अ अभ्यासाचा : नेटकं लिहिण्यासाठी.. Print

मिथिला दळवी ,सोमवार, १७ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या लेखनाच्या आघाडीवर मुलाची स्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेतले तर त्यावर उपाय योजणे सोपे जाते. त्याविषयी..
वाचन आणि लेखन हे शालेय शिक्षणाचे दोन अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. रोजच्या जगण्यात या दोन गोष्टींची आपल्याला पावलापावलावर गरज पडत असते. एका वयानंतर या गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडतात, की त्या आपण कशा शिकलो हे आपल्याला आठवतही नाही. काहींना या दोन्ही क्रिया जमून जातात, काहींना त्यासाठी सुरुवातीला थोडे प्रयास पडतात, पण काही वर्षांनी जमून जातं. पण आवर्जून काही वाचण्याकडे फारसा कल नसतो.
काहींची अभ्यासाची सुरुवात मात्र वाचन आणि लेखन या दोन्ही आघाडय़ांवर अक्षरश: झुंजत झुंजतच होते. अक्षरओळख कठीण जाते. लेखनही सहजासहजी जमत नाही. अशा मुलांना शाळेतला तोंडी अभ्यास आवडतो, खेळायला आवडतं, पण लिहिणं वाचणं नको असतं. बऱ्याच वेळा बालवर्गातला बराचसा अभ्यास लिहिणं वाचणं या स्वरूपाचा असल्यामुळे अभ्यासाबद्दल एकूणच नावड निर्माण होते. अभ्यास कसातरी उरकून टाकला जातो. लहान वर्गात हे धकून जातं, पण तिसरीपासून एकंदरच अभ्यासाचे विषय वाढतात, व्याप्ती वाढते, लिखाण वाढतं आणि अशा वेळी अभ्यास या प्रकरणाशी जुळवून घेताना त्यांची पार त्रेधातिरपीट उडते. अशा मुलांबाबत त्यांच्या आईवडिलांचीही प्रचंड तारांबळ उडते. मुळात अभ्यासाला बसण्यापासूनच घराला युद्धभूमीचं स्वरूप येतं. अभ्यास करतानाही बरीच टंगळमंगळ होते, सबबी सांगितल्या जातात आणि रोजचा गृहपाठ वेळेत संपवणंही अवघड होऊन बसतं. माध्यमिक शाळेत पोहोचेपर्यंत या प्रकाराचा अनेकदा ब्रह्मराक्षस झालेला असतो. म्हणूनच मुलाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवताना लेखन आणि वाचन या मूलभूत आघाडय़ांवर परिस्थिती काय आहे, हे तपासून पाहण्याला पर्याय नसतो.
दुर्दैवाने आज अनेक बालवर्गामध्ये मूल व्यवस्थित वाचत किंवा लिहीत नसेल तर आईवडिलांना बोलावून हे सांगण्यापलीकडे फारसं काही होत नाही. आणि त्यावर उपाय काय होतो? तर पुन्हा पुन्हा तेच तेच लिहून काढणं! मुळात ज्याला हातात पेन्सिल धरायचाच कंटाळा आहे, त्याला जास्तीतजास्त लिहायला लावलं तर त्याची प्रतिक्रिया काय असेल, हे सांगायला तज्ज्ञाची गरज नाही.
वाचनाच्या बाबतीतही असाच प्रकार होतो. पाठय़पुस्तक रोज वाचणं! हे चूक नाही, पण त्यातून बऱ्याच जणांच्या बाबतीत एक गंमत होते. वारंवार तोच तोच मजकूर वाचून पाठ होऊन जातो, म्हणून धडाधड वाचता येतो. आणि मुलाला वाचन जमलं असं समजून सगळे सुटकेचा निश्वास टाकतात. पण काही वेगळा मजकूर समोर आला की मुलांची गडबड उडते. इंग्लिशबाबत हे खासकरून होतं. म्हणूनच मुलांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेताना त्यांची वाचन लेखनाची आघाडी किती मजबूत आहे, हे पाहणं फार आवश्यक ठरतं. ‘अ अभ्यासाचा’च्या आजच्या लेखात आपण लेखन या पैलूचा विचार करणार आहोत, आणि पुढच्या लेखात वाचनाचा.
त्यासाठी एखादी व्यक्ती लिहिते तेव्हा नेमकं काय करते ते पाहूया. लिहिताना आपण अंगठा आणि तर्जनीमध्ये पेन्सिल पकडतो आणि त्या पकडीला मधल्या बोटाचा आधार देतो. ही बोटांची जुळणी कायम ठेवून आपण हात पुढे नेतो. वरकरणी फार सोप्या वाटणाऱ्या या क्रियेत मुलाच्या शारीरिक वाढीच्या प्रक्रियेतले अनेक घटक सामावलेले असतात.
प्रत्यक्ष लिहिण्यासाठी हात आणि बोटाचे स्नायू वापरले जातात, यांना फाइन मोटर (छोटे स्नायू) म्हणतात. वस्तू उचलता येणं, ओवता येणं, घडी घालणं, मळणं, कापणं, चिरणं, फाडणं, रांगोळी काढणं, निवडणं, सोलणं यांसारख्या अनेक रोजच्या जगण्यातल्या गोष्टी करताना आपल्याला या छोटय़ा स्नायूंची मदत लागते. त्यांना फाइन मोटर स्किल्स म्हणतात. प्रत्येकाची फाइन मोटर स्किल्स वेगवेगळी असतात, त्यामुळे या कामांमधला प्रत्येकाचा कौशल्याचा स्तर अर्थातच  वेगळा असतो. पण वाढत्या वयानुसार, सततच्या प्रॅक्टिसमुळे आवश्यक तेवढा स्तर कमी -अधिक वेळात प्रत्येकजण गाठतो.
मात्र लहान वयात, खासकरून बालवर्गात, या स्नायूंचा विकास नीट झाला नसेल, तर या सगळ्या कृती करणं अवघड जातं. खासकरून लेखनात फार अडचणी येतात. हे होऊ नये म्हणून अगदी बालवयापासून मूल वाढीचे टप्पे (ग्रोथ माइलस्टोन्स) नीट गाठतं आहे ना याकडे लक्ष देणं आवश्यक ठरतं. वाढीची ही एक गंमत असते. छोटय़ा स्नायूंचा विकास नीट होण्यासाठी जोडीने शरीरातल्या मोठय़ा स्नायूंचा (ग्रॉस मोटर) विकास व्हावा लागतो. म्हणजेच खांदे, दंडाचे स्नायू विकसित होण्याचा या सगळ्या फाइन मोटर स्किल्समध्ये मोठा हिस्सा असतो. आणि कंबर, नितंब आणि पाठीचे स्नायू तयार असल्याशिवाय या सगळ्या कृती करायला एका जागी बसणंही कठीण जाऊ शकतं. थोडक्यात स्नायूंची एकंदर वाढ आणि विकास या सगळ्या प्रक्रियेसाठी खूप आवश्यक असते. बाळाच्या वाढीच्या अनेक नैसर्गिक टप्प्यांमधून (उदाहरणार्थ कुशीवर वळणं, पोटावर उपडं राहणं, पुढे सरकणं, घोडा करणं, रांगणं) हा विकास होत असतो. मात्र काही कारणामुळे बाळाचे हे टप्पे हुकले, तर त्याच्या अनेक परिणामांपैकी लिखाणात त्रास होणे हा एक असू शकतो.
आज अनेक पाश्चात्य देशांमध्ये छोटी कुटुंबं, मनुष्यबळ आणि वेळेचा प्रचंड अभाव यामुळे रांगत्या मुलांकडे सतत सक्ष ठेवणं कठीण जातं. त्यासाठी मुलांनी इथंतिथं पळून उद्योग  करू नये म्हणून त्यांना वॉकर किंवा प्ले पेनमध्ये ठेवलं जातं. यातून तेवढय़ापुरती सोय होते खरी, पण ग्रॉस मोटर्सचा विकास हवा तेवढा न होण्याचा धोका राहतो. पुढे लिहिताना याचा त्रास होऊ शकतो. आज आपल्याकडेही काही महानगरांमध्ये हा प्रकार रुजू पाहतो आहे. दुर्दैवाने या बाबतीत आपल्याकडे फारशी जागरूकता दिसत नाही.
लर्निग स्टाइल्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर व्हिज्युअल मुलांची फाइन मोटर स्किल्स सहसा चांगली असतात. त्यामुळे लिखाण त्यांना अगदीच सहज जमतं. अक्षरही नेटकं वाचनीय असतं. ऑडिटरी मुलांनाही लिखाण जमतं, काहींना थोडा वेळ लागू शकतो. खासकरून तीन किंवा दोन ओळींमध्ये लिहिणं थोडं त्रासाचं वाटू शकतं, पण थोडय़ा प्रयत्नांनी हे जमतं. लिखाण सगळ्यात अवघड जातं ते केनेस्थेटिक मुलांना. त्यांची ग्रॉस मोटर स्किल्स चांगली असतात. त्यांच्या धावणं, पळणं, उडय़ा मारणं, पोहणं यात त्यांच्या उत्तम ग्रॉस मोटर स्किलचं प्रतिबिंब दिसतं. पण त्यांच्या फाइन मोटर स्किल्ससाठी बरेच प्रयत्न करावे लागू शकतात.
रोजच्या व्यवहारातल्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला बोटाचे स्नायू वापरावे लागतील, अशा कृती वारंवार करण्याने स्नायू आपल्याला सक्षम करता येतात. पण ज्यांना या गोष्टी सहज येत नाहीत त्यांना त्याचा मुळातच कंटाळा असतो. अशा मुलांना बुटाच्या नाडय़ा बांधणं, शर्टाची बटणं लावणं कठीण जात असेल, तर ते काम ती रेंगाळत कसंतरी करून टाकतात. मग घरातलं कुणीतरी मोठं माणूस त्रासून ते करून टाकतं, असंही होऊन जातं. त्यामुळे ती प्रॅक्टिस राहूनच जाते. हीच गोष्ट हाताने खाण्याबाबत होते. खरं तर एका हाताने पोळी तोडता येणं, भात कालवणं आणि न सांडता खाणं यासाठी छोटे स्नायू तयार असावे लागतात. अनेक मुलं तीन-चार वर्षांची झाली तरी स्वत:च्या हाताने खायला कंटाळा करतात, पण भरवलं तर आनंदाने खातात, यामागची एक शक्यताही असू शकते.    
कापणं, चिरणं, निवडणं, फाडणं, घडी करणं, गिरगिटणं, रेघोटय़ा ओढणं, रंगवणं अशा अनेक कृती मुलांकडून सतत करून घेणं हा त्यावर एक चांगला उपाय ठरतो. (या सगळ्यांना मिळून ‘लेखनपूर्व कौशल्य’- प्री रायटिंग स्किल्स- अशी छान संज्ञा वापरली जाते.) आपल्याकडे बहुतेक सगळ्या बालवाडय़ांमध्ये या प्रकारचे खेळ कृती मुलांना दिल्या जातात. मात्र त्या महिन्यातून फक्त एकदोनदाच होत असतील तर त्यांचं प्रमाण वाढायला हवं. आज काही शाळा छोटय़ा शिशुवर्गापासून (वय तीन ते चार) इंग्लिश अपरकेस (कॅपिटल) आणि लोअरकेस (स्मॉल) अक्षरं लिहून घेण्याबाबत आग्रही आहेत. मुळात लोअरकेस अक्षरं लिहिण्याएवढा या वयात छोटय़ा स्नायूंचा विकास सर्वसाधारणपणे या वयापर्यंत होत नाही. (अमेरिकेत मुलांचं प्रत्यक्ष लेखन पाचनंतर सुरू होतं.) पण आज ज्या मुलांना ते जमत नाही, त्यांच्याबाबत तर हे खेळ फारच महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्यासाठी या खेळाचं प्रमाण थोडं आणखी जास्त हवं.  शाळेत जमलं नाही तर निदान घरी तरी. फक्त त्याचा अतिरेकही नसावा.
आज मुलं लिहायला सुरुवात करतात ती थेट कागदावर शिसपेन्सिलीने. आपल्याकडे पूर्वी ही सुरुवात पाटीवर दुधी पेन्सिलीने व्हायची. शिसपेन्सिल पकडायला दुधी पेन्सिल किंवा खडूपेक्षा जास्त नेमकी पकड लागते, अर्थातच त्यासाठी छोटे स्नायू आणखी तयार असावे लागतात. त्यामुळेही लिहितानाचा त्रास वाढू शकतो. म्हणून लिखाणाची सुरुवात खडू, दुधी पेन्सिल, क्रेयॉन्सचा, जाडी चारकोल पेन्सिल (किंवा अगदी कोळशाचा तुकडाही) वापरून केली तर थोडं सोपं जातं. आज बहुतेक बालवर्गामधून लिखाणाची सुरुवात उभ्या, आडव्या, तिरप्या रेघा आणि मग वक्राकार (कव्‍‌र्ह्ज) काढून होते. हे योग्य आहे, पण या प्रकाराची प्रॅक्टिस प्रत्येकाला किती आवश्यक आहे, याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. काहींना असा खूप सराव लागतो. अशांच्या आईवडिलांना त्याबाबत जास्त जागृत राहणं आवश्यक असतं.
कोऱ्या कागदावर सुटी अक्षरं लिहिणं ते दुरेघी किंवा तिरेघी ओळींमध्ये नेमकं लिहिणं, हाही या प्रवासातला एक मोठा मैलाचा दगड असतो. त्यासाठी डोळे आणि हाताचा नेमका समन्वय (हॅण्ड-आय कोऑर्डिनेशन) साधता यावा लागतो. एखादं काम करण्यासाठी जे दिसतं आहे (व्हिज्युअल क्लू), त्यानुसार हाताची योग्य हालचाल करता येणं म्हणजे हा समन्वय. एकाने फेकलेला बॉल पकडण्यासाठी तो कुठवर जाईल याचा कॅच पकडणाऱ्याला अंदाज असावा लागतो. बॉल कसा येईल या अदमासाने हाताची ओंजळ करून तयार असणं यातही हॅण्ड-आय कोऑर्डिनेशन काम करत असतं. बुटात लेस घालताना एखाद्या भोकातून ती आतल्या बाजूने बाहेर काढावी लागते. त्यासाठी लागणारा अंदाजही याचाच भाग आहे. इथेही हे कोऑर्डिनेशन जमत नसेल, तर त्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. आणि त्यात मुलांना शिक्षक आणि आईबाबांची खूप मोठय़ा प्रमाणावर मदत लागते.
मूळात ज्यांना ही कौशल्यं चांगली जमत नाहीत, त्यांच्याकडून ती करून घेणं हे मोठय़ांसाठी फार परीक्षा पाहणारं असू शकतं. त्यांच्या कलाने घेत घेत ते करायला प्रचंड पेशन्सही लागतात. इतक्या लहान मुलांचं खेळाबागडायचं वय असताना हे सगळं काय त्यांच्या मागे लावायचं असं अनेकांना वाटतं. पण हे करण्यावाचून पर्याय नसतो. फक्त मुलांना रमवत टप्प्याटप्प्याने ते करून घेतलं तर मुलांवरही त्याचा ताण येत नाही आणि पुढच्या अभ्यासासाठीचा रस्ताही सुकर होऊन जातो.