‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी Print

संजय मोरे,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
alt

‘आतंकवाद’, ‘दहशतवाद’, ‘अतिरेकी हल्ला’ हे सर्वच शब्द आता सर्वानाच परिचित होऊ लागले आहेत आणि त्याची झळ सर्व जगाला जाणवत आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी जगाच्या पाठीवरील सर्व देशांनी कंबर कसली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतातही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न होताना दिसून येतात.
साहस, देशसेवा, समाजात प्रतिष्ठा असे आयुष्य वाटय़ाला यावे, असे अनेक तरुणांना वाटत असते. असा युवावर्ग नेहमी नामी संधीच्या शोधात असतो. त्यांना गुप्तहेर खात्यातील तसेच इंटेलिजन्स ब्युरोमधील नोकरीचे आकर्षण वाटत असते असते. मात्र, त्यासाठी अर्ज कधी निघतात, शिक्षण किती असावे लागत, त्यासाठी कोणती परीक्षा असते, वयोमर्यादा किती असते,  अनुभवाची गरज आहे का, परीक्षा घेतली जात असेल तर ती केव्हा होते, पोलीस खात्यातून त्याचे अर्ज मिळतात का, प्रथम लेखी परीक्षा होते की शारीरिक क्षमता चाचणी, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना याबद्दल पुरेशी माहिती असतेच, असे नाही.
पदवी पूर्ण झाल्यानंतर या परीक्षेची माहिती मिळविण्यात बराच कालावधी निघून जातो आणि जेव्हा या परीक्षेची नीट माहिती मिळते तेव्हा परीक्षेसाठी असणारी वयाची पात्रता जवळपास निघून जाण्याची वेळ येऊन ठेपलेली असते. म्हणूनच योग्य माहिती योग्य वेळी मिळवणे फार गरजेचे ठरते. अलीकडेच इंटेलिजन्स ब्युरोमार्फत निघालेल्या ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ पदाची जाहिरात निघाल्याने अनेक तरुणांना आपले स्वप्न साध्य करण्याची संधी मिळणार आहे.
अभ्यासक्रम, परीक्षापद्धती, निवडप्रक्रिया
‘इंटेलिजन्स ब्युरो’तर्फे ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, यासाठी लेखी परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची तसेच वर्णनात्मक अशा दोन्ही पद्धतीची असणार आहे. पहिली प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून दुसरी प्रश्नपुस्तिका ही वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी एकत्रितपणे एक तास ४० मिनिटे कालावधी देण्यात येणार आहे.
प्रश्नपुस्तिका १ : पहिली प्रश्नपुस्तिका ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून यात सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी व गणित या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सामान्य ज्ञान या घटकात शालेय स्तरावरील अभ्यासक्रम म्हणजेच इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, नागरीशास्त्र, अर्थशास्त्र या घटकांवरील प्रश्न विचारले जातात तसेच चालू घडामोडींचा समावेश या घटकात केलेला असतो. चालू घडामोडी या घटकात आर्थिक, भौगोलिक, वैज्ञानिक, राजनैतिक घडामोडींचा समावेश केलेला असतो.
इंग्रजी या घटकात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाक्यातील चूक ओळखणे, चुकीची अथवा योग्य स्पेलिंग ओळखणे, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहिणे, उताऱ्यावरील प्रश्न अशा प्रश्नांचा समावेश असतो.
गणित या घटकात संख्या व संख्याप्रणाली, सरासरी, लसावि व मसावि, शतमान-शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, आगगाडीवरील प्रश्न, बोट व प्रवाहावरील प्रश्न, अंतर-वेग व वेळ, काळ-काम, त्रिकोणमिती, भूमिती या घटकांवरील प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
बुद्धिमापन चाचणी या घटकात संख्यामालिका, वर्णमालिका, समान-संबंध, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, दिशाविषयक प्रश्न, नाते-संबंध, बैठक व रांगेतील प्रश्न, आकृत्यांची संख्या ओळखणे, घन व ठोकळा, कालमापन, घडय़ाळावरील प्रश्न अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
प्रश्नपत्रिका दुसरी :- ही प्रश्नपत्रिका वर्णनात्मक पद्धतीची असून ही पूर्णपणे इंग्रजी भाषेवरील लेखनशैली तपासण्यासाठी असते. या घटकात निबंध, पत्र व्यवहार, सारांश लेखन यांसारखे प्रश्न विचारले जातात.
परीक्षेचा अभ्यासक्रम अशा प्रकारचा असून व्यवस्थितपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेत नक्कीच यश मिळू शकते. ज्या उमेदवारांची अभ्यासाची तयारी परीक्षेपूर्वी चांगली होते व परीक्षेच्या दिवशी संपूर्ण पेपर नियोजित वेळेत जास्तीत जास्त अचूक सोडवून होतो त्याला या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे जाते.