आमच्या ‘बाई’ Print

शब्दांकन: रोहन टिल्लू, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

माझ्यासाठी ‘बाई’ म्हणजे एक विद्यापीठ आहेत. मी त्यांच्याकडून एकलव्यासारखी अभिनय शिकले. पुढल्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहून अभिनयातले अनेक बारकावे आत्मसात करता आले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने तर अभिनेत्री म्हणून माझी ओळख प्रस्थापित केली.. सांगताहेत  रीमा लागू..
माझ्या लहानपणी मुंबई म्हणजे एक जितंजागतं शहर होतं. तसं ते आत्ताही आहे, पण सांस्कृतिक, सांगीतिक आणि साहित्यिक विश्वाचा विचार करता ती र्वष मुंबईसाठी खूप महत्त्वाची होती.

त्या वेळी मुंबईच्या एका टोकाला असलं, तरी या सगळ्या घडामोडींचं केंद्रबिंदू म्हणजे आमचं गिरगाव. गिरगावात बालपण गेल्यामुळे या सगळ्या वातावरणाच्या जवळ राहता आलं. साहित्य संघ म्हणजे तर साहित्य आणि त्याहीपेक्षा नाटकवेडय़ा माणसांची पंढरी! माझी आई देखील व्यावसायिक रंगभूमीवरील प्रथितयश अभिनेत्री! त्यामुळे या सृष्टीचा आणि माझा परिचय खूपच लवकर झाला होता.
मला आठवतं, त्या वेळी साहित्य संघात होणारी मा. दत्ताराम वगैरे दिग्गजांची सर्व नाटकं मी पाहिली होती. याच दरम्यान ‘महासागर’, ‘जास्वंदी’ यासारखी नाटकं पाहण्याचाही योग आला आणि विजया मेहता अर्थात आमच्या बाईंचा परिचयही झाला. हा परिचय म्हणजे अगदीच एक प्रेक्षक आणि एक अभिनेत्री एवढय़ाच स्वरूपात मर्यादित होता. विशेष म्हणजे ‘छबिलदास’ आणि ‘रंगायन’ या दोन चळवळी लयाला गेल्यानंतरचा हा काळ. १९७४ नंतर मी खूप नाटकं बघितली. आत्ता जिथे यशवंत नाटय़मंदिर दिमाखात उभं आहे, त्या जागी एक मैदान होतं. त्या मैदानात नाटय़महोत्सव वगैरे चालायचे. त्या महोत्सवांमध्ये मी पणशीकर, बाई, सुधा करमरकर अशा अनेकांची नाटकं बघितली.
छबिलदास आणि रंगायन या दोन चळवळी मुंबईत घडत होत्या त्या वेळी मी नेमकी पुण्यात हॉस्टेलला होते. त्यामुळे त्या काळातल्या बाई मला फारशा पाहायला मिळाल्या नाहीत. माझी आणि बाईंची प्रत्यक्ष भेट झाली ती, ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेत मला आणि सुधीर जोशीला पहिलं बक्षीस मिळालं, ते बक्षीस बाईंच्या हातून घेताना. बाई त्या स्पर्धेच्या परीक्षक होत्या. आमचं नाटक पाहून नंतर बाईंनी मला आणि सुधीरला हळूच सांगितलं होतं की, नाटकात तुम्ही जेवलात छान! ती दाद ऐकून मला हसूच आलं होतं. त्यानंतर मोहन तोंडवळकर यांनी मला तीन नाटकांत घेतलं होतं. मला वाटतं ‘पुरुष’मधल्या अंबिकेच्या भूमिकेसाठी त्यांनीच माझं नाव सुचवलं होतं बाईंना!
त्याआधी एक अभिनेत्री म्हणून माझ्या करिअरची सुरुवात झाली होती. सुदैवाने ती पु. ल. देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली झाली. त्या वेळी मी ‘ती फुलराणी’मध्ये काम करत होते. त्या वेळी दीड दीड महिना नाटकाच्या तालमी चालायच्या. तिथे पाया पक्का झाला. पुलं, दामू केंकरे, कमलाकर सारंग, दारव्हेकर मास्तर यांच्या हाताखाली अभिनयाचं तंत्र घोटवलं, पण गंमत म्हणजे, हे सगळं करत असताना मी काही जाणत्या वयाची नव्हते. त्यामुळे स्वत:चा विचार करून एखादी गोष्ट करणं वगैरे माझ्या आवाक्याबाहेरचं होतं.
पण बाईंनी माझी निवड ‘पुरुष’साठी केली, त्या वेळी मात्र मी नक्कीच जाणती होते. त्यामुळे बाईंनी केलेले संस्कार माझ्यावर आपोआपच होत होते. माझी आत्ताची अभिनय शैली ही त्या संस्कारांवरच घडली आहे. वास्तववादी अभिनय म्हणजे काय, हे आम्हाला बाईंच्या तालमीत कळलं. मी ‘जास्वंदी’ पाहिलं होतं, त्या वेळी मला ते नाटक सुरुवातीला कळतच नव्हतं. पण त्यातही बाई ज्या प्रकारे हाताचा वापर करत, ते पाहून मी अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. बाईंकडून ‘पुरुष’च्या वेळी मी अशा प्रकारे हातांचा वापर कसा करावा, हे शिकून घेतलं.
हे शिकता शिकता एक दिग्दर्शिका म्हणून बाईंचं वेगळेपण जाणवत होतं. बाई एखाद्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करताना किंवा ती भूमिका कलाकाराला समजावून सांगताना त्या भूमिकेच्या भूतकाळात वारंवार डोकावत. म्हणजे नाटकातल्या काळाच्या २०-२५ वर्षे मागे जाऊन त्या ती भूमिका उलगडून दाखवत. त्याचप्रमाणे त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे माझ्या संपूर्ण आयुष्यात मी बाईंना खुर्चीवरून उठून एखाद्या कलाकाराला एखादी गोष्ट अशी कर, असं करताना कधीच पाहिलेलं नाही. त्या संपूर्ण नाटक केवळ आपल्या खुर्चीत बसून दिग्दर्शित करतात. हा प्रकार मला तरी थक्क करणारा होता. त्या कलाकाराला त्यांना काय हवं, ते सांगतात. ते कलाकाराला किती कळलंय, हे करून दाखवायला लावतात आणि त्यांच्या मनासारखं एक्सप्रेशन त्यांना मिळत नाही, तोपर्यंत त्या कलाकाराला वेगवेगळ्या पद्धतीने एकच गोष्ट करायला सांगतात. हे पाहणं खरंच थक्क करणारं होतं.
‘पुरुष’ बसवताना घडलेलाच एक प्रसंग आठवतोय. त्या नाटकात अंबिकेला खूप सात्त्विक संताप येतो, असं दाखवायचं होतं. पण मला तो सात्त्विक संताप दाखवताच येत नव्हता. मग बाईंनी मला माधव वाटवेंच्या आईचं उदाहरण दिलं. त्यांच्याकडे पार्टी सुरू असताना वाटवेंच्या एका मित्राने निरांजनावर सिगारेट पेटवली आणि तोपर्यंत त्या पार्टीतला सगळा मॉडर्नपणा मुकाटपणे सहन करणाऱ्या वाटवेंच्या आईच्या संतापाचा स्फोट झाला. तो स्फोट आपल्या नैतिक मूल्यांना लागलेल्या धक्क्यामुळे झाला होता. हे उदाहरण मिळाल्यानंतर मग मला तो संताप दाखवणं खूप सोपं झालं. बाई अशाच छोटय़ा छोटय़ा उदाहरणांतून गोष्टी खूप सोप्या करतात.
बाईंचा आणखी एक जाणवलेला गुण म्हणजे परिपूर्णतेकडे त्यांचा ओढा असतो. त्यासाठी त्या खूप कष्ट करतात. त्यांच्या नाटकांच्या रंगीत तालमी आठ आठ दिवस चालायच्या. त्याआधी दोन महिने तालमी चालायच्या त्या वेगळ्याच, पण रंगीत तालमी म्हणजे सगळा कपडेपट, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा वगैरे साज चढवूनच तालमींना उभं राहायचं. त्यामुळे पहिल्या प्रयोगापर्यंत दडपण नावाची गोष्ट नटापर्यंत फिरकायचीच नाही. तसंच शेवटच्या दोन दिवसांत त्या अनेक दिग्गजांना नाटक पाहायला बोलवायच्या. त्या सगळ्या लोकांच्या हातात कागद असायचे आणि नाटकात जाणवणाऱ्या उणिवा ते नेमकेपणाने कागदावर टिपायचे. हे सगळे कागद तालमीच्या शेवटी बाईंकडे दिले जायचे. बाईंची या सगळ्यांनाच सक्त ताकीद असायची की, त्यांनी बाईंच्या कलाकारांशी थेट बोलायचं नाही. आपल्या कलाकारावर कसलंही दडपण येऊ नये, म्हणून बाई खूप काळजी घेतात.
‘पुरुष’ नाटकातच एक कोर्ट सीन होता. त्यात मला विचारले जाणारे प्रश्न रेकॉर्डेड होते आणि त्या प्रश्नांवर एकही शब्द न बोलता मला केवळ चेहऱ्यावरील हावभावांनी रिअ‍ॅक्ट करायचं होतं. एका बलात्कारितेला भर कोर्टात कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचा तिच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो, हे तो सीन खूपच छान स्पष्ट करायचा. पण बाईंनी मला त्या वेळी एका बाजूला बोलावून सांगितलं होतं की, हा सीन सुरू असताना प्रेक्षकांमधून काहीही प्रतिक्रिया उमटली, तरी तू शांत राहा. त्या वेळी मला काहीच कळलं नाही, पण प्रत्यक्ष प्रयोग सुरू झाल्यावर बाईंच्या त्या म्हणण्याचा अर्थ कळला आणि पुन्हा एकदा बाईंच्या या गुणामुळे मी थक्क झाले. आपल्या नाटकातल्या कोणत्या प्रसंगाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, हे बाईंना पक्कं ठाऊक असतं.
बाईंकडून मी शिकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे चांगलं नाही, त्या गोष्टीचाच नेमका फायदा कसा उचलायचा! माझी बोटं खूप ओबडधोबड होती, पण बाईंनी वेळोवेळी माझ्या त्याच बोटांची स्तुती करून त्या बोटांचा कसा चांगला वापर करायचा, ते शिकवलं. माझ्यासाठी बाई म्हणजे अभिनयाचंच नाही, तर जीवनाचंही एक विद्यापीठ आहेत. त्यांच्याकडे शिकलेल्या सगळ्याच मुलांसाठी त्या ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहेत, यात काही वादच नाही. आजही आम्ही जे काही आहोत, ते बाईंमुळेच आहोत.