मनमाड नगराध्यक्षपदासाठी लवकरच बैठक Print

मनमाड
निश्चित झालेला दहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने राजेंद्र अहिरे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी लवकरच नगरसेवकांची बैठक होणार आहे.
डिसेंबर २०११ मध्ये पालिकेची निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष यांचा समावेश असलेल्या शहर विकास आघाडीची सत्ता आली. एकटय़ा राष्ट्रवादीचे त्यात १५ सदस्य आहेत. या आघाडीचे अध्यक्ष म्हणून आ. पंकज भुजबळ यांना पुढील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. २६ ऑक्टोबरला नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे यांचा कार्यकाल पूर्ण होताच आ. भुजबळ यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन प्रत्येकाचे मत स्वतंत्र्यरीत्या अजमावून पाहिले. त्यानंतर अहिरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्षपदासाठी एकच नाव सुचवा, त्यास आपला पाठिंबा राहील, असे भुजबळ यांनी सांगितले.
काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्षांसह सर्वच नगरसेवकांनी मतभेद बाजूला सारून राजेंद्र पगारे किंवा रुपाली पगारे, गणेश धात्रक, प्रवीण पाटील या तीन नावांची पुढील प्रत्येकी दहा महिन्यांसाठी निश्चिती केली होती. मात्र अहिरेंच्या राजीनाम्यानंतर लगेच कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करावयाचे हे सध्या तरी जाहीर झालेले नाही.