‘घालीन लोटांगण’ला खामगावकरांची दाद Print
विदर्भ वृत्तान्त
खामगाव, १८ जानेवारी/वार्ताहर
साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव लिखित ‘घालीन लोटांगण’ या संगीत नाटकाला खामगावकरांनी भरभरून दाद दिली.  हेल्पलाईन शाखा खामगावच्या वतीने स्थानिक कोल्हटकर स्मारक सभागृहात रविवारी रात्री या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
राजकारणी बुवाबाजीच्या नावाखाली समाजातील भोळ्याभाबडय़ा जनतेची कशी लुबाडणूक करते, याचे उत्कृष्ट चित्रण ‘घालीन लोटांगण’मधून करण्यात आले. नाटकाचे लेखक ज्ञानेश महाराव यांनी स्वत: नाटकातील चिलटे महाराजांची भूमिका यथार्थपणे साकारली. यापूर्वी त्यांच्या ‘जिंकू या दाहीदिशा’ या नाटकालाही रसिकांनी दाद दिली होती.  ‘घालीन लोटांगण’मध्ये आजचे भोंदुबाबा, त्यांचे स्वार्थी शिष्यगण, भोळे भाविक, राजकारणी आदींची उत्कृष्ट चित्रण करण्यात आले. भोंदुगिरी व अंधविश्वासावर नाटकात सडकून टीका करण्यात आली.  
८२ वर्षांचे अनंत राणे यांनी सामान्य माणसाची साकारलेली भूमिका दाद मिळवून गेली. हास्याचे फवारे उडवणाऱ्या धम्माल विनोदी ‘घालीन लोटांगण’ संगीत नाटकाने रसिकांचे मनोरंजन तर केलेच मात्र, समाजातील कुप्रथांवर सडकून टीकाही केली.  नाटकाचे लेखक ज्ञानेश महाराव तर, दिग्दर्शक संतोष पवार, सहनिर्माता योगेश राणे आहेत.  ओम नाटय़गंधा, मुंबईची ही निर्मिती असून नेपथ्य अंकुश कांबळी, पाश्र्वसंगीत दत्ता थिटे, लाईटस सुनील देवळेकर, साऊंड सुशील आंबेकर यांचा आहे.  
या नाटकात दूरचित्रवाणीतील ४० ते ४५ कलावंतांचा सहभाग होता. मध्यंतरात हेल्पलाईन शाखेच्या वतीने ज्ञानेश महाराव यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी रंगमंचावर हेल्पलाईनचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, गणेश चौकसे, रामदादा मोहिते यांची उपस्थिती होती. पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेश राजोरे यांचाही ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  नाटकाच्या प्रयोगाला शहरातील महिला व पुरुषांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.  रसिकांनी नाटकाला उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन कलावंतांचा उत्साह वाढवला.