संक्षिप्त Print
अतिवृष्टीमुळे फक्त कळमनुरी तालुक्यात पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान
हिंगोली, १५ डिसेंबर/वार्ताहर

जिल्ह्य़ात या वर्षी मराठवाडय़ातील सर्वाधिक पावसाची नोंद होऊन पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सरकारकडे मात्र केवळ कळमनुरी तालुक्यातच ५० टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यामुळे अन्य चार तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकरी नाराज आहेत. पिकांच्या नुकसानीबाबत सरकारी माहितीनुसार केवळ कळमनुरी तालुक्यात ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यानुसार एकूण बाधित क्षेत्र ११ हजार ३९२.३६ हेक्टर व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १० हजार ४३७ आहे. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे व त्यानंतर कापसाचे झाले आहेत. जिल्ह्य़ामध्ये यावर्षी अतिवृष्टीमध्ये पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या भागामध्ये पिकाचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसानभरपाईचे अनुदान दिले जाते व त्यापेक्षा कमी नुकसान झाल्यास भरपाई दिली जात नाही. सेनगाव, कळमनुरी, हिंगोली तालुक्यांतून कयाधू व पेनगंगा नद्या वाहतात. औंढा नागनाथसह इतर सर्वच तालुक्यांत ओढे-नाले आहेत. या नद्या, ओढे, नाल्याच्या पुरात नदी, ओढय़ाच्या काठच्या जमिनी वाहून तर गेल्याच; पण सततच्या पावसाने सर्वत्र पिकांचे नुकसान झाले. असे असतानाही सरकारने नोंद फक्त कळमनुरी तालुक्याचीच घेतली.    

पूर्ववैमनस्यातून एकावर हल्ला
नांदेड, १५ डिसेंबर/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या पाच जणांनी पूर्व वैमनस्यातून शंकर हरकरे यांच्यावर आज प्राणघातक हल्ला केला. दुपारी झालेल्या या प्रकाराने चौफाळा परिसरात काही काळ तणाव होता. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश हरकरे यांचे शंकर चुलत भाऊ आहेत. चौफाळा परिसरात राहणाऱ्या शंकर हरकरे व गजानन मामीडवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. या भागात अस्तित्व दाखवण्यासाठी सुरू असलेल्या या लढाईत यापूर्वीही मारामारीही झाली. आज शंकर हरकरे दुपारी घरी जात असतानागजानन मामीडवार, बाली कांबळे, आनंदा धोपटे, बालाजी धोपटे व अन्य एकाने त्यांच्यावर तलवार, लोखंडी सळई, खंजरने हल्ला केला. गंभीर जखमी हरकरे यांना नांदेडच्या गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.    

कुंटूनर येथे भरदिवसा शेतकऱ्याचा खून
नांदेड, १५ डिसेंबर/वार्ताहर

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे आज भर दुपारी एका शेतकऱ्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी तुळशीराम पुपलवाड (वय ३०) याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, नायगाव तालुक्यातील पाटोदे येथील शेतकरी शंकर व्यंकटी पुपलवाड (वय ५५) आज कुंटूर येथे आले होते. त्यांना तुळशीराम पुपलवाड भेटला. ‘तुम्ही निवडणुकीच्या काळात, तसेच अन्य वेळी माझा वापर केला. पण तुम्ही माझे काही भले केले नाही,’ असे म्हणत तुळशीरामने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. जखमी शंकर पुपलवाड यांना गावकऱ्यांनी नांदेडच्या सरकारी रुग्णालयात नेले. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले.  तुळशीराम गावातल्या एका वाडय़ात शिरला. त्याने पोलिसांना बोलवण्याची सूचना केली. काही वेळातच पोलीस तेथे आले व त्यांनी त्याला अटक केली.    

ग्वाल्हेर युवक महोत्सवामध्ये विद्यापीठाला आठ पारितोषिके
नांदेड, १५ डिसेंबर/वार्ताहर

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम विभागीय युवक महोत्सवामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने चित्रकला, कातरकाम, व्यंगचित्रकला यांसह आठ पारितोषिके पटकाविली. या महोत्सवात पाच राज्यांच्या मिळून ३७ विद्यापीठाच्या संघांनी भाग घेतला होता. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शास्त्रीय गायन (तृतीय), ऑन दी स्पॉट पेंटिंग (तृतीय), पोस्टर (प्रथम), कोलाज (प्रथम), कार्टूनिंग (प्रथम) अशी पाच पारितोषिके मिळविली आहेत. तसेच पहिल्यांदाच विद्यापीठाला ललित कला विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. पुणे विद्यापीठात झालेल्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवामध्ये रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला लघुनाटिका (तृतीय), वक्तृत्व (तृतीय) व व्यंगचित्रकला (द्वितीय) यामध्ये पारितोषिके मिळाली. या दोन्ही संघाचे नेतृत्व प्रा. गणेश शिंदे, प्रा. अंबादास कांबळे, प्रा. डॉ. अंबादास कदम, प्रा. डॉ. जयदेवी पवार, प्रा. परळकर यांनी केले.    

नोंदणी क्रमांक नसलेल्या दुचाकींवर वैजापुरात कारवाई सुरू
वैजापूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

वाहनावर नोंदणी क्रमांक नसलेल्या दुचाकीधारकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.सोमवारी सायंकाळी शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलीस निरीक्षक के. एल. नजल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी पवार यांनी केलेल्या कारवाईत आठ विनाक्रमांक दुचाकीस्वारांना दंड करण्यात आला. या वेळी पोलिसांनी या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांची काय कारवाई चालू आहे हे पाहण्यासाठी थांबलेले वाहनावर नोंदणीक्रमांक नसलेले दुचाकीस्वार   अलगदपणे या वेळी पोलिसांच्या हाती लागले. जप्त करण्यात आलेल्या या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस कर्मचारी सीताराम घुगे यांनी दिली.    

जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत केजचा जिमखाना क्रिकेट संघ विजयी
बीड, १५ डिसेंबर/वार्ताहर

वडवणी येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिंचाळ्याच्या आदर्श क्रिकेट क्लबवर मात करून केजच्या जिमखाना क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाचा भारतीय जनता पक्षाचे युवक कार्यकर्ते फुलचंद ऊर्फ बाबरी मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अंतिम सामन्यात जिमखाना संघाने १२ षटकांत ९ बाद १२९ धावा केल्या. मात्र १२९ धावांचे लक्ष्य गाठताना आदर्श क्रिकेट क्लबचा डाव १२ षटकांत केवळ ९६ धावांमध्येच आटोपला.  फुलचंद मुंडे यांच्या हस्ते विजेत्या संघास स्मृतिचिन्ह व २१ हजार रुपये रोख, तर उपविजेत्यास ११ हजार व स्मृतिचिन्ह देण्यात आले. या वेळी सचिन सानप, अनिल वाघमारे, जानकीराम उजगरे, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक मुळे उपस्थित होते.    

बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गेवराई, १५ डिसेंबर/वार्ताहर

गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या चार जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या महिन्यात आत्तापर्यंत सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील वाळू तस्कर मोठय़ा प्रमाणावर वाळूउपसा करीत आहेत. दि. १४ डिसेंबर रोजी मंडळ अधिकारी श्रीरंग ठोंबरे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जे. एस. टोपे, गणेश साहेबराव जाधव, अर्जुन नामदेव काटकर, गोपाळ गोरख सराटे (रा. पाथरवाला, ता. अंबड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सर्व आरोपी दोन ट्रॅक्टरसह फरार झाले आहेत.    

वाढीव दर मिळण्यासाठी कांदाकाढणीची लगबग
तुळजापूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

अतिवृष्टीपाठोपाठ करपा रोगाच्या उपसर्गातून वाचलेल्या कांदा पिकाचा वाढीव दर पदरात पाडून घेण्यासाठी तालुक्यातील कांदाउत्पादकांनी कांदाकाढणीसाठी लगबग सुरू केली आहे. अतिवृष्टीपाठोपाठ करता, भुरी रोगाच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील ८० टक्के कांद्याचे पीक गेले होते. मात्र फवारणी आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना करणाऱ्या काही नशीबवान कांदाउत्पादकांनी त्यांच्या पिकांचे संवर्धन करण्यात यश मिळविले. मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी कांद्याची आवक घटल्याने सोलापूर-हैदराबाद बाजारपेठेतील आडत व्यापाऱ्यांनी चक्क कांदाउत्पादकांच्या शेतात धाव घेतली होती. कांद्याची सतत वाढणारी मागणी आणि त्या तुलनेत पुरवण्यात घट झाल्याने सोलापूर बाजारपेठेतील दर चार हजारांवर गेल्याची माहिती मिळाल्याने कांदाउत्पादकांनी आपल्या शेतातील माल काढून बाजारात पोहोचविण्याची घाई सुरू केली आहे. नेमकी हीच नस धरून मजुरांनी कांदाउत्पादकांना वेठीला धरण्याले अनेक खेडय़ांत दिसले.    

राज्यस्तरीय खुल्या ‘झेप’ नृत्य व गायन
स्पर्धेचे आयोजन
औरंगाबाद, १५ डिसेंबर /प्रतिनिधी

मराठवाडा ग्रामीण युवक विकास मंचाच्या वतीने येत्या १ जानेवारीला झेप या राज्यस्तरीय खुल्या नृत्य आणि गायन स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. सामूहिक   बक्षिस   ६००१ आणि   वैयक्तिक बक्षिस ५००१ रुपये    असलेल्या   या    स्पर्धेसाठी २७    डिसेंबरला    येथील    तापडिया नाटय़मंदिरात    निवड चाचणी    घेण्यात    येणार असल्याचे   संयोजक समीर  राजूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे    कळविले   आहे. इच्छुकांनी ०२४०-६६०६६१४ किंवा ९०११६०११०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. २२ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.    

कुख्यात चोरटय़ांना पाठलाग
औरंगाबाद, १५ डिसेंबर /प्रतिनिधी

पादचाऱ्याला लुटून पळ काढणाऱ्या दोघा कुख्यात चोरटय़ांना क्रांती चौक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास क्रांती चौकात घडली. वाजीद उर्फ कदीर कुरेशी (वय २८, रा. सिल्लेखाना) आणि महम्मद अयूबखान उर्फ तय्यर युसूफखान (वय ४६, रा. लोटाकारंजा) अशी चोरटय़ांची नावे असून वाजीद विरुद्ध क्रांती चौक तसेच शहरातील अन्य पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्य़ांची नोंद आहे. कैलास लैगे हे पायी जात असताना दोघांनी त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेतला. लैगे यांनी याची माहिती गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रताप कोलते यांना दिली. कोलते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची चौकशी केली असता दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. यातील वाजीदविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्याला शहर आणि जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव उपायुक्तांकडे पाठविण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा ऐवज आणि एक धारदार खंजीर जप्त केला आहे.

खिसेकापूला अटक
करून पकडलेशहागंज येथील गर्दीत खिसे कापण्याच्या उद्देशाने फिरणारा कय्युमखान याकुबखान (रा. चंपा चौक) याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केली. तो गर्दीतील लोकांचे खिसे चाचपडत फिरत असल्याचे दिसताच पोलीस त्याच्या दिशेने गेले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून सिटीचौक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.    

विवाहातून फसवणूक झाल्याची महिलेची तक्रार
औरंगाबाद, १५ डिसेंबर /प्रतिनिधी

नपुंसक युवकासोबत लग्न लावून फसवणूक केली म्हणून एका २३ वर्षांच्या युवतीने पुण्याच्या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि हुंडाबळीची तक्रार दिली आहे. सध्या औरंगाबाद शहरात वास्तव्यास असलेल्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ३ डिसेंबरला तिचे लग्न निमेश टोपीवाला (रा. हडसपर) याच्याशी झाले होते. हंसाबेन आणि हरकिसन टोपीवाला या निमेशच्या वडिलांनी घाईत हे लग्न उरकून टाकले होते. मात्र निमेश हा नपुंसक असल्याचे तिच्या निदर्शनास आले. सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली तसेच येथे रहायचे असेल तर कार खरेदी करण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. त्यामुळे त्या युवतीने पुणे सोडले. येथे आल्यानंतर तिने छावणी पोलीस ठाणे गाठून तिघांविरुद्ध तक्रार दिली.    

जालना जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश
औरंगाबाद, १५ डिसेंबर/खास प्रतिनिधी

जालना जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. भूषण गवई व न्या. रवींद्र बोर्डे यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सन २००४ पासून जालना जिल्हा सहकारी बँकेवर राज्य शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये प्रारुप मतदारयादी कार्यक्रम सुरू करण्यात आला. १० जानेवारी २०१० ला अंतिम मतदारयादी घोषित करण्यात आली. या अंतिम मतदारयादीला संजय हर्षे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. अंतिम मतदारयादी रद्दबातल करून नवीन पोटनियमाप्रमाणे प्रारुप मतदारयादी तयार करून पुन्हा निवडणूक प्रक्रिया घ्यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी न्या. गवई व न्या. बोर्डे यांच्यासमोर झाली. नवीन पोटनियमाचा मतदारयादीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा युक्तिवाद शासनाचे वकील विठ्ठलराव दिघे यांनी न्यायालयात केला. तसेच पुढील निवडणुकीवरही कोणताही परिणाम होणार नाही. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेत हस्तक्षेप करू नये अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. निवडणुकीची प्रक्रिया एक वर्षांपूर्वीच सुरू झाली आहे. न्यायालयाने तीनही याचिका फेटाळून लावल्या आणि जालना जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जालना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सुरू करावा असे निर्देश दिले. या याचिकेत याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड्. अनिल गोळेगावकर व अजय तल्हार आणि राज्य शासनातर्फे अ‍ॅड्. विठ्ठलराव दिघे आणि जिल्हा बँकेतर्फे वसंतराव साळुंके यांनी काम पाहिले.    

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेला अवघ्या ६ ग्रामपंचायतींचा प्रतिसाद
वैजापूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

महत्त्वाकांक्षी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेला तालुका पंचायत समिती कार्यालय क्षेत्रातील १३४ ग्रामपंचायतींपैकी अवघ्या सहा ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला आहे. ग्रामविकास विभागांच्या वतीने गावपातळीवर गावाला समृद्धीचा चेहरा बहाल करण्याकरिता ही योजना राबविण्यात येणार आहे. बुधवारी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेसंबंधी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डुबे, जिल्हा परिषद अध्यक्षा लता पगारे, पंचायत समिती सभापती नीता राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयाचा योजनेत सहभाग नोंदविल्याची ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत १२८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला नसल्याचे पुढे आल्याने चांगलीच खळबळ उडाली. अरुण डुबे यांनी गावस्तरावर काम करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर योजनेत सहभा न घेतल्याने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावर गट विकास अधिकारी एस. एम. खिल्लारे यांनी त्यांच्याकडे योजनेत ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी १५ दिवसांची अंतिम मुदत मागून घेतली. विशेष म्हणजे बुधवारी योजनेसंबंधी बैठकीला उपस्थितीत राहण्याच्या सूचना तालुका पंचायत समिती कार्यालयाने ग्रामसेवकांना दिल्या असताना अनेकजण गैरहजर होते. त्यामुळे बैठकीत डुबे यांनी संतप्त होत प्रशासनाली अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. श्री. खिल्लारे यांना गुरुवारी (दि. १६) सर्व ग्रामसेवकांची बैठक या विषयावर पंचायत समिती सभागृहात बोलाविली असून मी येईपर्यंत त्याचे कामकाज सुरू करू नका, असेही श्री. डुबे यांनी पंचायत विस्तार अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे उद्याची बैठक चांगलीच तापणार असे दिसते.     

डॉ. गंगाधर पानतावणे यांना  आंबेडकर प्रबोधन पुरस्कार
औरंगाबाद, १५ डिसेंबर/खास प्रतिनिधी

समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक, संशोधक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांना घोषित करण्यात आला आहे. महापौर अनिता घोडेले यांनी या पुरस्काराची घोषणा केली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी लोककवी वामनदादा कर्डक, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात आणि सामाजिक कार्यकर्ते भिकोजी इधाते यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.    

डॉ. बऱ्हाणपूरकर यांना ‘प्लेनरी स्पीच’ बहुमान
 औरंगाबाद, १५ डिसेंबर/खास प्रतिनिधी

फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या युरोपियन लिग ऑफ इन्स्टिटय़ूटस ऑफ आर्टस या संघटनेच्या ११ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत निरीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आलेल्या डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांना प्लेनरी स्पीच हा बहुमान देण्यात आला आहे. भारतासारख्या देशामध्ये कला केवळ मनोरंजनासाठी नसून त्या जीवन जगण्याचा अविभाज्य भाग आहे. कलाविषयक जाणिवा समृद्ध करायच्या असतील तर भारतासारख्या देशाकडून जगाला खूप काही शिकण्यासारखे आहे. भारतीय कलांची मुळे परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. पाश्चिमात्य जग हे आव्हान पेलण्यास तयार होईल, असा आशावाद डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी या परिषदेमधील ‘प्लेनरी स्पीच’मध्ये केला होता. या परिषदेला ३२ देशांतील ५०० प्रतिनिधी उपस्थित होते. एकूण ९ शोधनिबंधांचे मूल्यमापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. बऱ्हाणपूरकर यांनी केले. युरोपियन देशांमध्ये कलाविषयक उच्च शिक्षण कसे असावे याविषयीचे विचार त्यांनी प्लेनरीमध्ये मांडले.     

छावा मराठा संघटनेचे बीडमध्ये उपोषण सुरू
बीड, १५ डिसेंबर/वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी छावा मराठा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले.  मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली आहेत. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे उपोषण सुरू केल्याचे संघटनेने म्हटले आहे. किशोर चव्हाण, गंगाधर काळकुटे, आनंद जाधव, सुहास वनवे, प्रशांत कोटुळे आदी कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.    

सर्वशाखीय ब्राह्मण वधू-वर नोंदणी पुस्तिकेचे प्रकाशन
लातूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

श्रीरंग, आशीर्वाद, गजानन महाराज, गजानन, सुयोग, वरद गणेश मंडळांनी तयार केलेल्या सर्वशाखीय ब्राह्मण वधू-वर मेळाव्याच्या नोंदणी पुस्तिकेचे प्रकाशन रवी जोशी व देवीकुमार पाठक यांच्या हस्ते झाले. या वेळी अंबिका पाठक, आनंद कुलकर्णी, व्ही. पी. कुरुलकर, प्रभाकर सांगवीकर, पद्माकर पाठक, दिवाकर देशमुख, उत्तमराव दबडगावकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नंदकिशोर पाठक यांनी केले.    

अहमदपूरमध्ये शनिवारपासून  श्रीदत्तजयंती संगीत महोत्सव
अहमदपूर, १५ डिसेंबर/वार्ताहर
शहरातील पंतोजी परिवारातर्फे शनिवारपासून (दि. १८) सोमवापर्यंत (दि. २०) श्रीदत्त जयंती संगीत महोत्सवाचे श्रीलक्ष्मीनारायण सदन येथे आयोजन करण्यात आले आहे.   शनिवारी रात्री ९ वाजता लातूर येथील वृषाली देशमुख (कोरडे) यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. रविवारी रात्री नांदेड येथील सुरमणी धनंजय जोशी, नांदेड यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे.  महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सोमवारी दुपारी ३ वाजता पुण्याच्या रोहिणी माने यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून सायंकाळी ६ वाजता श्रीदत्तजन्म सोहळा व रात्री ९ वाजता पुण्याच्या मंजूषा पाटील      यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक दत्तात्रेय पंतोजी, विजयराव पागे, डॉ. अशोक सांगवीकर, शिवराजअप्पा चौधरी यांनी केले आहे.    

अधिक भावाने विक्री करणाऱ्या  रास्त भाव दुकानदारांवर जप्ती
हिंगोली, १५ डिसेंबर/वार्ताहर

कळमनुरी तालुक्यातील डिग्रस (बु.) येथील दुकानदार दत्तराव लामगे यांच्या रास्त भाव व किरकोळ केरोसीन दोन्ही परवान्याचे प्राधिकारपत्र रद्द करून संपूर्ण अनामत जप्त करण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील कागबन येथील किरकोळ केरोसीन परवानाधारक सुभाष महाजन यांची ५० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भिकाजी घुगे यांनी दिली. श्री. घुगे यांनी पत्रकारांना सांगितलेकी, कळमनुरी तालुक्यातील डिग्रस (बु.) येथील रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक दत्तराव लामगे यांच्या दुकानाबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन तहसीलदारांनी ३१ ऑक्टोबर २०१० रोजी चौकशी अहवाल दिला. त्यानंतर त्यांच्या दोन्ही परवान्याचे प्राधिकारपत्र रद्द करून संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली. वसमत तालुक्यातील कागबन येथील किरकोळ केरोसीन परवानाधारक सुभाष महाजन यांच्या दुकानाची तपासणी वसमत तहसीलदारांनी केली असता त्यांनी केरोसीनची विक्री अधिक भावाने केल्याचे आढळून आल्याने या परवानाधारकाची ५० टक्के अनामत रक्कम जप्त केल्याची माहिती श्री. घुगे यांनी दिली.    

‘विद्यार्थ्यांनी प्रात्याक्षिक, प्रकल्प व संवादकौशल्याकडे लक्ष देणे गरजेचे’
लातूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

अभ्यासक्रमात प्रात्याक्षिक, प्रकल्प व संवादकौशल्य ही अतिशय महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी या बाबींकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी गणेश कुलकर्णी यांनी केले. संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी मेळाव्यात श्री. कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. आर. पाटील होते. डॉ. पाटील म्हणाले की, महाविद्यालयाच्या विकासात विद्यार्थ्यांचा फार मोठा वाटा आहे. माजी विद्यार्थी विविध प्रकारे महाविद्यालयाच्या विकासात भर टाकू शकतील. प्रास्ताविक उपप्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी व सूत्रसंचालन मनोज जोशी यांनी केले. कार्यक्रमास  प्रा. एन. एच. कोंडेकर, प्रा. एन. एस. झुल्पे, प्रा. बी. एम. सोनटक्के, प्रा. आय. एम. काझी, आदी उपस्थित होते.    

सदोष बिले, ‘क्रॉस कनेक्शन’मुळे बी.एस.एन.एल.चे ग्राहक त्रस्त
अंबाजोगाई, १५ डिसेंबर/वार्ताहर

‘भारत संचार निगम लिमिटेड’कडून तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सदोष बिलांचे वाटप होत आहे. तसेच बी.एस.एन.एल.च्या मोबाईलची रेंज मिळत नसल्यानेही ग्राहक त्रस्त आहे. एकेकाळी बी. एस. एन. एल.च्या मोबाईल सेवेचे सीमकार्ड घेण्यासाठी ग्राहक रांगा लावत. प्रतीक्षायादीत तरी नाव यावे यासाठी अधिकाऱ्यांच्या ओळखी काढत. या कंपनीने लँडलाईन, ब्रॉडबँड, तरंग, मोबाईल आदी सेवा देण्यासाठी शहरात मोठी यंत्रणा उभी केली. असे सारे असले, तरी सेवेबाबत मात्र ओरड कायम आहे. या कार्यालयातील मोबाईल सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी वागणे सौजन्यपूर्ण नसते. गेल्या काही महिन्यांपासून बी. एस. एन. एल.ने सदोष बिले ग्राहकांना पाठविली आहेत. वेळेत बिल भरूनही पुढील बिलांमध्ये थकबाकी दाखविली जात आहे. मोबाईलची ‘रेंज’ही अनेकदा मिळत नाही. मिळाली तर ‘क्रॉस कनेक्शन’ होते. इंटरनेटची सेवाही जलद नाही. एक ना अनेक अडचणींना सध्या बी.एस.एन.एल.च्या ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींची माहिती असूनही वरिष्ठ अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. बिले भरण्यासाठी  दोन खिडक्या सुरू करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.    

रस्त्याचे काम खासदार निधीतून
लातूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

शहरातील गंजगोलाई भागातील शिवाजी रस्ता ते वलानी ट्रान्सपोर्ट हा रस्ता खासदार जयवंत आवळे यांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल गंजगोलाई परिसरातील व्यापाऱ्यांनी श्री. आवळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नंदकिशोर अग्रवाल, विशाल खंडेलवाल, राजकुमार अग्रवाल उपस्थित होते.

कृषिमंत्री पवार यांची भेट
परळी वैजनाथ, १५ डिसेंबर/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मागासवर्ग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची दिल्ली येथे कृषी भवनात भेट घेतली. ओबीसी प्रवर्गाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन श्री. पवार यांनी दिल्याची माहिती ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्रावण रॅपनवाड यांनी येथे दिली. शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष श्रावण रॅपनवाड, प्रवक्ते एकनाथ देशमुख, मराठवाडा अध्यक्ष जगन्नाथ फुलारी, मीननाथ गोवारी, अरुण पाटील आदींचा समावेश होता.

डॉ. बसवंते यांच्या ग्रंथास पुरस्कार
नांदेड, १५ डिसेंबर/वार्ताहर

इंदिरा गांधी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक व लेखक डॉ. माधव बसवंते यांच्या ‘मातंग समाज : इतिहास आणि वास्तव’ या ग्रंथास श्रीचक्रधर स्वामी वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंगोली जिल्ह्य़ातील शेवाळा येथील श्रीचक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी आचार्य व्यास पुरस्कार डॉ. बसवंते यांच्या ग्रंथास जाहीर झाला आहे.

आष्टी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी थोरवे
बीड, १५ डिसेंबर/वार्ताहर

आष्टी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी हनुमंत थोरवे यांची व सचिवपदी शशिकांत कुलकर्णी यांची एकमताने निवड झाली. नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी संघाची बैठक मावळते अध्यक्ष एस. के. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नवे पदाधिकारी असे : उपाध्यक्ष - एम. बी. झगडे, उपसचिव - नवनाथ शेकडे, खजिनदार - प्रल्हाद माळशिखरे, उपखजिनदार - डी. एस. ससाणे, महिला प्रतिनिधी- सीमा दिवे.

पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बहिरट
वैजापूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

तालुका पोलीस पाटील संघटनेची कार्यकारिणी अलीकडेच निवडण्यात आली. ती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष-  बाबासाहेब बहिरट (डवाळा), उपाध्यक्ष - रावसाहेब सोमासे (लोणीखुर्द), सचिव - लुकास गायकवाड (भिंगी), सदस्य - मच्छिंद्र त्रिभुवन (तिडी), पोपटराव खटाणे (सावखेडगंगा), लक्ष्मण कहार (बाभुळगाव), राजेंद्र तांबे (नागमठाण), सुमित्रा गायकवाड (जळगाव), कृष्णा सोमासे (म्हस्की), सोपान बारसे (वीरगाव), देशमुख (शिऊर), गोरे (वाघला).

अध्यक्षपदी नामदेव साखळे, विष्णू फरकाडे सचिव
सिल्लोड, १५ डिसेंबर/वार्ताहर

तालुक्यातील लिहाखेडी येथील (कै.) कडुबा पाटील साखळे सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नामदेव साखळे यांची व सचिवपदी विष्णू फरकाडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.  अन्य पदाधिकारी असे : उपाध्यक्ष - माधवराव कळात्रे, कोषाध्यक्ष - बाळाराम पाटील साखळे, सहसचिव - राजू साखळे.

निबंध स्पर्धेत विनय सोनवणे पहिला
नळदुर्ग, १५ डिसेंबर/वार्ताहर

अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशनने घेतलेल्या कै. विठ्ठल पुंडलिक रेगे स्मृती निबंध स्पर्धेत येथील जिल्हा परिषद प्रशालेचा नववीचा विद्यार्थी विनय नामदेव सोनवणे पहिला आला. त्याला फाऊंडेशनच्या वतीने डॉ. मधुकर देशपांडे यांच्या हस्ते रोख ५०० रुपये, ढाल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.     

हिंगोली जिल्ह्य़ात सिमेंट व मातीबंधारे बांधणार
हिंगोली, १५ डिसेंबर/वार्ताहर

जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात खासदार सुभाष वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. जिल्ह्य़ात सुमारे १६ कोटी रुपये खर्चातून सिमेंट व मातीबंधारे घेण्याचे ठरले. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश माज्रीकर, निवासी उपजिल्हा अधिकारी बी. ए. वाडेकर, उपविभागीय अधिकारी परळीकर उपस्थित होते. जिल्ह्य़ातील तिन्ही आमदार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आटकोरे मात्र या
बैठकीला अनुपस्थित होते.

शरद पवार गौरव विशेषांकाचे प्रकाशन
सिल्लोड, १५ डिसेंबर/वार्ताहर

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरील गौरव विशेषांकाचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांच्या हस्ते काल झाले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एस. टी. जगताप होते. कवी सुभाष कड यांनी संपादित केलेल्या अंकामध्ये पवार यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक पंडित यांनी स्वागत केले. कार्यक्रमास संतोष झाल्टे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक कौतिक बडक, नगरसेवक विनोद मंडलेचा, वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे, जी. एस. आरके उपस्थित होते.

मनोज लटपटे यांना राष्ट्रीय पुरस्कार
गंगाखेड, १५ डिसेंबर/वार्ताहर

कृषी क्षेत्रात केलेल्या संशोधनार्थ तालुक्यातील कोद्री येथील मनोज बाळासाहेब लटपटे यांना ‘इंडियन सोसायटी ऑफ ऑग्युमेंट’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हायड्रोजनचा उपयोग करून फुलांच्या रंगात बदल करण्याचे संशोधन श्री. लटपटे यांनी केले. त्याबद्दल  तामिळनाडू कृषी विद्यापीठ व इंडियन सोसायटी ऑफ ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर यांनी आयोजित केलेल्या ‘प्लँट डायव्हरसिटी फॉर अ‍ॅस्मेटिक व्हॅल्यूज अ‍ॅण्ड लॅण्डस्केप गार्डनिंग’ या राष्ट्रीय चर्चासत्रात श्री. लटपटे यांना सन्मानित करण्यात आले.

शिवसैनिकांचा आज मेळावा
धारूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

शहरात उद्या (गुरुवारी) शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नगरेश्वर मंदिरात तो होईल, अशी माहिती तालुकाप्रमुख विनायक ढगे यांनी दिली. मेळाव्याचे उद्घाटन बीड जिल्हा संपर्कप्रमुख सुनील प्रभू यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख अनिल जगताप असतील. कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख विठ्ठळ लगड, वडवणी तालुकाप्रमुख विनायक मुळे, सतीश सोळंके, राजेंद्र बेदरे उपस्थित राहणार आहेत. शहरात या वेळी ११ ठिकाणी शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन शहरप्रमुख दत्तात्रेय शिनगारे, माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत देशपांडेयांनी केले आहे.

वैद्यकीय अधीक्षकाचे पद तातडीने भरण्याची मागणी
गंगाखेड, १५ डिसेंबर/वार्ताहर

शहरात असलेल्या उप-जिल्हा रुग्णालयास सहा वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक मिळत नाही. विधिमंडळाच्या २००४च्या हिवाळी अधिवेशनात त्या वेळच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी यांना अकार्यक्षमतेबद्दल निलंबित केले होते. त्यानंतर रिक्त पदे भरण्याचे केवळ आश्वासन वेळोवेळी श्रीमती मुंदडा यांच्यासह आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या रुग्णालयाचा व्याप मोठा आहे. वैद्यकीय अधीक्षक हे महत्त्वाचे पद सहा वर्षांपासून प्रभारी आहे. परिणामी प्रशासन कोलमडले आहे.

थंडीचा कडाका वाढला
परतूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

शहरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून हुडहुडी भरणारी थंडी प्रकर्षांने जाणवू लागली आहे. यंदा थंडीचे आगमन तब्बल महिनाभर उशिराने झाले. गेल्या दोन दिवसांपासून मात्र कडाक्याची थंडी पडली असून थंडगार हवा वाहत आहे. थंडीअभावी मध्यंतरी रेंगाळलेली गव्हाची पेरणी आता पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. थंडीमुळे रस्त्यांवर रात्री लवकरच सामसूम होताना दिसते.

राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव
बीड, १५ डिसेंबर/वार्ताहर

स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवास येत्या दि. ३१पासून सुरुवात होत आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी भारत सासणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा महोत्सव होईल. तो दि. १० जानेवारीपर्यंत चालेल. राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्याख्याते त्यात हजेरी लावणार आहेत, अशी माहिती गौतम खटोड यांनी दिली.

शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन
तुळजापूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

उसाला किमान २ हजार २०० रुपये टनाप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी सोलापूर रस्त्यावर काल ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याणराव भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अमरराजे भोसले, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष जीवन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारल्याने रस्त्यावरील रहदारी बंद झाली होती. ऊसतोड करणाऱ्या कामगारांमार्फत होणारी शेतकऱ्यांची लूट, कारखान्यामार्फत होणारी दिरंगाई यापुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा श्री. भोसले यांनी दिला.    

सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांची आज कार्यशाळा
परभणी, १५ डिसेंबर/वार्ताहर

संपूर्ण स्वच्छता अभियानात जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा उद्या (गुरुवारी) आयोजित केली आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय परभणी येथे सकाळी ११ वाजता कार्यशाळा सुरू होईल. संत गाडगेबाबा राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता अभियानचे अध्यक्ष माधवराव पाटील शेळगावकर, संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या संवाद व क्षमता विकास कक्षाचे राज्य समन्वयक सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. वळवी, पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे, परभणी केआरसीचे माधव पाटील झरीकर आदी कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कुसूम देशमुख असतील.  संपूर्ण स्वच्छता मोहिमेत पाणंदमुक्त गाव व निर्मलग्राम चळवळ प्रभावीपणे राबविताना लोकप्रतिनिधींचे सहकार्य महत्त्वाचे आहे. म्हणून नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सांगितले.    

न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन
अंबाजोगाई, १५ डिसेंबर/वार्ताहर

श्रीबालाजी शिक्षण संस्थेअंतर्गत व सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम मान्यता असणाऱ्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन कोळसा खाणमंत्री प्रकाश जयस्वल यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे. श्रीबालाजी शिक्षण संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी पाच एकर परिसरात न्यू व्हिजन पब्लिक स्कूलची भव्य इमारत उभी केली आहे. या इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी श्री. जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बीडचे संपर्कमंत्री जयदत्त क्षीरसागर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुजफ्फर हुसेन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, रमेश आडसकर, प्राचार्य खडकभावी उपस्थित राहणार आहेत.    

सुशीला बेद्रे यांचे निधन
लातूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

ज्येष्ठ नागरिक सुशीला भगवानराव बेद्रे यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती भगवानराव, चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे त्यांचे चिरंजीव होत. सुशीलाबाई यांच्यावर मारवाडी स्मशानभूमीत सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.    

‘रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन’चे बेमुदत उपोषण
जालना, १५ डिसेंबर/वार्ताहर

जिल्हा सहकारी बँकेच्या संदर्भातील आपल्या विविध मागण्यांसाठी ‘रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेदमुत उपोषण सुरू केले आहे. संघटनेचे जालना शाखा अध्यक्ष आर. सी. घुमारे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य या उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. आंदोलकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत- मे २०१० पासून वाढीव महागाई भत्ता द्यावा, १ एप्रिल २००३ पासूनची स्थगित वार्षिक पगारवाढ द्यावी, २००९-२०१० ची नियमीत वार्षिक पगारवाढ द्यावी, संघटनेच्या अध्यक्षांची बदली मुख्य कार्यालयात करावी, आर. सी. घुमारे व एस. आर. दाभाडे यांना पदोन्नती द्यावी, शासनाच्या नियमानुसार ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढवावी, पी. डब्ल्यू. लहाने आणि आय. टी. चव्हाण यांना पूर्ववत कामावर घ्यावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार बदल्या रद्द करून त्या त्यांच्या सोयीनुसार कराव्यात, रोख सुरक्षा खात्यातील रकमा नावे टाकण्याच्या प्रकरणी बँकेच्या माजी प्रशासकांविरुद्ध कारवाई करावी, इत्यादी. यासंदर्भात संघटनेने बँकेचे प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक (सहकार) यांना निवेदन दिले असून, त्यावर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) मराठवाडा प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.    

लातूरमधील पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाला संघर्ष समितीचा विरोध
लातूर, १५ डिसेंबर/वार्ताहर

लातूर शहरातील पाणीपुरवठा योजना खासगी कंपनीला सोपवण्यात आल्यामुळे हा कुटील डाव पालिका व सत्ताधाऱ्यांनी रचल्याचा आरोप खासगीकरण संघर्ष समितीने केला आहे. याचा निषेध म्हणून गूळमार्केट जवळ जलवाहिनी दुरुस्तीच्या ठिकाणी लावलेल्या जीवन प्राधीकरण व वॉटर सप्लाय कंपनीच्या फलकाला संघर्ष समितीने काल डांबर फासले. पाणीपुरवठा ही मुलभूत सेवा आहे. तिचे खासगीकरण हाणून पाडल्याशिवाय यापुढे जनता गप्प बसणार नाही, असे मत संयोजक उदय गवारे यांनी व्यक्त केले. या आंदोलनात त्र्यंबक स्वामी, ओमप्रकाश आर्य, बशीर शेख, प्रदीप गंगणे, सतीश देशमुख, बंडूसिंग भाट, ओमप्रकाश आर्य, राजकुमार जोशी आदींनी भाग घेतला.    

गेवराई तालुक्यात सुमारे ४ अब्ज रुपयाच्या कापूस खरेदीची शक्यता
गेवराई, १५ डिसेंबर/वार्ताहर

तालुक्यातील २६ कापूस खरेदी केंद्रावर कालपर्यंत (दि. १४) दीड अब्ज रुपये किंमतीच्या कापसाची खरेदी झाली. यंदाच्या कापूस हंगामात जवळपास ४ अब्ज रुपयांची खरेदी होण्याची शक्यता बाजार समितीचे सचिव दादाराव हकाळे यांनी व्यक्त केली. तालुक्यात स्थानिक आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मिळून ४० जिनिंग असून आणखी नवीन १० जिनिंगचे काम सुरू आहे. यंदा कापसाला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सध्या भारतीय कापूस खरेदी केंद्रातर्गत कापसाला ४ हजार ते ४ हजार ५० रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. खासगी व्यापाऱ्यांचा भाव ३ हजार ९०० ते ३ हजार ९५० रुपये क्विंटल आहे. तालुक्यातील २६ कापूस खरेदी केंद्रावर कालपर्यंत ३ लाख ५७ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला असून याची किंमत १ अब्ज ४९ कोटी ५० लाख रुपये आहे. यावर्षी मार्चपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार असल्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. डिसेंबरअखेपर्यंत २ अब्ज रुपयांची कापूस खरेदी तालुक्यात होऊन मार्चअखेपर्यंत ४ अब्ज रुपयांची कापूस खरेदी होण्याची शक्यता श्री. हकाळे यांनी व्यक्त केली.