आगामी : मुळांचा शोध घेताना.. Print
रा.मु. पगार - रविवार, २९ ऑगस्ट २०१०
९४२०१०१०८०रेखाचित्रकार - कवी
रा.मु. पगार यांचा ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’

या कवितासंग्रहाचे प्रकाशन  आज २९ ऑगस्टला वाशीम येथे होत आहे. या कवितेच्या प्रवासाविषयी पगारांनी व्यक्त केलेले मनोगत-
कवितेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अत्यंत वास्तववादी आहे. जेव्हा कवितालेखनाला सुरुवात केली तेव्हा मी फारशी कविता वाचलेली नव्हती. पाठय़पुस्तकात असलेले कवी तेवढे परिचयाचे होते. फारसं कुणी सांगायला नव्हतं आणि कुणाकडे जाऊन काय वाचावे, काय वाचू नये याची विचारणा करणं हे स्वभावात बसणारं काम नव्हतं. फकिरासारखं इकडे-तिकडे मस्त हिंडायचं, घरी परतायचं, परत असंच कुठेतरी भटकायचं, पाऊस असला की पावसात मनसोक्त भिजायचं, नदीवर जायचं एकंदरीत काय तर बाहेरच्या वातावरणाशी चांगली सलगी झाली होती आणि याच मनमोकळ्या वातावरणात कुठेतरी माझी आणि कवितेची गाठभेट झाली.
पुढे वाचनात नियमितता येऊ लागली आणि तितकंच झपाटलेपणही. वाचनाचं व्यसनच जणू जडलं होतं. मिळतील ती पुस्तके वाचून काढली बहुतांश मराठी कविता वाचून झाली होती. काही कवी अत्यंत जवळचे वाटू लागले, आपण त्यांना रोजच भेटतो आहोत, त्यांच्यासोबत गप्पा करतो आहोत असा भास होऊ लागला. मुळातच मला चित्रकलेची लहानपणापासून आवड. काही कवींची चित्रं तर मी मनातच तयार केली होती आणि त्यांना कागदावरही उतरवले होते. विष्णू जोशी, विकास देशमुख, शेषराव धांडे यांच्यासोबत कवितेवर तासन्तास चर्चा व्हायची. ‘गाव’ ही कविता मांडताना तर मी चार महिने सारखा अस्वस्थ होतो शेवटी
‘गावाला विसरता येत नाहीत
जुनी भांडणं पिढय़ान्पिढय़ाची
कधीतरी उडतो याचा भडका
आणि खंडित होते कुणाच्यातरी
आयुष्याची वेल’
आणि याच ओळींवर मला कवितेचा शेवट वाटू लागला. जे सांगायचं होतं ते सांगून झालं म्हणून मनाची अस्वस्थता दूर झाली. चाळीस ओळींची कविता लिहून पूर्ण झाली. कविता कवीला छळते म्हणतात तेच याच अर्थाने म्हणत असावे. एखाद्या कवितेसाठी मी इतका अस्वस्थ होतो याचे मलाच कधीकधी नवल वाटते. एकदा एखाद्या कवितेचं अंतरंगात बिजारोपण झालं की, ती कविता पूर्ण होईपर्यंत मनाची सारखी घालमेल सुरू असते. एखादी कविता सूचली आणि मी ती लगेच कागदावर उतरवली असं कधीच होत नाही. कवितेचा तो विषय सारखा आतल्याआत धुसमुसत राहतो. कधीकधी याचा त्रासही होतो. तर कधीकधी अंतरंगात नवनिर्मितीचा आनंद उसळत राहतो आणि याहीपुढे जाऊन एखादी कविता कागदावर उतरवली की, कित्येकदा ती कविता पुन्हा नव्याने वाचतो. ही सगळी प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही. तो एक प्रकारचा ध्यास आहे. कुणास ठाऊक हे सगळं कशामुळे घडतं. मला तर असं वाटतं की, चांगल्या कवितांचं वाचन सतत चालू असल्यामुळे मलाही अभिव्यक्त होण्याचा तसला मोह नेहमीच पडत असावा. तर कधीकधी रस्ता भरकटल्याचा भास होतो. अशावेळी ‘मुळांचा शोध घेताना’ ही माझीच कविता मला मार्गदर्शक ठरते
‘मुळांचा शोध घेताना
सापडत नाही पायवाट
जी दूर सोडून आलेलो असतो आपण
मैलोन्मैल
याचा अर्थ
आडवाटेवर आपलं प्रेम आहे
असा काढता येणार नाही
आपण चकचकीत रस्त्यांचा शोध घेत
दिशाहीन भटकलो
असं नक्कीच म्हणता येईल.’
नारायण कुळकर्णी कवठेकर, वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर, अजीम नवाज राही, दासू वैद्य, लोकनाथ यशवंत, इंद्रजित भालेराव, प्रवीण बांदेकर, प्रफुल्ल शिलेदार या कवींची कविता मला नेहमीच जवळची वाटत आलेली आहे. या कवींचा कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची कवितेवरील निष्ठा खूपच महत्त्वाची वाटते. कविता म्हणजे जणू त्यांच्यासाठी श्वास आहे. दर्जेदार कविता खूप कमी लिहिली जात आहे, अशी ओरड अनेक व्यासपीठावरून नेहमीच होत असते परंतु, दर्जेदार कवितांचं वाचनही खूप कमी झालेलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दर्जेदार कवितांचं प्रकाशनही कमी झालेलं आहे. बोटावर मोजण्याइतक्याच नियत-अनियतकालिकांमधून चांगल्या कविता वाचायला मिळतात. दर्जेदार कविता अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आम्ही ‘काव्याग्रह’ हे नियतकालिकही सुरू केलेलं आहे. या आणि यासारख्या काही गोष्टी घडतात त्या केवळ कवितेवरील प्रेमापोटीच. कविता लिहून झाल्यानंतर ती कविता कुठेतरी प्रकाशित झाली पाहिजे हा हट्टही मी मनाशी कधीच धरत नाही. प्रस्तुत ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहातील केवळ दोनच कविता याआधी ‘कवितारती’, आणि ‘शब्द’ या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. रेखाचित्रे मात्र सर्वत्र प्रकाशित होत होती. ‘अनुष्टुभ’,  ‘हंस’, ‘युगवाणी’, ‘साहित्य अमृत’ साहित्य अकादमीचं ‘समकालीन भारतीय साहित्य’ या नियतकालिकांनी वेळोवेळी रेखाचित्र प्रकाशित केली याचंही कधीकधी समाधान वाटतं. सहज, सोपी आणि तीतकीच प्रवाही कविता मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. ही कविता काही मोजक्याच कवींकडून आज लिहिली जात आहे आणि त्यामुळे मराठी कविता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. शेवटी काय तर मला माझ्याच कवितेच्या काही ओळी आठवतात.
अभंगाचा भंग
झाला तुकोराया
गेली लया लय
ओवीतली
कवीच्या घराचे
उडाले छप्पर
सांगतसे नाते
अस्मानाशी.
ल्ल अस्तित्वाच्या पाऊलखुणा
 कवी - रा. मु. पगार
 प्रकाशक - काव्याग्रह प्रकाशन
 किंमत - १०० रु.