..सामाजिक आरोग्याची समस्या ! Print

विशेष प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

जन्माला आलेल्या प्रत्येकाचा शेवट अटळ आहे, पण तो आपल्या हाताने, अविचाराने स्वत:च घडवून आणण्याचा अधिकार निसर्गाखेरीज कोणालाही असू नये. असे असतानाही, केवळ काही मानसिक, भौतिक, कौटुंबिक, आर्थिक कारणांमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. त्यातूनच, स्वत: आत्महत्या करण्याआधी मुलांची, कुटुंबाची हत्या करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागलेले दिसतात. या घटनेचे मूळ नैराश्यात असेल, तर नैराश्याची कारणे शोधण्याची गरज असते.

मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक क्षेत्रांतील विचारवंत, कौटुंबिक सल्लागार आणि पोलीस अधिकारीदेखील आपापल्या पद्धतीने आत्महत्यांच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात, तेव्हा या कारणांमागचे काही धागे समान दिसतात. आर्थिक ओढाताण व  कर्जबाजारीपणातून बिघडलेले कौटुंबिक- मानसिक स्वास्थ्य हे यामागील महत्त्वाचे कारण दिसते. सुखी सांपत्तिक स्थितीतील एखाद्या कुटुंबांवर अचानक आर्थिक विवंचनेची वेळ का येते, आर्थिक कारणांवरून कौटुंबिक व मानसिक स्वास्थ्य का बिघडते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सामाजिक विचारमंथनाची गरज अलीकडच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे अधोरेखित झाली आहे.
जागतिक मंदीतून सावरण्यासाठी एकटय़ादुकटय़ा व्यक्तीचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर मंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांतून बाहेर पडणे सामूहिक प्रयत्नांतूनच शक्य असते. तकलादू उपाययोजना करून तेजीचे कागदी आकडे किंवा विकासदराच्या टक्केवारीचा आलेख समाजाच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी पुरेसा नाही. हाती खुळखुळणाऱ्या अमाप पैशामुळे एखाद्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतो आणि त्याचे राहणीमानही उंचावते. सामान्य आर्थिक स्थितीतील कुटुंबांच्या दृष्टीने ‘चैनी’च्या ठरणाऱ्या वस्तू, अशा कुटुंबांसाठी मात्र ‘गरजे’च्या बनतात आणि त्या नसतील तर जणू जगणेच शक्य नाही अशी मानसिकता बळावत जाते. या गरजा भागविण्यासाठी पुरेसा पैसाही हाती असतो.. मंदीचा फेरा सुरू होण्याआधी ही परिस्थिती होती. आर्थिक मंदीमुळे ही घडी विस्कटून गेली आणि आर्थिक स्तर अचानकपणे कोलमडून गेला. राहणीमानाचा स्तर कायम ठेवणे गरजेचे असल्याने कर्जाचे डोंगर डोईवर वाढत गेले आणि उत्पन्नाचे मार्ग मात्र आकुंचन पावत राहिल्याने या स्थितीतून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले.. अशा स्थितीत वाढत जाणारे मानसिक दडपण शेवटी नैराश्याच्या खाईत नेऊन ढकलते आणि आयुष्य संपविण्याचे विचार बळावत जातात. आपल्यामागे आपल्या कुटुंबाचे हाल होऊ नयेत, या काळजीपोटी आपल्यासोबत त्यांनाही संपविण्यापर्यंत मनाची तयारी होते..
.. केवळ एखाद्या व्यक्तीच्या मन:स्थितीचे विश्लेषण करून आत्महत्यांची ही समस्या सुटणे शक्य नाही. त्याचे मूळ सामाजिक समस्येतच आहे. जगण्याचे किमान स्तर प्रत्येकाला प्राप्त होतील, अशी आर्थिक घडी बसविणे हे धोरणात्मक काम आहे. त्यामुळे समाजाची काळजी वाहण्याची जबाबदारी असलेल्या सरकारी यंत्रणेनेही आत्महत्यांच्या कारणांचे विश्लेषण करण्याची गरज आहे. आर्थिक समस्या हे आत्महत्यांचे मूळ असेल, तर आर्थिक स्थिती आणि जीवनमान यांची सांगड घालण्याचे संस्कार घडविण्याची जबाबदारी समाजात रचनात्मक काम करणाऱ्यांनी उचलली पाहिजे, असे काही जाणकारांचे मत आहे.
कारण, आत्महत्या करण्याची मानसिकता ही सामाजिक आरोग्याची समस्या आहे. जगात दररोज तीन हजार व्यक्ती आत्महत्या करतात आणि प्रत्येक आत्महत्या आणखी किमान २० जणांच्या मनात आत्महत्येचे विचार प्रबळ करते, असे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्यूसाइड प्रिव्हेन्शन या जागतिक संस्थेचे सर्वेक्षण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, जगभरात दरवर्षी दहा लाख व्यक्ती आत्महत्या करून आयुष्याचा शेवट करून घेतात. ही संख्या हत्या किंवा युद्धातील मृत्यूंपेक्षाही जास्त आहे. याहूनही चिंतेची बाब म्हणजे, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या आत्महत्या करणाऱ्यांहून वीस पटीने अधिक आहे. यावरून या समस्येचे गांभीर्य अधोरेखित होते. त्यामुळे सामाजिक जागृती, मानसोपचारासाठी साह्य़, सुसंवाद आदी उपाययोजनांची गरज वाढली आहे.