दिग्गजांच्या वात्रटिकांना नगरकरांची भरभरून दाद Print

नगर, २१ डिसेंबर/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातला माणूस जिल्ह्य़ातून बाहेर जातो, जाहीर कार्यक्रमांमधून राज्यच नाही तर देश गाजवतो व नंतर जिल्ह्य़ात परततो त्यावेळी रसिक नगरकर त्याला भर सभागृहात उभे राहून टाळ्या वाजवून अभिवादन करतात. प्रदीर्घ खंडानंतर यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात कार्यक्रम सादर करणारे जिल्ह्य़ाचे सुपुत्र, प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांना मंगळवारी रात्री हा अनुभव आला.
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हेअर्स असोसिएशनच्या वतीने रौप्यमहोत्सवानिमित्त फुटाणे व त्यांच्या सहकारी कवींच्या वात्रटिका वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच मोठय़ा कालखंडानंतर हा कार्यक्रम होत असल्याने रसिक नगरकरांना थंडीचे दिवस असूनही चांगली गर्दी केली होती. त्यातही फुटाणे यांना भरभरून दाद मिळाली व भारत कधी कधी माझा देश आहे या त्यांच्या वात्रटिकेवर तर श्रोते सभागृहात उभे राहिले व त्यांनी फुटाणे यांना अभिवादन केले. त्यांच्याशिवाय कवी फ. मु. शिंदे, अशोक नायगावकर, सुरेश शिंदे, साहेबराव ठाणगे, प्रशांत मोरे, तुकाराम धांडे, संजीवनी तडेगावकर, जयराम खेडकर, इंद्रजीत घुले, शिवाजी सातपुते, प्रकाश घोडके आदींनी या कार्यक्रमात कविता सादर केल्या. विविध सामाजिक विषयांवर व्यंगात्मक शाब्दिक टिपणी होत होती व त्याला टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळत होती. राजकारणावर तर फुटाणे यांच्यासह शिंदे, नायगावकर यांनी अनेक मार्मिक टिपण्या, शेरेबाजी करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला असोसिएशनचे अध्यक्ष अशोक काळे यांनी सर्व कवींचा परिचय करून दिला व रौप्यमहोत्सवानिमित्त असेच कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.