हसवत मांडली रामदास कामत यांनी ‘व्यथा संसाराची’ Print
चाळीसगाव /  वार्ताहर
येथील ना. बं. वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात रामदास कामत यांनी ‘व्यथा संसाराची’ हा एकपात्री प्रयोग सादर करून   श्रोत्यांना हास्यरसात चिंब भिजविले. कामत यांनी काही ‘वात्रटिका’ सादर करून वातावरण निर्मिती केल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या संसारातील विसंगतीवर आधारित विनोदी प्रसंग बोलीभाषेतून मांडले. श्रोत्यांची हसता हसता पुरेवाट झाली.
कामत यांनी विविध उदाहरणांसह कार्यक्रमाला रंगत आणली. आपल्याला बदलीमुळे चंदीगडला जावे लागले. तेव्हा आपण घरी पाठविलेल्या प्रेमपत्रांचा गठ्ठा शिक्षिका असलेल्या पत्नीने उत्तरपत्रिकेसारखा तपासून त्यावर ‘अक्षर सुधारा’ असा शेरा मारला, असे सांगताच श्रोत्यांनी हसून हसून त्यास दाद दिली. ‘जेव्हां पुरूषांना दिवस जातात’ आणि ‘अन् डावा डोळा लावला’ या किश्यांमुळेही धमाल आली.
अंत्ययात्रेतच लग्न जुळविण्याविषयीची चर्चा तसेच मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आदी चुटके त्यांनी अत्यंत हलक्या-फुलक्या भाषेत आणि विनोदी शैलीत सादर केले. कामत यांनी हसत, हसवत सुखी संसाराचा मूलमंत्र श्रोत्यांना दिला.
सूत्रसंचालन मनिष शहा यांनी केले. स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष वसंत चंद्रात्रे यांनी केले. प्रास्तविक डॉ. मुकुंद करंबळेकर यांनी केले.