संत तुकारामांच्या विचारात समाज परिवर्तनाची शक्ती -ज्ञानेश महाराव Print
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी
जगद्गुरू तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करून आचरण केले तर समाजात परिवर्तन होईल, असे प्रतिपादन लेखक व चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले.
सर्व शाखीय कुणबी, मराठा व बहुजन संघटनेतर्फे जगद्गुरू तुकाकाम बीजनिमित्त वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराव बोलत होते. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रभाकर पावडे, मधुकरराव मेहकरे, रामनशरण कनौजिया, सुधांशु मोहोड, चंद्रकात नवघरे, मुकुंदराव पन्नासे उपस्थित होते.
समाज संघटित होत नाही, असे आपण प्रत्येक  कार्यक्रमात बोलतो, मात्र त्याची कारणे कधी शोधली का असा प्रश्न उपस्थित करून महाराव म्हणाले, तुकाकाम महाराज सर्व संतामध्ये श्रेष्ठ होते. त्यांच्या विचारांचे केवळ मनन चिंतन करून चालणार नाही तर, ते अंमलात आणावे लागेल. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व शाखीय कुणबी समाजाची संख्या बघितली तर संघटनेचे पदाधिकारी कुठे कमी पडतात याचे चिंतन क रण्याची गरज आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांची नाती पक्की असतात त्यामुळे लोकांपर्यंत विचार पोहचवून त्यांचे संघटन मजबूत करा, असे आवाहन महाराव यांनी केले.
तुकोबारायांचे जीवन कार्य प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये कृतीशीलता, विनम्रता आणि चारित्र्यवान असला पाहिजे. संघटना विचारांने मोठय़ा होत असतात त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करावे, असेही महाराव म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मधुकर मेहकरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत सर्व शाखीय कुणबी समाज संघटित होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. समाजातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात, मात्र त्या उपक्रमांमध्ये लोकं येत नाही. त्यासाठी जागृती करणे आवश्यक आहे असेही मेहकरे म्हणाले. यावेळी पुरूषोत्तम खेडेकर यांचे भाषण झाले.