रोबोटिक्सची तोंडओळख Print

सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२ alt


लहान मुलांना हालचाल करणाऱ्या खेळण्यांची खूप ओढ असते. खेळण्यांची हालचाल होत असेल, खेळणे चालू-बोलू शकत असेल तर लहान मुलांना त्याचे विलक्षण कुतूहल वाटत असते. या साऱ्यामागे असते रोबोटिक्स तंत्र. लहान मुलांना रोबोटबद्दल वाटणारे औत्सुक्य शमण्याच्या दृष्टीने या विषयातील गेली १५ वष्रे डिझायिनग,मायक्रोकंट्रोलर बेस ऑटोमेशन या विषयाच्या जाणकार असलेल्या अर्चना क्षेमकल्याणी या कार्यशाळेचे आयोजन करतात. लहान मुलांना यंत्रमानवाबद्दल वाटणाऱ्या शंकांचे निरसन या कार्यशाळेत केले जाते. यंत्रमानव कसा हालचाल करतो, तो आज्ञा कशा पाळतो, तो बनविण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते या सगळ्यांची माहिती या कार्यशाळेतून देण्याचा प्रयत्न त्या करतात.
या कार्यशाळेत असे रोबोट्स् गटागटाने तयार करण्याची संधी मुलांना मिळते. रोबोटस् ज्या साधनांनी बनवले जाते, याची सविस्तर माहिती दिली जाते. रोबोटिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला विज्ञान, तंत्र, अभियांत्रिकी, गणिती शास्त्र या सर्वाची माहिती असणे आवश्यक ठरते. या कार्यशाळेत रोबोटिक्सचे सैद्धान्तिक शिक्षण देण्यासोबत प्रात्यक्षिकांद्वारे शिकण्याची संधीही प्राप्त होते.
रोबोटिक्सच्या या कार्यशाळांमध्ये प्रसिद्ध रोबोटस्चा वापर केला जातो. त्यात लहान विद्यार्थी स्वत: प्रोग्रॅमिंग करून मजेदार रोबोट्स् बनवतात. त्यात ग्राफिकल प्रोग्रामद्वारे कंट्रोल सिस्टीमही तयार करतात. रोबोट तयार करण्यासाठी गियर्स, पुलीज्, व्हील्स्, यूएसबी आणि गरजेच्या मोटर्सद्वारे रोबोट तयार करण्यात विद्यार्थ्यांना रस निर्माण होतो व ते स्वत:च्या बुद्धीने हवे तसे प्रोग्रामिंग या रोबोटमध्ये करू शकतात. रोबोटिक्समध्ये गणिती शास्त्रातील भागाकार, गुणाकार, बेरजा वा वजाबाकी ही अंतर्भूत असावी लागते.
रोबोटिक्सची ही कार्यशाळा ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी तसेच शाळांच्या सुट्टय़ांमध्ये आयोजित केली जाते. या कार्यशाळेमुळे विज्ञान आणि गणितात गती असलेल्या विद्यार्थ्यांची अधिक प्रगती व्हावी आणि विज्ञान आणि गणित आवडत नसलेल्या विद्यार्थ्यांला याची गोडी लागावी, हाही उद्देश सफल होतो. कार्यशाळेसंदर्भातील अधिक माहितीसाठी ९९६९३७९१९१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
वेबसाईट - www.dhamalkidscamp.com