बिगरी ते मॅट्रिक : विज्ञान प्रकल्प स्पर्धाची तयारी करताना.. Print

डॉ. मानसी राजाध्यक्ष ,सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मुंग्यांची रांग शिस्तीत चालली होती. निखिल एकटक त्या रांगेकडे पाहत होता. मुंग्या नेमक्या कुठे चालल्या आहेत, ते पाहण्यासाठी तो त्या मुंग्यांमागून जवळजवळ साऱ्या घरभर फिरला. बापरे, किती प्रवास करतात या मुंग्या! निरीक्षण करता करता निखिलने दोन मुंग्यांमध्ये जराशी जागा मिळाल्यावर जमिनीवर स्वत:चं बोट जोरात घासलं आणि काढून घेतलं. दोन्हीकडून येणाऱ्या मुंग्या ज्या भागात निखिलने बोट फिरविलं होतं, त्या भागाजवळ आल्यावर जराशा थबकल्या, गोंधळल्यासारख्या झाल्या, निखिल बघत होता. गोंधळलेल्या काही मुंग्या लगबगीने परत फिरल्या. परत जाताना वाटेत भेटणाऱ्या इतर मुंग्यांशी जणू काही त्या बोलल्या. कारण त्या मुंग्याही पुढे न जाता तिथूनच परत फिरल्या. थोडय़ा वेळाने मात्र मुंग्यांनी परत पूर्वीचीच वाट धरली. सारंच मोठं गमतीचं! निखिल कितीतरी वेळ त्या मुंग्यांचं निरीक्षण करीत होता. थोडक्यात काय तर निखिल मुंग्यांचं अगदी सखोल निरीक्षण करीत होता आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते, त्याचं कुतूहल चाळवत होतं.
नंतर निखिल अभ्यासाला बसला खरा, पण त्याच्या डोक्यातून मुंग्यांचा विषय काही केल्या जात नव्हता. मुंग्यांचं वारूळ आतून कसं असेल? मुंग्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही, मग त्या एकमेकींना निरोप कसा देत असतील? आपल्या पिल्लांची काळजी त्या कशी घेत असतील? निखिलला पुढे पुढे तर प्राण्यांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा छंदच लागला. मग त्याच्या आई-बाबांनीही त्याला खूप पुस्तकं आणून दिली. खूप सारी अभयारण्यं दाखविली. निखिल प्राण्यांचा डॉक्टर तर झालाच, पण त्याने केलेलं काही प्राण्यासंबंधातलं संशोधन जगभर गाजलं. लहानपणी जडलेली निरीक्षण करण्याची सवय त्याला आयुष्यभर मोलाची ठरली. थोडक्यात काय तर निरीक्षण करावं, पण निरीक्षण करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचं किंवा सजीव-निर्जीवांचं अतिशय काळजीपूर्वक ‘वाचन’ करायचं.
भारतामध्ये फार प्राचीन काळी गाग्र्य नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांना आकाशनिरीक्षणाचा छंद होता. तासन्तास ते आकाशातल्या तारकासमूहांचं, वेगवेगळ्या ताऱ्यांमुळे आकाशात तयार झालेल्या आकारांचं, ताऱ्यांच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळांचं, कोणत्या ऋतुमानात कोणते तारकासमूह कधी उगवतात, या साऱ्याचं निरीक्षण करीत. एक-दोन तास नाही तर काही र्वष हे निरीक्षण चाललं. निरीक्षणातून लक्षात आलेल्या काही गोष्टींच्या व्यवस्थित नोंदी केल्या आणि मग गाग्र्य ऋषी आकाशाचं वाचन करून ऋतुमानाचे आणि हवामानाचे अंदाज वर्तवू लागले. जसजसे अंदाज बरोबर आले तसे त्यांनी केलेली निरीक्षणं आणि त्यावरून काढलेली अनुमान यांचा पडताळा येऊ लागला. शेतकरी ‘आता आम्ही पेरणी करायला घेऊ का? पाऊस यायला नेमका किती अवकाश आहे?’ असे अनेक प्रश्न घेऊन गाग्र्य ऋषींकडे यायला लागले. त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरं मिळायला लागली. थोडक्यात काय तर गाग्र्य ऋषींनी केलेल्या सखोल निरीक्षणाचा आणि नोंदींचा त्या काळच्या समाजाला खूप उपयोग झाला.
इटलीतल्या पिसा इथल्या चर्चमध्ये गॅलिलीओ उभा होता. वाऱ्याच्या मंद झुळुकीवर चर्चमधली झुंबरं हेलकावे घेत होती. काही झुंबरं उंचीला लहान तर काही खूपच लांब; काही झुंबरं भली थोरली तर काही नाजूक लहानशीच! गॅलिलीओ वाऱ्यावर हलणाऱ्या झुंबरांचं काळजीपूर्वक निरीक्षण करीत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते. ठरावीक काळात सर्व झुंबरं सारख्याच प्रमाणात हेलकावे घेतात की वेगवेगळ्या प्रमाणात? लांब झुंबरापेक्षा उंचीला छोटं असलेलं झुंबर जास्त हेलकावे घेतं, कमी घेतं की तितकेच हेलकावे घेतं? सारख्याच उंचीची म्हणजे लांबीची असलेली, पण आकाराने लहान-मोठी असलेली झुंबरं ठरावीक काळात तेवढेच हेलकावे घेतात की, कमी-जास्त? स्वत:च्या हाताच्या नाडीच्या ठोक्यांचा उपयोग करीत गॅलिलीओने काळ आणि झुंबरांचे हेलकावे यांच्याविषयीचे काही ठोकताळे मनाशी बांधले आणि तो थेट आपल्या प्रयोगशाळेत गेला. तिथे दोऱ्याला दगड बांधून त्याने झुंबराचा नमुना तयार केला. दोऱ्याची उंची कमी-जास्त करीत आणि निरनिराळ्या आकाराचे आणि वजनाचे दगड दोऱ्याला बांधत, गॅलिलीओने प्रयोगाला सुरुवात केली. दगड बांधलेले दोरे त्याने लोंबकळत लावले आणि त्यांच्या हेलकाव्यांचा अभ्यास सुरू केला. गॅलिलीओचे हे लंबकाचे प्रयोग खूप यशस्वी झाले. त्याने त्यातून काही नियम सिद्ध केले आणि विज्ञानातल्या अनेक सत्यांना एक नवीन परिमाण मिळालं. थोडक्यात काय तर गॅलिलीओ नुसतं निरीक्षण आणि नोंदी करून थांबला नाही तर त्याने स्वत:चं कुतूहल शमविण्यासाठी अनेक प्रयोग करून पाहिले.
अगदी अलीकडचीच एक सत्यकथा! दक्षिण भारतात राहणाऱ्या एका नववीतल्या विद्यार्थिनीचं लक्ष एका महत्त्वाच्या गोष्टीकडे वळलं. नुकतंच सीताफळ खाऊन तिने राहिलेली साल तिथेच टेबलावर ठेवली आणि तिच्या लक्षात आलं.. आजूबाजूच्या पदार्थावर बसणाऱ्या माशा त्या सीताफळाच्या सालीच्या आसपासही फिरकत नव्हत्या. सीताफळाच्या सालीला चिकटलेला थोडासा गर त्या माशांना आकर्षित करीत नव्हता. त्या मुलीला आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं. मग तिने निरीक्षणांना सुरुवात केली. वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या जागी सीताफळाची साल ठेवून तिने निरीक्षण केलं, अभ्यास केला आणि मग त्या नोंदी तिने एका विज्ञान प्रदर्शनात मांडल्या. प्रदर्शनात बाकीच्या मुलांच्या टेबलावर अनेक ‘३-डी मॉडेल्स’ होती. गांडूळखत, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर अशा अनेकदा चावून चोथा झालेल्या विषयांवर केलेले प्रकल्प होते. त्या साऱ्यांच्या गराडय़ात परीक्षकांचं लक्ष त्या मुलीकडे आणि तिच्या टेबलावरच्या सीताफळाच्या सालीकडे अजिबात गेलं नाही, पण प्रदर्शन पाहायला आलेल्या एका अमेरिकन औषध कंपनीच्या काही संशोधकांचं लक्ष सीताफळाच्या त्या प्रकल्पाकडे गेलं. त्या मुलीला त्या औषध कंपनीने संशोधनाचं एकस्व (पेटंट) मिळवून दिलं, योग्य तो मोबदलाही दिला आणि सीताफळापासून कीटकांना पळवून लावायचं एक नवं औषध बाजारात आणून स्वत:चा आणि समाजाचा फायदा करून घेतला.
न्यूटन काय किंवा ही कालपरवाची चिमुरडी काय; एवढसं फळ काय आणि त्याचं केलेलं साधसंच एक निरीक्षण काय, पण लहान-मोठय़ा प्रमाणात का होईना.. मानवजातीला कल्याणकारक ठरलं! न्यूटनने असो किंवा एका शाळकरी विद्यार्थिनीने असो- एक महत्त्वाचा आणि अत्यंत यशस्वी असा विज्ञान प्रकल्प सादर केला. थोडक्यात काय तर.. साध्या घटनेचं सखोल निरीक्षण, त्यातून निर्माण होणारं कुतूहल, कुतूहलापोटी केलेला अभ्यास किंवा केलेले प्रयोग, निरीक्षणांचा पडताळा, त्यातून काढलेली अनुमानं यातून जो आकाराला येतो तोच खरा विज्ञान प्रकल्प!
आणि अगदी शेवटी थोडक्यात काय तर.. आता दोन-तीन महिन्यांत येणाऱ्या विज्ञान प्रकल्पांच्या स्पर्धाच्या तयारीला लागताना या साऱ्यांचा विचार तुम्ही करावात, इतकंच!