो सगळाच्या सगळा तपशील जसाच्या तसा इथे मांडणे विस्तारभयास्तव शक्य नाही. वानगीदाखल काही मोजकी उदाहरणे आपण पाहू. निसर्ग हाच आद्य गुरू होय, असे अवधूत यदूला सांगतात. सवरेदार धरतीकडून मी परोपकार शिकलो, हा पहिला धडा अवधूत यदूला कथन करतात. ‘शांती’ हा दुसरा गुणही आपल्याला पृथ्वीनेच शिकवला म्हणून ‘पृथ्वी’ हा आपला पहिला गुरू हे अवधूतांचे स्पष्टीकरण. याच भूमिकेतून अवधूत भवतालाकडे बघत एक-एक गुण टिपत जातात. वारा त्यांना स्वच्छंदपण शिकवतो तर आकाश समत्त्व. दुसऱ्यांची जीवने उजळून टाकण्याचा बोध अवधूत सूर्याकडून घेतात तर तृषार्ताची तहान भागवणे ते शिकतात पाण्याकडून. समुद्राकडून ते प्रसन्नता घेतात. अग्नी त्यांना शिकवतो सर्वग्राहकता. तापलेले लोखंड ऐरणीवर घेऊन घणाचे घाव घालणारा लोहार अवधूतांच्या मनावर एकाग्रता बिंबवतो. लहान मुलाकडून ते संस्कार घेतात निष्पाप निरागसतेचा. परपीडा न करता आपला कार्यभाग साधण्याची दीक्षा अवधूत घेतात फुलाफुलांतून अलगदपणे मध शोषणाऱ्या भुंग्याकडून. प्रत्येक पदार्थावर क्षणभर बसून पुढे सरकणारी माशी अनावश्यक संग्रह न करण्याचे तत्त्व शिकवते म्हणून अवधूत तिलाही गुरुपद बहाल करून टाकतात! अवधूतांची शिकण्याची ही सारी प्रक्रिया एकनाथांनी त्यांच्या उपमा-उदाहरणांनी अधिक मंडित करून मोठय़ा बहारीने मांडलेली आहे. ती सगळी बहार मुळातूनच वाचायला हवी.
आमचे संत हे स्वभावत: लोकशिक्षक का आणि कसे होते, याची प्रचिती या सगळय़ावरून येते. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ‘शिक्षक’ अथवा ‘गुरू’ आणि ‘विद्यार्थी’ हे दोन घटक पायाभूत ठरतात. त्यातही पुन्हा, विद्यार्थ्यांच्या ठायी शिकण्याची वृत्ती आणि जिज्ञासा असणे अधिक महत्त्वाचे. गुणवान शिक्षकांची वानवा आहे, अशी ओरड आज सर्वत्र ऐकू येते. परंतु, विद्यार्थ्यांच्या ठायी अभ्यासूवृत्ती कितपत चेतलेली आहे, याची चिकित्सा मात्र फारशी केली जात नाही. शिकण्याची मानसिकता, भूमिका, जिज्ञासा आणि विद्यार्जनाची वृत्ती जागृत असेल तर शिक्षकाची अथवा गुरूची वानवा विद्यार्थ्यांला जाणवत नाही, हे तत्त्व एकनाथ अवधूतांच्या कथेद्वारा समाजापुढे ठेवतात. ज्ञानसंपादनाचे मूलसूत्र हेच. आपण विद्यार्थिवृत्ती धारण केली की गुरुत्व ठायी ठायी प्रतीत व्हायला लागते याच भूमिकेतून मी ज्ञानसंपादन केले, असे यदूला सांगताना अवधूत ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेचे आद्य सूत्र मांडतात. ‘जो जो जयाचा घेतला गुण। तो तो गुरू म्यां केला जाण।।’ हे ते मूलसूत्र! स्वाध्याय हा या शिक्षणप्रक्रियेचा गाभा. अवधूतांचेच शब्द वापरायचे तर ‘शिक्षिता वृत्ती’ हे या प्रक्रियेतील मुख्य साधन आणि ‘शिकलों आपुलिया युक्ती’, हा स्वयंअध्ययनाचा मंत्र हे या प्रांतातील मार्गदर्शक तत्त्व.
ज्या काळाच्या चौकटीत एकनाथ हा सारा कथाभाग समाजापुढे ठेवतात ती चौकट आपण नजरेआड होऊ देता कामा नये. आजची औपचारिक शिक्षणव्यवस्था तर तेव्हा कल्पनेच्या परिघातही नव्हती. जी काही शिक्षणाची व्यवस्था आणि परंपरा तेव्हा व्यवहारात होती तिच्या किल्ल्या मूठभर उच्चवर्णीयांच्याच कमरेला होत्या. अशा परिस्थितीत, वरकड समाजावर अभ्यासाचे, अभ्यासजन्य ज्ञानाचे आणि ज्ञानसंपादनाच्या ऊर्मीचे संस्कार घडवायचे तर मुळात सर्वसामान्यांच्या अंगी प्रथम अभ्यासूवृत्ती जागवणे अत्यावश्यक होते. त्यासाठी हवी तरलता, निरीक्षणक्षमता आणि मुख्य म्हणजे शिकण्याची इच्छा. या साऱ्या मूलभूत गुणांचा परिपोष करणारे रोकडे उदाहरण एकनाथ समाजपुरुषासमोर ठेवतात ते दत्तात्रेय अवधूतांच्या रूपाने. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपण आपल्या ठायी विद्यार्थिवृत्ती सतत जागती ठेवली पाहिजे हेच दत्तात्रेयांच्या २४ गुरूंच्या कथेमधील सार. आपण केवळ कथा कवटाळून बसलो. सिद्धान्त विसरलो!
अभ्यास आणि अभ्यासाची वृत्ती समाजजीवनात रुजावी, याबाबत संतविचाराचा कटाक्ष सतत राहिलेला आहे. अभ्यासाने जीवनात सर्व काही साध्य बनते, असा तुकोबांचा स्वानुभव. ‘असाध्य ते साध्य करितां सायास। कारण अभ्यास तुका ह्मणें,’ हा त्यांचा सांगावा. अभ्यासाबाबतचा संतविचारातील आग्रह पार ज्ञानदेवांपासूनचा आहे.
‘म्हणौनि अभ्यासासि कांहीं। सर्वथा दुष्कर नाहीं।’, असा आश्वासक दिलासा देत ज्ञानदेव अभ्यासाची प्रेरणा देतात. तर, थेट दुसऱ्या टोकावर रामदासांसारखा दक्ष समाजपुरुष, ‘अभ्यासें प्रगट व्हावे। नाही तरी झांकोन असावें। प्रगट होऊन नासावें । हे बरे नव्हें।।’’, असा रोखठोक पवित्रा धारण करतो.
ही अभ्यासूवृत्ती आपण अंगी बाणवतो का?
आज तर अभ्यासाशिवाय बोलण्याचेच पीक चौफेर फोफावलेले आहे.