ठाणे जनता सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित Print
प्रतिनिधी
इंडियन बँक्स असोसिएशनच्या वतीने २००९ वर्षांसाठीचा टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर हा सन्मान ठाणे जनता सहकारी बँकेला देशभरातील सर्व सहकारी बँकातून या पुरस्कारासाठी ठाणे जनताची निवड करण्यात आली आहे. आयबीएने मुंबईतील ताज लँड एण्डस् येथे आयोजित बँकींग टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स व एक्स्पोच्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. बँकेचे अध्यक्ष विद्यमान वैशंपायन, सरव्यवस्थापक सतीश उतेकर व बँकेचे मुथ्य तंत्रज्ञान अधिकारी नागवेकर यांनी सन्मानाचा स्वीकार केला.
विद्याधर वैशंपायन म्हणाले बँकेने तंत्रज्ञानाचा उपयोग ग्राहकांचा वेळ, पैसा, श्रम वाचावे यासाठी केला आहे. ग्राहकांना सेवा तत्पर  मिळावी या दृष्टीने बँकेने नेहमीच अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला आहे.बँकेने कोअर बँकींग सोल्यूशन्सद्वारे बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरींगचा वापर करून दर कर्मचारी ६.७ कोटींच्या व्यवसायाची वाटचाल आजमितीस केली आहे. ठाणे जनताची ४९ एटीएम सेंटर्स असून, १० लाखापेक्षा अधिक एटीएमधारक आहेत. या सर्व ग्राहकांना बँकेने बीएएनसीएस या नेटवर्कशी संलग्न केल्यामुळे भारतभरातील या नेटवर्कच्या सदस्य बँकांच्या एटीएम मधून ग्राहक व्यवहार करू शकतात. बँकेने २४x७ कार्यरत असणारी चेक डिपॉझिटरी मशिन्स ३० ठिकाणी बसविली आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील पहिले चेकबुक इश्युईंग मशिनही ठाण्यामध्ये बसविले आहे. एसएमएस बँकींग सुविधा ग्राहकांना बँकेने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये व्यवहार अ‍ॅलर्ट, एटीएम व्यवहार अ‍ॅलर्ट, ठेवींटी मॅच्युरीटी अ‍ॅलर्ट, चेक रिटर्न्‍स अ‍ॅलर्ट व पेंडींग चेक क्लिअरन्स अ‍ॅलर्ट मिळतात. बँकेने ग्राहकांना नेट बँकींगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे, असे सरव्यवस्थापक सतीश उतेकर म्हणाले.
बँकेचे स्वत:चे कॉल सेंटर कार्यरत आहे.   कर्जदारांना हप्त्याची व ठेवीदारांना मॅच्युरिटीची सूचना व अन्य माहिती प्रभावीपणे देण्याचे काम या कॉल सेंटरद्वारे केले जाते. ठाणे जनताने डेटा सेंटर शेअरींगद्वारे सहकार क्षेत्रातील १२००० कोटींचा व्यवसाय असणारी कल्याण जनता सहकारी बँक व २००० कोटींच्या व्यवसाय असणाऱ्या जनकल्याण सहकारी बँकेला तंत्रज्ञानाच्या वापरात सहभागी करून घेतले आहे.
बँकेने मायक्रोसॉफ्ट इंडियाबरोबर सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर लायसन्सिंगचा करार केला आहे.  बँक तंत्रज्ञान सल्लागार म्हणून गोवा अर्बन सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक व इचलकरंजी जनता सहकारी बँकेला सेवा देत आहे. पवना सहकारी बँकेचा सहा शाखांचा टर्न की प्रोजेक्ट बँकेने नुकताच हाती घेतला आहे, असे बँकेचे चीफ टेक्नोलॉजी ऑफीसर नागवेकर यांनी सांगितले.