‘किंग ऑफ रोमान्स’ अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांचे निधन Print
महत्त्वाच्या बातम्या

alt

प्रतिनिधी, मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीत १९५९ सालापासून अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत असलेले ‘किंग ऑफ रोमान्स’ अशी स्वत:ची आगळी प्रतिमा निर्माण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आणि यशराज फिल्म्सचे संस्थापक यश चोप्रा यांचे डेंग्यूमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कारकिर्दीची पन्नाशी आणि वयाची ऐंशी वर्ष त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. अभिनेता शाहरूख खानने वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेतली होती. तेव्हाच ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आपण निवृत्त होणार असल्याचे यश चोप्रा यांनी जाहीर केले होते. हा चित्रपट १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. परंतु, दिग्दर्शनातला आपला शेवटचा चित्रपट प्रदर्शित झालेला पाहण्यासाठी यश चोप्रा नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आदित्य व उदय असा परिवार आहे.
डेंग्यूचे निदान झाल्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन-तीन दिवसांनीच त्यांची प्रकृती सुधारत आहे असे वृत्तही आले होते. ‘दिवार’, ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘मशाल’, ‘त्रिशूल’ असे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले होते. बॉलीवूडपटांचे चित्रीकरण काश्मीर आणि स्वित्झर्लण्डमध्ये करण्याचा प्रघात त्यांनी सुरू केला, असे मानले जाते.
बॉलीवूडमध्ये सर्वाधिक काळ चाललेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची निर्मितीही यश चोप्रा यांनी केली होती. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या शाहरूख व काजोल यांना घेऊन केलेल्या या चित्रपटाद्वारे यश चोप्रांचा मुलगा आदित्य चोप्राने दिग्दर्शनात पदार्पण केले.
लाहोर येथे २७ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले यश चोप्रा खिशात केवळ २०० रुपये घेऊन मुंबईत दाखल झाले. दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या या तरुणाने नंतर बॉलीवूडमधील सर्वात बडे प्रॉडक्शन हाऊस अशी ख्याती यशराज फिल्म्सला मिळवून दिली. दरवर्षी किमान तीन चित्रपट निर्मित करण्याचा यशराज फिल्म्सचा प्रघात आहे. मोठे बंधू बी आर चोप्रा यांचे सहाय्यक दिग्दर्शक बनण्यापूर्वी आय एस जोहर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांनी कारकिर्दीला सुरुवात केली. १९५९ साली झळकलेल्या ‘धूल का फूल’ या चित्रपटाद्वारे स्वतंत्रपणे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.
रोमॅण्टिक चित्रपटांवर आपला अमीट ठसा उमटविणाऱ्या यश चोप्रा यांनी वेगवेगळ्या काळात नंबर वन पदावर असलेल्या लोकप्रिय कलावंतांना घेऊन अनेक चित्रपट केले.