नवनीत : शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२ Print
नवनीत

शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
इतिहासात आज दिनांक.. १३ ऑक्टोबर
१७७२ - थॉमस मॉस्टिन हा अधिकारी पुण्याला पेशव्यांच्या दरबारात इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून कार्यरत झाला. थोरल्या माधवराव पेशव्यांनी ही नेमणूक मान्य केली. यामुळे पुण्याला इंग्रजांची कायम वकिलात स्थापन झाली. थोरले माधवराव पेशवे व रघुनाथराव पेशवे यांच्यात पेशवेपदावरून संघर्ष चालू असताना या भांडणाचा फायदा कसा घ्यावा,  याचा विचार इंग्रज करीत होते. इंग्रजांतर्फे थोरल्या माधवराव पेशव्यांकडे मॉस्टिन; तर राघोबादादांकडे ब्रोम हा अधिकारी इंग्रजांच्या वतीने स्वतंत्रपणे बोलणी करीत होते. सुरुवातीला थोरल्या माधवरावांनी मॉस्टिनला दाद दिली नाही. परंतु चिवट इंग्रजांनी थोरल्या पेशव्यांचा पाठपुरावा करून कायम वकिलात पदरात पाडून घेतली. मॉस्टिनने करार, व्यवहार न करता दरबारी वृत्त मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे पाठवणे, व्यापारी सवलती प्राप्त करून घेणे, साष्टी, वसई, घारापुरी, करंजा बेटे हस्तगत करणे ही कामे ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने पार पाडायची होती. थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर मॉस्टिनने पेशव्यांच्या दरबारातील काही जणांना फितुर करून घेतले आणि गोपनीय बातम्या मुंबईला पाठविल्या. पेशवाई कुरतडण्यास मॉस्टिनने सुरुवात केली. तिचा शेवट एलफिन्स्टनने १८१८ मध्ये केला.
१७९२ अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी ‘व्हाइट हाऊस’ या राष्ट्राध्यक्ष निवासाच्या इमारतीची पायाभरणी केली. जगातील सर्वोच्च शक्तीचे ते आता एक प्रतीक बनले आहे.
१९८४ श्रीलंकेने ९३ भारतीय मच्छिमारांना पकडून तुरुंगात डांबले. हे तामिळ भाषक मच्छिमार १७ ट्रॉलरमध्ये होते.
प्रा. गणेश राऊत  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : अ‍ॅन बुलिनचा शिरच्छेद
आठव्या हेन्रीने पत्नी अ‍ॅन बुलिनला सोडण्यासाठी तिच्यावर दुर्वर्तनाचा खोटा आरोप ठेवून तिचा शिरच्छेद करण्याचा हुकूम दिला. तिच्या इच्छेप्रमाणे तलवारीने शिरच्छेद करण्याचे मान्य करण्यात आले; परंतु तिच्या शिरावर तलवार चालविण्याचे धाडस कुणी करायला तयार नसल्याने बरेच दिवस कारागृहात तिला राहावे लागले. सेंट ओमर येथल्या एका माणसाने हे करायची तयारी दाखविली. शिरच्छेदाच्या दिवशी टॉवर ऑफ लंडनमधील पटांगण लोकांनी भरून गेले होते. अ‍ॅन लोकांना म्हणाली, ‘‘मी येथे मरणासाठी आले आहे, व्याख्यान देण्यासाठी नाही.’’ नंतर तिने प्रार्थना केली व लाकडी ओंडक्यावर मान ठेवली. तलवारीच्या एकाच घावासरशी इंग्लंडच्या राणीची मान धडापासून वेगळी झाली. दहा दिवसांनी हेन्रीने जेन सेमूरबरोबर विवाह केला.
लंडनची ‘टॉवर ऑफ लंडन’ ही अत्यंत भयानक इमारत म्हणून प्रसिद्ध आहे. या इमारतीत जितकी कारस्थाने रचली गेली आणि जितक्या लोकांना ठार मारण्यात आले तितका विक्रम दुसऱ्या कोणत्याही इमारतीने केला नसेल. अ‍ॅन बुलिनप्रमाणे अनेक रौद्र आणि करुण घटनांनी टॉवर ऑफ लंडनचा इतिहास भरलेला आहे. लंडनच्या टॉवर हिल भागातील अठरा एकर जागा या इमारतीने व्यापली असून, शेजारीच टॉवर ब्रिज हा पूल आहे. हा टॉवर अकराव्या शतकात विल्यम दी काँकररने शहराच्या संरक्षणासाठी बांधला. या ठिकाणी प्रथम राजे व राण्यांचे निवासस्थान होते. पुढे काही वर्षे या इमारतीचा उपयोग शस्त्रागार म्हणून झाला. काही वर्षे तुरुंग व काही वर्षे वेधशाळा, रेकॉर्ड ऑफिसही इथे होते. सध्या एका भागात राजघराण्यांचे जडजवाहिर व दुसऱ्या भागात शस्त्रागार आहे. हल्ली ऐतिहासिक स्थळ म्हणून लोकांना पाहण्यासाठी हा टॉवर ऑफ लंडन खुला ठेवला आहे.
सुनीत पोतनीस  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : वंगण तेलांतील रासायनिक पूरके

वंगण तेले ही रसायनांची क्लिष्ट एकजिनसी मिश्रणे असतात. यात पेट्रोलियम बेस ऑइल्ससोबतच साधारणत: १० टक्के रासायनिक पूरके असतात. ही पूरके महागडी असली तरी महत्त्वाची असतात. ज्या ठिकाणी वंगण तेल वापरले जाते, तिथे त्यांना महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. आपण गीयर तेलाचे उदाहरण घेऊ या. गाडीचे गीयर कमी-जास्त (म्हणजेच त्यांची पोझिशन बदलून) वाहनाचा वेग नियंत्रित करतात. गाडी उंचावर नेतो तेव्हा गीयर खाली आणून वेग कमी करावा लागतो. अशा वेळी गीयरवर खूप दाब पडतो. तसेच गाडी वेगाने हाकलीत असताना वरचा गीयर ठेवावा लागतो. त्या वेळी तो तापतो. यासाठीच तर गीयर तेलात गंधक आणि फॉस्फरसयुक्त रसायने पूरके म्हणून मिसळतात. कारण गीयरवर दाब पडतो तेव्हा गंधकयुक्त वंगणाचा थर तो दाब शोषून घेतो, तर तापलेल्या गीयरचे उष्णतेपासून रक्षण करण्याचे काम फॉस्फरसचे संयुग करते.
गाडी गतिमान असते तेव्हा इंजिन तापते. तिथल्या उष्णतेने आतील वंगण तेल तापते. त्याचे विघटन होते व त्यापासून मळी तयार होते. ही मळी इंजिनातील छिद्रे बुजवून टाकू शकते व इंजिनकार्यात अडथळा येऊ शकतो. ही मळी सिलेंडरच्या दांडय़ांना चिकटून त्यांच्या फिरण्याच्या गतीमध्ये अडथळा येऊ शकतो. अशा वेळी इंजिन तेलांचे विविध परिस्थितीत रक्षण व्हावे म्हणून त्यात उच्च तापमानाला विघटन टाळणारी रासायनिक द्रव्ये मिसळतात. शिवाय वंगण तेलाच्या विघटनाने तयार झालेली मळी खाली न बसता ती तेलाच्या अंगभर पसरवून ठेवणारी डिस्पर्सन्ट रसायनेही घालावी लागतात. वंगणे त्यातील मेणामुळे थंड वातावरणात गोठू नयेत यासाठी त्यात ओतण क्रिया वाढविणारी रसायने मिसळतात. गतिमान वाहने अपघातात सापडू नयेत यासाठी त्यांना घ्यावा लागणारा योग्य वंगण तेलाचा खुराक दिला पाहिजे.
जोसेफ तुस्कानो
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. मनातलं  देऊळ..
गंमत म्हणजे त्या ठिकाणाचं नाव आणि ठावठिकाणा लक्षात राहिला नाही, त्या स्थळानं मात्र हृदयात कायमचं स्थान पटकावलं आहे. कदाचित त्या ठिकाणी एखाद्या तिथीला रेग्युलर जत्राबित्राही भरत असेल. पंचक्रोशीत, नवसासाठी ते देऊळ प्रसिद्धदेखील असेल. कल्पना नाही. अधिक माहिती करून घेण्याची इच्छाही नाही. पुन्हा त्या स्थानाला भेट दिली तर तसा अनुभवही येणार नाही.
कोकणातल्या आडगावातल्या, आडवाटेवर कुठेतरी ते देऊळ होतं. इंजिन तापल्यामुळे ते जरा थंड व्हायला हवं असं सांगून ड्रायव्हरनं थांबण्याचं फर्मान काढलं. गाडी ‘आ’ वासून उभी राहिली आणि पाय मोकळे करण्यासाठी उतरलो.
संध्याकाळची वेळ होती. हवेच्या गरम झोताचं हलक्या थंडशा झुळकीत रूपांतर होत होतं. समुद्र दिसत नव्हता, पण समोरच्या कातळापलीकडे कुठेतरी असावा, असं वाटत होतं. कोकणातले कातळ का कोण जाणे, मनाला अस्वस्थ करतात. पलीकडे आंब्याची झाडं असावीत, कारण तिथे दगडांचे गडगे रचलेले होते. डावीकडे कोपऱ्यात वस्तीच्या अस्पष्ट खुणा होत्या. तिथे कटिंग चहा मिळेल म्हणून वळलो.
जवळ दिसणारं ते ठिकाण चार-पाच फर्लागभर तरी दूर होतं. चालू लागलो आणि वाऱ्याचा वेग अचानक वाढला. कातळावरची इकडून तिकडून सरपटत आलेली वाळकी पानं हवेवर उडू लागली. त्या वाऱ्याला रोखणारं कोणी नव्हतं. आकाशात पाहिलं तर त्याची निळाई आटली होती. मावळतीकडची रंगाची रम्य उधळण नाहीशी झाली होती. तिथे रेंगाळणारे काळे ढग कैदेतून सुटल्यासारखे सैरावैरा पळत सुटले. येता येता त्यांनी बरोबर पाऊस आणला. थेंब टपोरे नव्हते. वाऱ्याच्या तालावर हिंदकळत कातळावर आपटत होते. त्यांचा गार स्पर्श अंगाला झोंबत होता. खरं तर वाऱ्याला विरोध करून चालणं मुश्कील वाटत होतं. क्षणभर थांबून पावसाच्या पडद्याआड विरत जाणारा निसर्ग दुरावल्यासारखा वाटला.
चहाची टपरी आहे असा समज झाला होता ते होतं लहानसं कोकणी देऊळ. छोटय़ा घरासारखं. जांभ्या दगडाच्या चार भिंती, जेमतेम शाकारलेलं छप्पर. देवळाच्या मंडपासाठी मोजके चार खांब आणि फूटभर उंचीचा कठडा होता.
त्याच आडोशाला थांबलो. वारा मंदावत होता. मधूनच लहर यावी तसा वेग वाढत होता. पावसाची झड ओसरली. अचानक वाऱ्याबरोबर मातीचा गंध सर्वत्र पसरला.
देऊळ कसलं होतं कोण जाणे. आत एक दिवा होता. त्या प्रकाशात उलगडा झाला नाही. त्या कठडय़ावर बसलो आणि विसावलो. नजरेच्या टप्प्यात आता काहीच नव्हतं. भवती पसरलेले कातळ, ते देऊळ आणि मी. वारा आता पूर्ण थांबला. नीरवता इतकी की माझे श्वास ऐकू येऊ लागले. मन स्थिरावलं. स्तब्ध झालं.
वैराण निसर्गामधलं ते एकाकी देऊळ कोणीतरी बांधलेलं असूनही स्वयंभू वाटलं. एखाद्या निसर्गचित्राच्या कॅनव्हासमध्ये विविध आकार आणि रंग एकमेकांशी एकरूप होतात, तसं त्या देवळाचं रूप होतं. इतकंच नाही तर त्या देवळात बसलेला मीही त्याच निसर्गाशी एकतान झालो. हे सगळं ऑरगॅनिक, सेंद्रीय होतं. संपूर्ण होतं. वारा, पाऊस, दगड-माती, प्रकाश सामावून घेणारा अवकाश माझ्यात सामावलेला आहे. या जाणिवेनं मन विस्तारलं. आय वॉज अ‍ॅट विथ मायसेल्फ अ‍ॅण्ड द वर्ल्ड.
एरवी देऊळ म्हणजे श्रद्धेचा बाजार, भक्तीचा तमाशा आणि पैशांची संस्थानं. या देवळानं मला निसर्गाशी तादात्म्यता दिली.
डॉ. राजेंद्र बर्वे  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it