‘उत्तम ते निवडावे’: का आणि कसे? Print

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, १७ सप्टेंबर  २०१२
alt

कर्मचारी निवडताना कंपन्यांचे निवडीचे निकष नक्की कोणते असतात, याची सविस्तर माहिती देणारा लेख-
कर्मचाऱ्यांची संख्या आणि गुणवत्ता याचे योग्य प्रमाण साधणे व त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासह अपेक्षित काम योग्य आणि प्रभावीपणे करणे ही बाब प्रत्येक व्यवस्थापक आणि व्यवस्थापनासाठी कसोटीची राहिली आहे. कर्मचाऱ्यांची मुलाखत- निवड, त्यांना कामाचा सराव-प्रशिक्षण इथपासून त्यांचा सर्वागीण विकास साधणे ही काळाची गरज ठरली असल्याने या मुद्यांचा मुळापासून विचार करणे गरजेचे ठरते.
या संदर्भातील एक प्रमुख व महत्त्वाचे गृहीतक म्हणजे नोकरी-मुलाखतीसाठी येणारा प्रत्येक उमेदवार हा योग्य उमेदवार असतोच, असे नाही. त्याप्रमाणेच निवड केलेला प्रत्येक कर्मचारी हा उत्तम कर्मचारी ठरतोच, असे नाही. त्यामुळेच उमेदवारांच्या योग्यतेनुरूप त्यांची निवड करणे व क्षमता-कार्यक्षमतेनुरूप योग्य कर्मचाऱ्यांमधून उत्तम कर्मचारी घडवणे हे काम प्रत्येक व्यवस्थापकासाठी महत्त्वपूर्ण ठरते.
तपशील वा आकडेवारीसह सांगायचे झाल्यास फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच ‘फिकी’द्वारा नव्यानेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात प्रामुख्याने असे लक्षात आले आहे की, विद्यापीठ स्तरावरील शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वसाधारण पदवीधरांपैकी केवळ १५% विद्यार्थी व तंत्रज्ञानविषयक शिक्षण घेणाऱ्यांपैकी सुमारे २५ ते ३०% विद्यार्थीच नोकरी- रोजगाराच्या संदर्भात योग्य वा सक्षम असतात.
विद्यार्थी-उमेदवारांच्या रोजगारविषयक क्षमतेची पडताळणी करणाऱ्या ‘अॅस्पायरिंग माइंडस्’ या सर्वेक्षण कंपनीने या सर्वेक्षणासाठी संगणकशास्त्र व संगणक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या काही निवडक कंपन्यांचाच समावेश केला होता हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. ‘अॅस्पायरिंग माइंड’ने केलेल्या या सर्वेक्षणात असे प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे की, संगणक विज्ञान व संगणकशास्त्र या विषयात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर पदवी पात्रता प्राप्त करणाऱ्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपैकी २.६८% विद्यार्थीच संगणक उत्पादन कंपन्यांसाठी, तर १७.४५% विद्यार्थी संगणक सेवाविषयक रोजगारांसाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरतात. वरील टक्केवारी सद्यचित्र स्पष्ट करण्यास पुरेशी बोलकी आहे.
संगणक क्षेत्राच्या संदर्भात सांगायचे झाल्यास सर्वसाधारणपणे मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांपैकी संगणक उत्पादन क्षेत्राच्या संदर्भात एकूण नाकारण्यात आलेल्या उमेदवारांपैकी ९२% उमेदवार तांत्रिक ज्ञान व अपुऱ्या माहितीच्या कारणावरून, तर ५६% उमेदवार हे व्यक्तिमत्व, संवादक्षमता व व्यक्तिगत क्षमतेच्या कारणावरून नाकारले जातात. संगणक सेवा क्षेत्राच्या संदर्भात ५४% उमेदवार हे त्यांच्या ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणजे अपुऱ्या विकासविषयक कारणावरून, तर ४६% उमेदवार हे अपुऱ्या तंत्रज्ञानविषयक कारणावरून नाकारले जातात, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
याच संदर्भात ‘टीम लीझ’ने अभ्यासपूर्ण स्वरूपात केलेल्या ‘दि लेबर रिपोर्ट २०१२’ नुसार सद्य:स्थितीत बहुतांश कंपन्या उमेदवारांची निवड करताना अपेक्षित वा आवश्यक कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी प्रसंगी आपले नियम शिथिल करीत असतात. याचाच एक भाग म्हणून या कंपन्या निवड केलेल्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी निराळे व नव्याने प्रयत्न करीत असतात. याच प्रयत्नांना एक पूरक जोड म्हणून काही कंपन्यांनी तर त्यांच्या मुलाखत घेणाऱ्या व्यवस्थापकांसाठीसुद्धा विशेष प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. याच संदर्भात केवळ योग्यच नव्हे, तर सर्वात योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी कंपन्यांनी विविध प्रकारच्या कल्पक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या संदर्भातील एक प्रमुख उदाहरण म्हणजे ‘अॅस्पायरिंग माइंडस्’ने भोपाळच्या ज्ञानगंगा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने उमेदवारांची प्राथमिक चाळणी-पडताळणी करून त्याआधारे संबंधित उमेदवार आणि व्यवस्थापनाला मार्गदर्शन करणारी स्वतंत्र संगणकीय यंत्रणाच विकसित केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रयत्नांच्या दुसऱ्या टप्प्यात देशात विविध शहरांमध्ये ३० उमेदवार निवड-चाळणी केंद्रांची स्थापना करून त्याद्वारा सुमारे तीन लाख उमेदवारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे.
उमेदवारांची सर्वागीण पडताळणी करून त्यांची रोजगारविषयक पात्रता-योग्यता ठरविण्याच्या उद्देशाने व विशेषत: नव्याने आपले करिअर सुरू करणाऱ्या उमेदवारांची भाषा व संवादकौशल्यविषयक क्षमता-पात्रता पडताळण्याच्या उद्देशाने ‘मॅट्रिक ट्रॅक सव्र्हिसेस’ संस्थेने उमेदवारांचे भाषाकौशल्य, संवादक्षमता व व्यक्तिमत्त्वविषयक विशेष चाचणी प्रक्रिया विकसित केली असून, संगणकीय पद्धतीवर आधारित ही प्रक्रिया उमेदवार व व्यवस्थापन या उभयतांच्या प्राधान्य-पसंतीस उतरली आहे.
उमेदवारांच्या या निवड पद्धतीचा महाविद्यालय विद्यापीठातून नव्यानेच उत्तीर्ण होऊन आपले करिअर सुरू करणाऱ्या नवागतांना व अशांची निवड दरवर्षी व मोठय़ा प्रमाणात करणाऱ्या व्यवस्थापन-कंपन्यांना मोठय़ा प्रमाणावर होत असतो. उदा.- ‘जेनपॅक्ट’ ही कंपनी नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची निवड करण्यासाठी आधी सुमारे १०० महाविद्यालयांपर्यंत पोहोचायची. आज या कंपनीचा संपर्क सुमारे ४०० महाविद्यालयांपर्यंत सहजगत्या होत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.