बिल भरण्यास शासनाची टाळाटाळ Print
राज्य नाटय़ स्पर्धेच्या पुण्यातील परीक्षकांना लॉजमालकाने हाकलले
पुणे, १६ नोव्हेंबर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या पुण्यातील परीक्षकांना हॉटेल मालकाने हाकलून दिल्याने त्यांच्यापुढे कोठे राहायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या हॉटेलचे गेल्या वर्षीचे बिल थकवल्यामुळे ही वेळ आल्याचे सांगण्यात येते.
राज्य नाटय़ स्पर्धेच्या पुणे केंद्राच्या स्पर्धा भरत नाटय़ मंदिर येथे सुरू आहेत. त्यासाठी परीक्षक म्हणून मुंबईच्या सुलभा मंत्री आणि अर्चना नाईक व सोलापूरचे शिवानंद चलवादी यांना पाचारण करण्यात आले होते. या तीनही परीक्षकांच्या निवासाची सोय टिळक रस्त्यावरील श्रीनाथ लॉज येथे करण्यात आली होती.
लॉजच्या चालकांनी पंधरा दिवसांसाठी तीन खोल्यांची नोंदणी करताना अनामत रक्कम मागितली होती. ती रक्कम मिळाली नाही, तरीही या लॉजमध्ये या तीनही परीक्षकांना राहण्याची सोय करून देण्यात आली होती.
गेल्या वर्षी पार पडलेल्या नाटय़ स्पर्धेच्या परीक्षकांना याच ठिकाणी निवासाची सोय करण्यात आली होती. मात्र त्यावेळचे बिल मिळवण्यासाठी हॉटेल चालकांना सांस्कृतिक खात्यात बरेच महिने हेलपाटे मारावे लागले होते. या अनुभवामुळे या वर्षी अनामत रक्कम मागण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये नोंदणी करणाऱ्या व्यक्तीने आपण खोल्या सोडत असल्याचे सांगितले, म्हणून नव्या ग्राहकाच्या नावे खोल्या नोंदवण्यात आल्या. मराठी नाटय़ परिषदेचे कोषाध्यक्ष दीपक रेगे यांनी पदरमोड करून भाडे भरले आणि दुसरीकडे एकाच दिवसासाठी व्यवस्था केली आहे. समाजकल्याण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याने आज दिवसभर अनेकदा दूरध्वनी करूनही दाद न दिल्याने ही वेळ आल्याचे समजते. ज्या भरत नाटय़ मंदिरात ही स्पर्धा सुरू आहे, तेथील कँटिन मालकाला गेल्या वर्षीचे चहाचे पैसेही अजून न मिळाल्याने त्याने परीक्षकांना चहा देण्यासही नकार दिला आहे.