अविनाश भोसले, विजय शिर्के, आनंद शिंदे, पोंक्षे, भार्गवी आदींना ‘उद्धव श्री’ पुरस्कार Print

पिंपरी / प्रतिनिधी
उद्योजक अविनाश भोसले, विजय शिर्के, डी. एस. कुलकर्णी, साहित्यिक उत्तम बंडू तुपे, प्रसिध्द गायक आनंद शिंदे, अभिनेते श्याम पोंक्षे, भार्गवी चिरमुले आदींना यंदाचा ‘उद्धव श्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (३ ऑगस्ट) चिंचवडला लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या हस्ते समारंभपूर्वक हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व मुख्य संयोजक बाबासाहेब धुमाळ यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार, यंदाच्या सातव्या वर्षी श्याम आगरवाल (पत्रकारिता), विराज काकडे (कायदा), महावीर कांबळे (महापालिका), मंगेश कराड (शैक्षणिक), डॉ. नरेंद्र वैद्य (वैद्यकीय), खंडू चिंचवडे (धार्मिक), विनोद ठोकळे (गिर्यारोहक), कॅप्टन बसाखासिंग, किशोरीलाल चढ्ढा (वाहतूक व्यावसायिक), बाळूबाई धुमाळ (महिला उद्योजक), गोदावरी मुंडे (गायिका) आदींना मनोहर जोशींच्या हस्ते उद्धव श्री पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या समारंभास संपर्कनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर, आमदार विजय शिवतारे, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना नेत्यांनीच फिरवली पाठ
शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आणि संयोजक सेनेचाच जिल्हाप्रमुख असूनही या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत मात्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. संयोजन समितीत असलेले नगरसेवक संपत पवार वगळता शिवसेनेचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. त्याचप्रमाणे, पक्षाचे पालिकेतील अथवा संघटनेचे पदाधिकारीही फिरकले नाहीत. संयोजक बाबासाहेब धुमाळ यांचे समर्थक मात्र आवर्जून उपस्थित होते.