बालकलाकारांचे फोफावलेले करिअर Print

दिलीप ठाकूर ,सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२
प्रसंग पहिला
alt

अंधेरीतील आदर्शनगर परिसरात छोटय़ा-मोठय़ा निर्मात्यांच्या असंख्य कार्यालयातील एका ठिकाणी आई-वडील आपल्या १४ वर्षांच्या मुलीला घेऊन आले. त्या मुलीला अत्यंत तोकडय़ा व तंग वस्त्रात वावरायला केवढा तरी संकोच वाटत होता. हे सगळे त्या मुलीच्या मनाविरुद्ध सुरू असल्याचे जाणवत होते, पण तिचे आई-बाबा तिला समजावत होते-खरे तर दरडावत होते, ‘या सिनेमाची कथा एका मुलीभोवती आहे, तू आत गेल्यावर कसेही करून निर्मात्याला पटव, तुला हा चित्रपट मिळायलाच हवा, तसं झालं तर एका रात्रीत तू स्टार बनशील..’ थोडय़ा वेळाने त्या मुलीला एकटीलाच निर्मात्याच्या केबिनमध्ये पाठवले जाते..
प्रसंग दुसरा
साकीनाका येथील एका स्टुडिओत एका रिअ‍ॅलिटी शोचा दीर्घमुदतीसाठी लागलेला सेट. शालेय वयातील मुलांचा त्यातील ‘नाचकामा’चा सहभाग असल्याने सेटवर व सेटबाहेरही नुसता चिवचिवाट. आपण एखाद्या शाळेच्या परिसरात आहोत असे वाटावे, इतका. पण तेवढय़ात पालक पती-पत्नी आपल्या मुलाला मारत-ओरडत बाहेर पडताना दिसतात. तो स्पर्धक मुलगा पहिल्या फेरीतच पराभूत झाल्याने त्या पालकांचा राग अनावर झाला होता. स्पर्धेतल्या अपयशापेक्षा परक्या व्यक्तींसमोर आपल्याला मार खावा लागतोय, म्हणून तो मुलगा पुरता बुजून गेला होता.
प्रसंग तिसरा
गोरेगावच्या चित्रनगरीत मुलांचा मोठा सहभाग असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण रंगात आले होते. दिग्दर्शकाला हवा असलेला मुलांचा प्रतिसाद व दृश्याचा परिणाम मिळत होता. त्यामुळे त्याला ‘भरल्या सेटवर’
काही नवीन कल्पनाही सुचत गेल्या, पण या घाईगडबडीत एक मुलगा मात्र दृश्यात म्हणावा तसा सहभागी होत नव्हता. त्याचे लक्ष भूमिकेपेक्षा पुस्तकात होते. तो दिग्दर्शकाने ‘ओ.के.’ म्हणताच पटकन पुस्तकात डोके खुपसे, अगदी पुढील दृश्यासाठी दिग्दर्शक ‘रेडी’ असे म्हणेपर्यंत त्याला पुस्तक सोडवत नव्हते. दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेचा तो अभ्यास करीत होता. पण दिग्दर्शकाला हे कसे बरे चालेल? चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाचा ‘शब्द’ चालतो, तसा तो चालू लागला व त्याने पटकन म्हटले, ‘अरे, त्या मुलाच्या हातातील पुस्तक खेचून घ्या रे कोणी तरी, अभ्यास करायचा असेल तर सिनेमात यायचे नाही..’ ते ऐकून त्या मुलाचा चेहरा पुरता केविलवाणा झाला.
प्रसंग चौथा
गोरेगावच्या चित्रनगरीतील देवळात एका चित्रपटाचे लहान मुलांवर भक्तिगीत चित्रित होत होते. त्यात आपल्याही मुलाला सहभागी करून घ्यावे, म्हणून एका मुलाचे पालक प्रचंड आटापिटा करीत होते. निर्मिती व्यवस्थापक त्यांना सारखे सांगत होता, ‘या सगळ्या मुलांप्रमाणे तुम्हीदेखील त्याच्या शाळेकडून याने चित्रपटात भूमिका साकारण्यात काहीच हरकत नाही, असे प्रमाणपत्र आणा. चित्रपटात काम करण्यासाठी लहान मुलांना असे प्रमाणपत्र सादर करायला लागते,’ मात्र, इतके सांगूनही त्या मुलाचे पालक काही आपला हट्ट सोडत नव्हते.
प्रसंग पाचवा
शहरातील एका स्टुडिओत सुरू असलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एका १० वर्षांच्या मुलाने बाजी मारली म्हणून एका वाहिनीच्या वृत्त विभागाने आपल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी त्याची तिथेच मुलाखत घेणे सुरू केले. ‘मुलाखत म्हणजे प्रसिद्धी’ असा त्या मुलाचा समज असावा, असे त्या मुलाच्या वर्तनावरून वाटत होते. तो सांगू लागला, ‘मला दीपिका पदुकोण, कैतरिना कैफ यांच्या हीरोची भूमिका निभावायला नक्कीच आवडेल.’ आपण केवळ एका वाहिनीवरची एक स्पर्धा जिंकलो आहोत, ही वस्तुस्थिती तो पूर्णपणे विसरला होता आणि त्याच्या पालकांनीही त्यात काही वावगे वाटले नाही. चित्रपट, जाहिरातपट - उपग्रहवाहिन्यांवर शालेय वयातच मोठय़ा प्रमाणावर संधी मिळू लागल्याने काही मुले ही अशी एकदम मोठी होऊ लागलीत.
असे अनेक बरे-वाईट प्रसंग सांगता येतील. मनोरंजन उद्योगात सध्या विविध स्तरांवर लहानग्यांना मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. मराठी चित्रपट, मराठी - हिंदी महामालिका, गेम शोज, रिअ‍ॅलिटी शोज यातूनही लहान मुलांना चमकण्याची भरपूर संधी मिळते. रिअ‍ॅलिटी शोजमधल्या या लहानग्या विजेत्यांच्या पानभर मुलाखती येतात, सत्कार समारंभ होतात. इतकेच काय, त्या जोरावर ही मंडळी परदेशी फिरूनही येतात.
लहानग्यांना प्रसिद्धी आणि पैसा देणारी संधी म्हणून मनोरंजन क्षेत्राकडे पाहणाऱ्या पालकांची संख्या आज वाढत आहे. या क्षेत्रात आपल्या पाल्यांना आणू इच्छिणाऱ्यांसाठी ही उदाहरणे दिली आहेत. या क्षेत्रात बऱ्या-वाईट सर्व गोष्टी नांदत असतात, हा त्यातला गíभतार्थ लक्षात घेणे आवश्यक ठरते.
बालकलाकारांनी आपल्या कामाचे चांगले पैसे मिळवावेत, यापेक्षा त्याने ‘नाव कमवावे, लोकप्रिय व्हावे,’ अशीच पालकांची इच्छा दिसते. अर्थात, सर्वच पालक एकसारखे नसतात, पण या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या पालक व त्यांचे विद्यार्थी यांना येथे काही गोष्टी कशा प्रकारच्या असतात, हे समजावे व त्यांनी काही चुका टाळाव्यात, हा या लेखामागचा हेतू आहे.
बालकलाकारांच्या कामाबाबत अनेकदा हे बालमजूर ठरतात का आणि तसे असेल तर तोही गुन्हा ठरतो, तर मग त्यावर कारवाई का नको, असेही काही प्रश्न उपस्थित होतात.
सुज्ञ व विचारी पालक व विद्यार्थी यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी या साधकबाधक गोष्टींचा विचार करणे अपेक्षित आहे. आज अनेक चित्रपट, मालिकांमध्ये सध्या बरीच मागणी असल्याने समाजाच्या सर्व स्तरांतून व भिन्न अपेक्षेने अनेकजण या क्षेत्राकडे वळताना दिसतात. काहींचे मार्ग व हेतूदेखील योग्य असतातच, पण सगळ्यांनाच घवघवीत यश कसे मिळेल? अनेक आपल्या महत्त्वाकांक्षेपायी पालक आपल्या पाल्याची पिळवणूक करताना दिसतात. काही ठिकाणी निर्माता-दिग्दर्शक अशा पालकांची मानसिकता लक्षात घेऊन पाल्याची छळवणूक करतात, तर काही ‘बालकलाकार’ जराशा यशाने हुरळून जातात. या साऱ्यात नवीन भर पडू नये असं मनापासून वाटतं.
आपल्या पाल्याला बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात आणण्यापूर्वी त्याच्या शाळेची परवानगी घ्यावी आणि त्याच्या बालमनावर भलते-सलते संस्कार होणार नाहीत याची काळजी मात्र कटाक्षाने घेणे आवश्यक ठरते.