सौंदर्यशास्त्रातील सुरेख संधी Print

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अनुवाद- सुचित्रा प्रभुणे
alt

सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते,’ असे म्हटले जाते.  सौंदर्याच्या कल्पनेबाबत अनेक थोरामोठय़ांनी भरभरून लिहिले आहे . शेक्सपिअरसारख्या महान लेखकाने तर बाह्य आणि अंतर्गत सौंदर्य अशा संकल्पना मांडल्या. अंतर्गत सौंदर्य म्हणजे मनाचे सौंदर्य. तर एखाद्याचे दिसणं म्हणजे नाक, कान, त्वचा, डोळे, चेहरा, केस यामध्ये जी एकप्रकारची आकर्षकता आढळते, ते बाह्य सौंदर्य. आजकाल स्त्री-पुरुष या दोन्ही गटांमध्ये आपल्या दिसण्याबाबत कमालीची जागरूकता निर्माण झाल्यामुळे सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा म्हणजेच कॉस्मेटिक्सचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.

मूळ ग्रीक शब्द कॉसमिटोजवरून कॉस्मेटिक्स हा शब्द तयार झाला. याचा अर्थ लक्षात घ्यायचा झाला तर असे म्हणता येईल की, सजविण्याचे वैशिटय़पूर्ण तंत्र. त्यामुळेच सौंदर्यप्रसाधने जेव्हा निर्माण केली जातात तेव्हा त्यांचा सखोल अभ्यास केला जातो. त्या त्या प्रकारच्या त्वचेवर कोणते प्रसाधन अधिक खुलून दिसेल; जेणेकरून लोकांच्या सौंदर्यात त्यामुळे अधिक भर पडेल आणि इतरांच्या नजरेला ती सुंदर दिसू लागतील.
अर्थात कॉस्मेटिक्समध्ये केवळ प्रसाधनांचाच विचार होतो असे नाही, तर आरोग्यास पोषक ठरणाऱ्या विविध थेरपींचादेखील यात विचार केला जातो. या थेरपींमध्ये उपचारांबरोबर तऱ्हेतऱ्हेच्या साधनांचादेखील वापर केला जातो. या सर्व गोष्टींचा उपयोग करून ग्राहकाच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसा लूक देणे, हे ब्युटिशियनचे (सौंदर्यतज्ज्ञाचे) मुख्य काम ठरते. या क्षेत्रात काळाप्रमाणे लोकांच्या आवडीमध्ये /ट्रेण्डस्मध्ये फरक पडतो. पण सौंदर्यतज्ज्ञांचा किंवा व्यावसायिक सौंदर्य प्रशिक्षकांच्या कामाचे स्वरूप तसेच राहते. जसे हेअर स्टायिलग, त्वचेची काळजी घेणे, पेडीक्युअर, मॅनिक्युअर आणि इलेक्ट्रोलॉजी या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील पद्धती आजही आहेत. फक्त फरक इतकाच आहे की, त्यांच्या तंत्रामध्ये काळानुसार बदल घडून येत आहेत. या क्षेत्राची खासियत अशी आहे की, तुम्ही सहजपणे या क्षेत्रात प्रवेश करू शकता नि स्वत:च्या मेहनतीच्या बळावर यशस्वीदेखील होऊ शकता.   
सौंदर्यतज्ज्ञांचे मुख्य काम हेच असते की, तुमच्या सौंदर्याची व्यावसायिकरीत्या उत्तमपणे काळजी घेणे. मग यामध्ये वैद्यकीय व्यावसायिक तज्ज्ञांचा किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन तज्ज्ञ बनलेल्या व्यक्तींचा समावेश होत असतो. या दोघांची व्यावसायिकदृष्टय़ा नावे जरी वेगळी असली तरी दोघांच्या कामांचे स्वरूप मात्र एकसारखेच असते. फरक इतकाच असतो की, त्यांना मिळणारी पदवी आणि उपचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. वैद्यकीय सौंदर्यतज्ज्ञ (मेडिकल कॉस्मेटोलॉजिस्ट) किंवा त्वचा विशेषतज्ज्ञ (कॉस्मेटिक्स डर्मिटोलॉजिस्ट) बनण्यासाठी तुम्हाला एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डर्मिटोलॉजीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे लागते (एमडी /डिप्लोमा /डीएनबी). परंतु व्यावसायिक तज्ज्ञ बनण्यासाठी छोटे-मोठे स्वरूपाचे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. या स्वरूपाचे कोर्स करण्यासाठी वयाची १६ वष्रे पूर्ण असावी लागतात आणि दहावीपर्यंतचे शिक्षण झालेले असावे.  
यशस्वी सौंदर्यतज्ज्ञ बनण्यासाठी तुमच्याजवळ फक्त व्यावसायिक प्रशिक्षण असून भागत नाही तर तुमच्या गाठीशी योग्य तो अनुभवदेखील असावा लागतो नि हा अनुभव तुम्हाला एखाद्या चांगल्या ब्युटी सलुनमध्ये किंवा एखाद्या नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थेत काम करता करता मिळू शकतो. आजकाल सौंदर्य आणि केसांच्या संदर्भात हरप्रकारे मार्गदर्शन करणारे व कमी काळात पूर्ण होतील, असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाला अथवा करिअरला सुरुवात करू शकता. मग जसजशी आवड निर्माण होत जाईल त्यानुसार हव्या त्या प्रकारात स्पेशलायजेशन करता येते. अमेरिका-युरोपसारख्या देशांत या स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी खास परवान्याची आवश्यकता भासते, हे लक्षात घ्यावे.
व्यावसायिक सौंदर्यतज्ज्ञ म्हणून या क्षेत्रात प्रवेश करताना तुमच्या व्यावसायिक कौशल्यावर निपुणता, निर्मितीक्षम मन तसेच सर्व वयोगटातील लोकांबरोबर काम करण्याची वृत्ती असायला हवी. कारण १६ वर्षांपासून ते ६० वयोगटातील व्यक्ती तुमची ग्राहक असू शकते. त्यामुळे या प्रत्येक वयातील व्यक्तींबरोबर तुम्हाला व्यावसायिकतेने वागता आले पाहिजे. त्यातच तुम्हाला जर विविध भाषा अवगत असतील तर त्याचादेखील फायदा होतो. या जोडीने या क्षेत्रात कोणकोणते नवीन ट्रेण्डस् येत आहेत, हेदेखील पहावे आणि त्यामागील तंत्र शिकण्याचीदेखील वृत्ती जोपासावी. तुमच्या ग्राहकाचे सौंदर्य अधिक उठावदार कसे होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. या व्यवसायात वावरताना घ्यावयाची विशेष खबरदारी म्हणजे ग्राहकाला आरोग्यदायी नि स्वच्छ असे वातावरण देणे. त्याचबरोबर तुम्हीदेखील आरोग्यदृष्टय़ा निरामय असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अ‍ॅलर्जी नसावी.
हेअर स्टाईल, मॅनिक्युअर, पेडीक्युअर आणि इलेक्ट्रोलायसिस अशा विविध क्षेत्रांचा या व्यावसायिक सौंदर्यक्षेत्रामध्ये समावेश होत असतो. यापकी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही स्पेशलायजेशन करू शकतात. या क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी तुम्हाला अवगत असलेली कौशल्ये आणि व्यावसायिकता यांचा योग्य मेळ तुम्हाला घालता आला पाहिजे.
हेअर स्टाईल : हेअर स्टाईल म्हणजे केस श्ॉम्पू करणे, कलिरग, पìमग, स्ट्रेटिनग, डाय, वेगवेगळे हेअर कटस् त्याचबरोबर विग स्टायिलग आदी हरतऱ्हेच्या गोष्टींचा त्यात समावेश होत असतो. तुमचे केस आरोग्यदायी आणि आकर्षक दिसण्यासाठी केस विशेषतज्ज्ञ विविध तंत्रांचा अवलंब करीत असतात. कुठली हेअर स्टाईल शोभून दिसेल, याविषयी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात.
सौंदर्यशास्त्र : त्वचेच्या काळजी संदर्भात घ्यावे लागणारे प्रकार यात येतात. यामध्ये प्रामुख्याने फेशिअल ,मसाज ,वॅक्सिंग इ.चा समावेश होतो. याशिवाय सौंदर्यतज्ज्ञ मंडळी अ‍ॅरोमा थेरपी, स्पा थेरपी, मेकअप, लेझर उपचारपद्धती
आदी गोष्टींद्वारे उपचार करीत असतात. त्यामुळे ग्राहकाच्या त्वचेचा प्रकार ओळखून त्याला नेमकी कोणती उपचार पद्धत लागू पडेल याचा अंदाज त्यांना असायला हवा.
मॅनिक्युअर आणि पेडीक्युअर : मॅन्युअस आणि क्युरा अशा दोन शब्दांनी मिळून मॅनिक्युअर हा शब्द तयार झाला आहे. मॅन्युअस म्हणजे हात आणि क्युरा म्हणजे काळजी. थोडक्यात हात आणि नखांची नियमितपणे काळजी घेणे म्हणजे मॅनिक्युअर. हात आणि नखांची योग्य पद्धतीने स्वच्छता राखून नखांना व्यवस्थित आकार देणे, नखांवर नेल पॉलिश, नेल आर्ट करून त्यांना अधिकाधिक सुशोभित केले जाते. जशी हाताची काळजी घेतली जाते त्याच पद्धतीने पाय आणि पायाच्या नखांचीदेखील काळजी घेतली जाते, तेव्हा त्यास पेडीक्युअर असे म्हणतात.  
इलेक्ट्रोलायसिस : इलेक्ट्रोलायसिस ही अशी उपचारपद्धती आहे, ज्यात प्रामुख्याने शरीरावर नको असलेले केस एका विशिष्ट इलेक्ट्रिक पद्धतीव्दारे कायमस्वरूपी काढले जातात. यासाठी अलीकडे लेसर उपचारपद्धतीचाही अवलंब केला जातो.
आधुनिक वैद्यकीय पद्धतीवर आधारलेली मेडिकल कॉस्मेटोलॉजी ही एक विद्याशाखा आहे. या विद्याशाखेच्या तज्ज्ञांना केस, त्वचेचे विशेष ज्ञान असते.  आपले व्यावसायिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वत:चा व्यवसाय सुरूकरू शकतात किंवा एखाद्या प्रख्यात रुग्णालयात कॉस्मेटिक सर्जन, डर्मिटोलॉजिस्ट किंवा मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात. आवश्यकता भासल्यास त्यांना लहान स्वरूपाच्या शस्त्रक्रियाही कराव्या लागतात, उदा. लिपोसक्शन (म्हणजे मांडी व पोटावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यास ती विशिष्ट स्वरूपाच्या शस्त्रक्रियेव्दारे कमी करणे), शरीरावर साचलेली चरबी घटवणे किंवा रुग्णाच्या शारीरिक अवयवांमध्ये असलेली कमतरता लक्षात घेऊन त्याला योग्य तो आकार शस्त्रक्रियेने देणे, त्याचबरोबर इतर प्रक्रिया ज्या नॉन सर्जकिल प्रक्रिया म्हणून ओळखल्या जातात, उदा. रासायनिक द्रव्यांचा वापर करून त्वचेवर पीलिंगची प्रक्रिया करणे, थ्रेड लिफ्ट इ. त्यामुळे त्वचेला नवसंजीवनी मिळते.
कॉस्मेटिक कंपनी किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या उद्योगांमध्येदेखील कॉस्मेटॉलॉजिस्टसाठी उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. प्रख्यात कंपन्यांमध्ये ब्युटी एक्झिक्युटिव्ह, सौंदर्य सल्लागार किंवा सौंदर्य मार्गदर्शक
म्हणून काम करता येते. याव्यतिरिक्त कॉस्मेटिक कंपनीचे विक्री प्रतिनिधी म्हणून देखील काम मिळू शकते. मात्र, त्यासाठी प्रत्येक उत्पादनाविषयी अतिरिक्त
माहिती असणे गरजेचे असते; जेणेकरून त्या उत्पादनाचा प्रचार करताना त्यामध्ये नेमके काय उपयुक्त गुण आहेत, हे ग्राहकाला पटवून देता आले पाहिजे. तसेच त्यांना त्वचा, केस आणि नखे यांची कशी योग्य रीतीने देखभाल करावी याचे उत्तम ज्ञान असले पाहिजे.  
ब्युटी सलुन्स, स्पा, रिसोर्टस्, स्टार हॉटेल्स या ठिकाणी देखील कॉस्मेटोलॉजिस्टना व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध असतात. अनुभवी कॉस्मेटोलॉजिस्टना मेकअप आर्टस्टि किंवा हेअर स्टायलिस्ट म्हणून फॅशन इण्डस्ट्री, अ‍ॅड एजन्सी, चित्रपट ,टीव्ही आणि नाटक आदी प्रसारमाध्यमांमध्ये महत्त्वाच्या संधी उपलब्ध असतात. खासकरून या क्षेत्रांमध्ये मेकअपचे विशेष ज्ञान असणे ही खूप मोठी महत्त्वाची आणि जमेची बाजू ठरते. कारण स्टुडिओ लाईटिंगमध्ये त्या त्या कलाकारावर कोणता मेकअप ठळकपणे उठून दिसेल याची जाण असणे आवश्यक ठरते .
सौंदर्य विशेषतज्ज्ञ म्हणून व्यवसायाची निवड केल्यास ब्युटिपार्लरपासून ते मोठमोठय़ा आरामदायी ब्युटी सलूनपर्यंत विविध संधी उपलब्ध असतात किंवा पुरेसे आíथक पाठबळ असल्यास तुम्ही स्वत:चे ब्युटिपार्लरदेखील सुरू करू शकतात. जे या क्षेत्रात नव्यानेच प्रवेश करतात त्यांनी सुरुवातीला अनुभवी ब्युटिशियनच्या हाताखाली काम करावे; जेणेकरून काम करता करता अनेक व्यावसायिक गोष्टींचे त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळू शकते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही स्वत:चे ब्युटिपार्लर सुरू करू शकता किंवा स्वतंत्रपणे ग्राहक (क्लायंटस्) मिळवून, त्यांच्या घरी जाऊन आवश्यक ती सेवा उपलब्ध करू शकता. हा व्यवसाय सुरू करताना तुमच्याजवळ नेहमी उत्तम दर्जाची व आधुनिक स्वरूपाची साधने असतील, हे नेहमी लक्षात ठेवावे.  
याशिवाय, एखाद्या हेल्थ कल्बमध्ये देखील तुम्हाला सौंदर्य सल्लागार किंवा कॉस्मेटिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून देखील काम करता येईल. त्याचबरोबर नामवंत वर्तमानपत्रे, मासिक किंवा वेब साइटवरून प्रकाशित होणाऱ्या मासिकांमध्ये सौंदर्यतज्ज्ञ म्हणून स्वत:चा स्तंभ चालविता येऊ शकेल.  
या क्षेत्रामध्ये मिळणारा कामाचा मोबदला हा संस्थेच्या प्रतिष्ठेवर तसेच ती किती विस्तारलेली आहे यावर अवलंबून असतो. स्वत:चे ब्युटिपार्लर सुरू केल्यास सुरुवातीला तुम्हाला तीन ते दहा हजार रुपयांपर्यंतचा मोबदला मिळू शकतो. मेकअपतज्ज्ञ म्हणून सुरुवात केल्यास नवरीच्या मेकअपपासून ते फोटोग्राफिक मेकअपपर्यंत मिळणारा कामाचा मोबदला हा पाचशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत असतो आणि लग्नसराईच्या मोसमात मिळणाऱ्या मोबदल्यात दुपटीने वाढ होऊ शकते. मेकअप आणि हेअर ड्रेसिंग म्हणून तुम्ही अ‍ॅड एजन्सीमध्ये काम केल्यास दर दिवशी दीड हजारांपासून अडीच हजारांपर्यंत कमाई करू शकतात. याच कामासाठी मॉडेलिंगच्या क्षेत्रात मिळणारा मोबदला हा दर दिवशी ३,५०० रु. किंवा त्याहून अधिक असू शकतो. भारतात अन्नामलाई विद्यापीठामध्ये हेल्थ सायन्स हा विषय घेऊन त्याव्दारे वैद्यकीय कॉस्मेटोलॉजी (मेडिकल कॉस्मेटोलॉजी) विषयात पदव्युतर पदविका प्राप्त करता येते. याव्यतिरिक्त अशा अनेक प्रशिक्षण संस्था आहेत, ज्या त्वचा, केस आणि सौंदर्यासंदर्भात विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देतात.
अशा या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी शिक्षण आणि वयासंदर्भात अतिशय माफक अटी लागू केलेल्या असतात. या प्रशिक्षणासाठी लागणारा काळ हा तुम्ही कोणत्या स्वरूपाच्या अभ्यासक्रमाची निवड करीत आहात, त्यावर अवलंबून असतो.