खेळ की अभ्यास? ; क्रीडापटूंचे तळ्यात-मळ्यात Print

प्रशांत केणी ,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

उगवत्या क्रीडापटूला करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी विविध क्षेत्रांनी पुढाकार घेतला आणि शिक्षणक्षेत्रानेही खेळाडूंकडे काहीसे सौहार्दाने पाहिले, तर खेळाडूंची कारकीर्द फुलायला अधिक मदत होईल. युवा विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद याच्या महाविद्यालयीन उपस्थितीबद्दल निर्माण झालेल्या वादंगाच्या निमित्ताने..
कुठल्या ना कुठल्या खेळात शालेय, जिल्हा अगदी राज्यस्तरीय पातळीवर चमकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाविषयी सतत धाकधूक असते. मैदानावर स्पर्धक खेळाडूचा फडशा पाडणारे हे विद्यार्थी परीक्षा आठवली की बेचैन होतात. खेळाची प्रॅक्टिस करताना आपल्या शाळा-कॉलेजच्या उपस्थितीचे काय होणार, या विचाराने कातावतात. खेळात कितीही नैपुण्य दाखवलं तरी ‘अभ्यासाकडे जरा लक्ष दे, खेळ कमी कर.. हा खेळ नाही पुरणार आहे आयुष्याला’ या आई-बाबांच्या, शिक्षकांच्या दटावणीने हिरमुसतात.. खरंच ज्याच्यावर आपण जीव तोडून प्रेम करतो त्या खेळात पुढे सरकता येईल, की जिल्हा, राज्य, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय यापैकी कुठल्या ना कुठल्या निवडीच्या टप्प्यातील स्पर्धेत फेकले जाऊ आपण कुठेतरी, असं या उगवत्या खेळाडूंच्या मनात सतत फेर घालत असतो.
संघात निवड होताना गुणवत्ता हा एकच निकष असतो का, हा प्रश्न या उगवत्या खेळाडूंच्या मनात जरा लवकरच पडायला लागला आहे. कुठल्या ना कुठल्या स्तरावर त्यांना निवडीच्या बाबत पारदर्शकता दिसलेली नसते, हे यामागचे कारण आहे आणि मग इतक्या जीवापाड केलेल्या मेहनतीनंतर खरेच आपण क्रीडासंघात स्थान मिळवू शकू का, याबद्दलचा त्यांचा आत्मविश्वास डळमळायला लागतोय. त्याचवेळी  दुसरीकडे खेळाच्या बळावर समाजाचे आयकॉन बनलेल्या, भरपूर पैसा कमावणाऱ्या खेळाडूंची उदाहरणेही त्यांच्या डोळ्यांसमोर आहेत. अशा वेळेस खेळात चमकणारे विद्यार्थी दहावीच्या स्तरावर पोहोचले की, त्याच्या मनात करिअर निवडीबद्दल तळ्यात - मळ्यात सुरू होते. स्वत:च्याच मनात इतके प्रश्न असताना घरी, शाळा- कॉलेजमध्ये त्यांचा अभ्यास, उपस्थितीच्या तक्रारींचा पाढा सतत वाचला जात असतो. दोन्ही दगडांवर पाय किती दिवस ठेवणार, या कात्रीत तो पुरता हैराण होतो.
सध्या क्रीडापटूंसाठी शाळा-महाविद्यालयांतील उपस्थिती आणि क्रमिक शिक्षणाची आवश्यकता हे दोन मुद्दे ऐरणीवर आले आहेत. याविषयीची चर्चा सुरू झाली, ती युवा विश्वचषक जिंकून दाखवण्याची किमया साधणाऱ्या दोन हरहुन्नरी क्रिकेटपटूंमुळे. यातील एक म्हणजे अंतिम सामन्यात बिकट प्रसंगी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत भारताला विश्वचषक जिंकून देणारा कप्तान उन्मुक्त चंद आणि दुसरा आहे जालन्यासारख्या छोटय़ाशा जिल्ह्य़ातून आलेला विजय झोल.
या दोघांची शैक्षणिक कहाणी विचार करण्याजोगी आहे. क्रिकेट जगतात कोडकौतुक झालेल्या उन्मुक्तने  हजेरीपटावर ३३.३३ टक्के उपस्थितीची अट पूर्ण केली नाही, म्हणून तो शिकत असलेल्यासेंट स्टीफन महाविद्यालयातील प्राचार्यानीप्रथम वर्ष कला शाखेच्या परीक्षेला बसण्यास मज्जाव केला. उन्मुक्त हा जितका मैदानावर तरबेज आहे तितकाच अभ्यासातही आघाडीवर आहे. मागील वर्षी बारावीला ७४ टक्क्यांनी उत्तीर्ण होणाऱ्या उन्मुक्तला या निर्णयाचा फटका बसून त्याचे वर्ष वाया जाणार, या भीतीपोटी त्याच्या पालकांनी महाविद्यालयाला कोर्टात खेचले. परंतु अनेक क्रिकेटपटू, केंद्रीय मंत्री अजय माकेन आदी मंडळींनी उन्मुक्तची बाजू पोटतिडकीने लावून धरल्यामुळे या मुद्दय़ाची जोरदार चर्चा सुरू झाली आणि उन्मुक्तचे शैक्षणिक वर्ष वाचले.
‘क्रिकेट हाच माझा क्रमिक अभ्यासक्रम,’ असं मानणाऱ्या विजय झोलने नववीत असताना शाळा सोडली. त्याच्या या निर्णयाला व्यवसायाने वकील असलेल्या त्याच्या वडिलांची हरी झोल यांचा पूर्ण पाठिंबा होता. आज विजय आपल्या कामगिरीमुळे क्रीडाक्षेत्रात चमकतोय. क्रमिक शिक्षणाशिवाय व्यक्तीचा विकास अडतोच, असे नाही, हे त्याने सिद्ध केले आहे.
एका वृत्तवाहिनीवर उन्मुक्तला काही दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘खरोखरच एखाद्या क्रिकेटपटूला शैक्षणिक पदवी संपादन करण्याची आवश्यकता असावी का? खेळाडूंच्या लेखी शैक्षणिक पदवीचे महत्त्व किती असते?’ त्यावर उन्मुक्तने फार छान उत्तर दिले. तो म्हणाला, ‘हा त्या खेळाडूचा व्यक्तिगत प्रश्न आहे. प्रत्येक खेळाडूने पदवी संपादन करायलाच हवी, असा काही नियम वा अट नाही. मात्र, एखाद्याला पदवीपर्यंत शिक्षण घ्यायचे असेल, तर त्याने त्यासाठी प्रयत्न करावा आणि जर त्याला पदवी घ्यायची नसेल, तर तो त्याचा निर्णय असेल. मला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. मला क्रमिक शिक्षण महत्त्वाचे वाटते!’ अशावेळी प्रश्न येतो तो असा की, शिक्षणाची आस्था असलेल्या या क्रीडापटूच्या वर्गातील उपस्थितीबाबत इतर विद्यार्थ्यांसारखाच निकष लावणे योग्य ठरेल का? या समस्येचे निराकरण करण्यासाठी क्रीडापटूंसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आणि क्रीडाशाळा  (स्पोर्ट्स स्कूल) असाव्यात, हा मुद्दा पुढे येत आहे.
विजयचे वडील हरी झोल यांनी काही वर्षांपूर्वी मुलाला ‘तू क्रिकेट हेच शिक्षण मान आणि त्याचेच प्रशिक्षण घे,’ असा सल्ला मुलाला दिला. याविषयी ते सांगतात, ‘आपल्याकडील पठडीतल्या शिक्षणाचा फोलपणा मला जाणवला होता. क्रमिक  शिक्षणाला अवास्तव महत्त्व द्यावेसे मला वाटत नाही. त्यापेक्षा वाचन मग ते क्रमिक शिक्षणापलीकडेही असावे, या मताचा मी आहे. माझा मुलगा विजय हा अभ्यासात मागे नसायचा. मात्र खेळात त्याची प्रगती अधिक सरस होती. त्यामुळे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेणे आम्हांला फार अवघड गेले नाही. विजयने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विजय जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळत होता. त्यावेळेस विजय भारतीय युवा संघात स्थान मिळवेल, असे आमच्या कुणाच्या मनातही नव्हते. मात्र त्याने निवडीचा एकेक टप्पा पार केला आणि आमचा विजय क्रिकेटपटू म्हणून नावारूपाला येऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली. मात्र नाबाद ४५१ धावा केल्याने वा युवा विश्वचषक जिंकल्याने  तुमचे हात आभाळाला पोहोचले असे समजण्याचे कुठल्याही खेळाडूला काही कारण नाही, कारण मैदानात खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक मॅचमध्ये खेळाडूला कामगिरी करून दाखवणे आवश्यक ठरते.’ आपला मुद्दा स्पष्ट करताना झोल म्हणाले, ‘दहावीपर्यंतचे शिक्षण सर्वानीच घ्यावे. मात्र पुढे विद्याशाखा निवडून घेण्यात येणाऱ्या क्रमिक शिक्षणाचा व्यवहारात कितीसा उपयोग होतो? मी वकिलीचा अभ्यासक्रम केला, पण प्रत्यक्षात खटले चालवताना या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग अल्पच होतो.  म्हणूनच व्यक्तीनुरूप शिक्षणरचना महत्त्वाची ठरते. माझ्या मते, क्रीडापटूंसाठी विषयांची संख्या कमी असावी आणि त्या शिक्षणाची व्यावहारिक उपयुक्तता असावी. म्हणूनच व्यक्तीनुरूप शिक्षणरचना महत्त्वाची ठरते.’
आपल्या देशात खेळाडूंसाठी विशेष अभ्यासक्रमाची रचना करण्याची आवश्यकता आहे, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि प्रशिक्षक राजू भावसार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘समजा, एखाद्या खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आपण दुसरी ते पाचवी या इयत्तेतील पाच विद्यार्थ्यांची निवड केली. या पाचजणांनी सारखीच मेहनत घेतली आणि खेळासाठी सारखाच वेळ दिला. परंतु यापैकी फक्त एकातच विशेष ‘स्पार्क’ दिसून येतो आणि मग तो आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतो. याचे कारण असे की, त्याच्यातील नैसर्गिक गुणवत्ता उत्तम होती. पण मग बाकीच्या चौघाचं काय? आज खेळाडूंसाठी समतोल अभ्यासक्रम तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण तो खेळाडू म्हणून चमकलाच नाही तरी पुढे त्याचा चरितार्थ चालण्यासाठी ते शिक्षण त्याला उपयोगी येऊ शकते. मला आठवते की, विजय अमृतराज यांनी एक टेनिस अकादमी सुरू केली होती. जिथे टेनिस हा प्रमुख विषय होता. त्यासमवेत शारीरिक शिक्षण आणि अन्यही विषय शिकवले जायचे. आपल्या देशात आजही क्रीडा हे करिअर होऊ शकत नाही. याचे कारण आपल्या मुलाला खेळात घातले तर त्याला पैसा कमवण्याची अडचण येणार नाही, ही हमी पालकांना मिळायला हवी. शाळा-महाविद्यालयातील उपस्थितीचा मुद्दा म्हणाल तर उपस्थितीचे नियम खेळाडूंसाठी सैलावायला हवेत. कारण ते सरावात व्यग्र असतात.’’ केवळ क्रिकेटपटूंची समस्या झाली, म्हणून हा प्रश्न चर्चेत आला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘‘खरे तर ही सकारात्मक गोष्ट म्हणायला हवी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा मुद्दा लावून धरल्यामुळे या खेळाडूंच्या शिक्षणाविषयी येणाऱ्या अडचणींची दखल घ्यावी लागली. आजमितीस क्रिकेटपटू अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नाही पोहोचला तरी त्याचा उदरनिर्वाह सहज चालू शकतो, ही हमी सुदैवाने क्रिकेट हा खेळ देतो. कबड्डीमध्ये आमच्या विश्वविजेत्या, आशियाई विजेत्या खेळाडूंचीही ओळख करून द्यावी लागते.’’
खेळाडूंचा अभ्यास आणि त्यांची वर्गातील उपस्थिती याबाबत बोलताना शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका विभावरी दामले यांनी सांगितले की, ‘‘उन्मुक्तचे उदाहरण अपवादात्मक असू शकते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य ठरते, तर खेळाडूंना ३३.३३ टक्के हजेरीचे बंधन असते. वर्गातील उपस्थितीबाबत आधीच विद्यार्थ्यांना भरपूर सवलत देण्यात आली आहे. हे बंधन नसते, तर खेळाच्या नावाखाली काही खेळाडूंनी त्याचा गैरफायदाही घेतला असता.  पालकांबाबत म्हणाल तर त्यांना केवळ त्यांचा मुलगा मैदानावर गेला आहे, इतकेच ठाऊक असते. पण प्रत्यक्षात तो काय करतोय, याची फारशी कल्पना नसते आणि मग तो चांगला खेळाडूही बनत नाही किंवा शाळेत हजर राहून अभ्यासातही रमत नाही. यासाठी प्रशिक्षकाने त्याचा खेळ आणि शाळा यांच्यातील दुवा बनणे आवश्यक आहे.
या संदर्भात प्रशिक्षकाची भूमिका स्पष्ट करताना दामले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमधील क्रीडाविषयक गुणवत्ता जोखून प्रशिक्षकाने त्यासंदर्भात शाळेला योग्य कल्पना द्यावी. शारदाश्रम शाळेत खेळाडूंची योग्य काळजी घेतली जाते. आपल्याकडे आजही क्रमिक शिक्षणाला प्रचंड महत्त्व दिलं जातं. एखादा विद्यार्थी जो चित्रकला किंवा संगीतामध्ये अव्वल असतो, त्याला अभ्यासक्रमातील काही विषय तितक्याच ताकदीने जमतीलच, असे नाही. वर्गात असेही काही विद्यार्थी असतात जे शारीरिक शिक्षणाच्या तासालाही खेळायचे टाळतात. अभ्यास करण्यातच ते धन्यता मानतात. त्याऐवजी विद्यार्थ्यांला विषय निवडण्याची संधी मिळायला हवी आणि त्या विषयाच्या परीक्षेतील गुण ध्यानात घ्यायला हवेत. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अन्य गुणांचाही कस लागेल.’’
गतवर्षी भारताला कबड्डीमधील पहिलावहिला विश्वचषक जिंकून दाखवण्याची किमया साधणाऱ्या संघात नवी मुंबईच्या अभिलाषा म्हात्रे हिचा समावेश होता. ‘खेळाडू म्हणजे ‘ढ’ असंच सर्वाना वाटत असतं. पण आम्हाला खेळायचं आहे आणि अभ्यासही करायचा आहे. इतर विद्यार्थ्यांसारखं आम्हांला नियमित वर्गात बसता येत नाही, पण आम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो,’ असं तिचं म्हणणं आहे. शिवछत्रपती पुरस्कार जिंकणारी कबड्डीपटू राजश्री पवार हिने एम.कॉम.च्या परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. तिने सांगितलं की, भारतीय कबड्डी संघाचे शिबीर आणि भारतीय रेल्वेचे शिबीर यातच माझे मागील शैक्षणिक वर्ष खर्ची गेले आणि मार्च महिन्यात विश्वचषक  स्पर्धा खेळून आले आणि समोर पदवी परीक्षा होती. पण त्यामुळे मला परीक्षेला मुकावे लागले. बऱ्याचदा तर आमच्या महत्त्वाच्या स्पर्धा आणि परीक्षा यांचा मोसम एकत्रच बहरतो. त्यामुळे माझ्या आयुष्यातील तीन शैक्षणिक वष्रे वाया गेली आहेत.’
खेळाडूंना हजेरीच्या मर्यादा असाव्यात किंवा नसाव्यात याबाबतही दुमत आहे. मात्र खेळ हेच करिअर आहे, याचा निर्वाळा आजचे उगवते खेळाडूही देऊ शकत नाहीत. घवघवीत यश मिळवल्याखेरीज त्या खेळाडूला स्ट्रगल पिरिअडला सामोरे जावे लागते. खेळाडूला पोट भरण्यासाठी तो खेळ पुरेसा आहे, याची जोवर खात्री पटत नाही, तोवर आपल्या मुलाने क्रीडाक्षेत्राला करिअर म्हणून स्वीकार करायला पालक थोडे कच खाणे स्वाभाविक आहे.. अशा वेळेस क्रीडापटूला करिअरच्या संधी मिळाव्यात, यासाठी विविध क्षेत्रांनी पुढाकार घेतला आणि शिक्षणक्षेत्रानेही खेळाडूंकडे काहीसे सौहार्दाने पाहिले, तर खेळाडूंची कारकीर्द फुलायला अधिक मदत होईल.