‘अग्निसखा’ काव्यसंग्रह व ‘असेही-तसेही’ गझलसंग्रहाचे प्रकाशन Print
नागपूर, ८ ऑगस्ट / प्रतिनिधी
गझल लेखनाच्या क्षेत्रात केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक वाढ झाली आहे. केवळ पुरुषांची या क्षेत्रात मक्तेदारी आता राहिली नसून स्त्री गझलकार म्हणून कवयित्री समोर येत आहे, असे प्रतिपादन गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्रातर्फे कवयित्री क्रांती साडेकर यांच्या ‘अग्निसखा’ या कविता संग्रहाचे आणि ‘असेही-तसेही’ या गझल संग्रहाचे प्रकाशन गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, कवयित्री सुभा हेर्लेकर, विजय जिचकार, प्रमोद मुनघाटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भीमराव पांचाळे म्हणाले, गेल्या काही वर्षांत मराठी आणि हिंदी गझल लिहिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. साडेतीनशेच्या जवळपास आज गझलकार म्हणून समोर आले आहे. या क्षेत्रात पूर्वी महिलांची संख्या कमी होती मात्र गेल्या काही वर्षांत स्त्री गझलकार समोर येत आहे, त्यात क्रांती साडेकर यांचा उल्लेख करावा लागेल. सुरेश भट यांनी स्त्री गझलकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना लिहिते केले त्यात क्रांती यांचा समावेश आहे.  कवयित्री सुलभा हेर्लेकर यांचे यावेळी भाषण झाले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले.