पुस्तकाचा कोपरा Print

प्रतिनिधी ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
एका सृजन-आनंदाचा प्रवास
alt

अभिनव संकल्पना राबवून बालशिक्षणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या लीलाताई पाटील यांच्या या ‘सृजन’ प्रवासाची कहाणी ‘प्रवास ध्यासाचा.. आनंद सृजनाचा’ या पुस्तकात मांडली आहे. मुलांच्या घडणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील अशा संकल्पनांना शाळेच्या उपक्रमात अग्रक्रम देणे, भोवतालच्या घटना मुलांना समजावून सांगणे, मुलांचे सामुदायिकरीत्या वाढदिवस साजरे करणे, प्रयोगशील सृजन-आनंद शाळेचा प्रवास कसा सुरू झाला, हे या पुस्तकात सांगितले आहे. हे पुस्तक लीलाताईंनी वयाच्या ८४व्या वर्षी लिहिले आहे, हा या पुस्तकाचा आणखी एक विशेष! यात सृजन-आनंद विद्यालयाचा २२ वर्षांचा प्रवास, त्यातील खाचखळगे, आनंद आणि समाधान, परिस्थितीशी द्यावी लागलेली टक्कर आणि तरीही शाळेने प्रयोगशील विद्यालय म्हणून कमावलेले नाव या सर्व टप्प्यांची माहिती वाचकाला होत जाते. हे पुस्तक लिहिताना २६ वर्षांपूर्वीच्या शाळेतील अध्यापन नोंदवह्य़ांची मोठी मदत झाली. अध्यापनाचे विविध प्रयोग जे सृजन-आनंदमध्ये राबविण्यात आले, ते तपशीलवार मांडण्यामागे प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात ज्यांची प्रयोगशील काम करण्याची इच्छा आहे, त्यांना सृजन-आनंद विद्यालयाच्या प्रवासाची ओळख व्हावी, अशी लीलाताईंची भूमिका होती. या पुस्तकात त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा विविध अंगांनी विचार केला आहे.
यात शिक्षण-प्रशिक्षण : संकल्पना आणि वास्तव, साप्ताहिक आणि वार्षिक शिक्षकसभा, कृतिवेध परिसंवाद, मी पासून आपणपर्यंत नेणारा सामुदायिक वाढदिवस, विज्ञान अध्यापन कार्यशाळा, प्राथमिक शाळेतील मुले जलसाक्षर होतात!, शिक्षणजत्रा, शिक्षकांचे अहवाल, विकासाची अकल्पित संधी, सकस अध्यापन, शिक्षणाचा नवा युगधर्म अशा विविध विषयांवरील लिखाणाचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
प्रवास ध्यासाचा.. आनंद सृजनाचा - लीला पाटील, उन्मेष प्रकाशन, पृष्ठे- ३१९, मूल्य - २८० रु.

सकारात्मक पालकत्वाविषयी..
alt
मुलाला वाढवताना पदोपदी पालकांना असंख्य प्रश्न पडत असतात. मुलांशी वागताना पालकांची भूमिका नेमकी कशी असावी, याबाबत ते द्विधा मन:स्थितीत असतात. अशा प्रसंगांना कसे सामोरे जावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन ‘मुलांच्या रोजच्या समस्यांना सामोरे जाताना..’ या पुस्तकात करण्यात आले आहे. यात पालकत्व निभावताना दैनंदिन समस्यांना कसे सामोरे जावे, याचा सकारात्मक अंगाने विचार करण्यात आला आहे. पालक हे मुलांच्या जडणघडणीत आणि मुलांच्या आयुष्यात चांगले परिणाम घडवू शकतात, या भूमिकेतून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. मुलांच्या घडणीसाठी लागणारी उत्तम आणि परिणामकारक आयुधं देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने लेखिकेने केला आहे. यात मला पुस्तकांचा तिटकारा आहे- टीव्हीच्या आहारी वाचनावर आणि शिकण्यावर होणारे आघात, चुकीची शिकण्या-शिकवण्याची पद्धत आणि मुलांवर सतत ओरडल्यने ‘मी मठ्ठ आहे’ असा मुलांचा होणारा समज, मंदगतीने काम करण्याची पद्धत, चालढकल करण्याची पद्धत, अनुत्साह, शाळेविषयीच्या भयगंडाशी सामना, उपाशी पोटाचा उपाशी मनाशी असलेला संबंध, भीती, लक्ष वेधून घेण्याची वृत्ती, आक्रमकता, उद्धटपणा, चंगळवादाच्या विळख्यात सापडलेली मुलं, भावंडांमधील स्पर्धा, चुकांची जबाबदारी टाळणं, समूहात बोलण्याची भीती, झोपेची समस्या, शिस्त, शिक्षा, खाण्याचा विकार, शारीरिक शिक्षेचा आघात, पराभवाची भीती, सतत अटी घालणे, मुलांमधली दादागिरी अशा नेहमी सामना कराव्या लागणाऱ्या मुलांच्या भावना व वर्तनाबाबत या पुस्तकात स्वतंत्र प्रकरणे आहेत.
‘मुलांच्या रोजच्या समस्यांना सामोरे जाताना..’ - निवेदिता, डॉ. वृंदा चापेकर, पृष्ठे - १६४, मूल्य - १५० रु.

अडथळ्यांवर मात करणारी नवी संकल्पना
alt
‘विनिंग’ या बेस्ट सेलरची सहलेखिका असलेल्या सुझी वेल्श यांनी हे पुस्तक लिहिले आहे. १०-१०-१० म्हणजे नेमके काय, तर आयुष्यातील अनेक अडथळ्यांवर योग्य मार्ग दाखवणारी एक नवी संकल्पना आहे. १०-१०-१०ची परिणामकारकता लहानमोठय़ा, नेहमीच्या आणि अपवादात्मक अतिमहत्त्वाच्या निर्णयात दिसून येते, असे लेखिकेचे म्हणणे आहे. कोणताही निर्णय घेताना त्याचे १० मिनिटे, १० महिने आणि १० वर्षे या परिमाणामध्ये विभाजन करण्याचे सोपे सूत्र या पुस्तकात मांडले आहे. कुठलीही समस्या असो वा निर्णय असो, १०-१०-१०चे तत्त्व मार्गदर्शक कसे राहील, याचा तंत्रशुद्ध विचार या पुस्तकात मांडण्यात आला आहे. यात तुमच्या बुद्धीतील १०-१०-१० हे समीकरण कामात प्रतिष्ठा कशी मिळवावी, करिअरची आखणी कशी करावी, पालकत्वात तुमच्या साथीला हे तत्त्व कसं येऊ शकतं, मैत्री आणि जीवनचक्र यात कसे वापरता येते, याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. कुठल्याही बाबतीत निर्णय घेताना १०-१०-१० ही संकल्पना कशी लाभदायक ठरू शकते, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.
१०-१०-१० : जीवन बदलून टाकणारी संकल्पना, मूळ लेखिका- सुझी वेल्श, अनुवाद- विदुला टोकेकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे- १६८, मूल्य- १६० रु.

स्वत:ला सादर कसे कराल?
alt
नोकरीसाठीचा अर्ज कसा लिहाल, स्पर्धापरीक्षेसाठी समूहचर्चेची तयारी कशी कराल, मुलाखतीच्या वेळेस शिष्टाचार कसे पाळाल, याची नेटकी माहिती इंटरव्ह्य़ू टेक्निक्स आणि प्रेझेन्टेशन स्किल्स या पुस्तकात देण्यात आली आहे. मुलाखतीच्या वेळेस विविध प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी, तुमची देहबोली कशी असावी, याचाही साधकबाधक विचार यात मांडला आहे. मुलाखत का घेतली जाते? त्यात विचारले जाणारे प्रश्न, बायोडेटा कसा लिहावा, देहबोली याविषयी स्वतंत्र प्रकरण अंतर्भूत करण्यात आले आहे. बायोडेटा या प्रकरणात त्याचे महत्त्व, लिहिताना घ्यावयाची काळजी, त्यात द्यावयाचा तपशील- शैक्षणिक माहिती व कामाचा अनुभव याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. देहबोली या प्रकरणात देहबोली म्हणजे नेमके काय, मुलाखतीत देहबोली कशी महत्त्वाची ठरते, देहबोली सुधारण्यासाठी कुठल्या बाबींचा विचार करावा हे सांगितले आहे.
इंटरव्ह्य़ू टेक्निक्स आणि प्रेझेन्टेशन स्किल्स- अरुणा कौलगुड, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे- ८४, मूल्य- ९५ रु.

जमलं ७ तर = गणित
alt
या पुस्तकात गणित या विषयाबद्दल वाटणारी अनावश्यक भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात परंपरागत कोडी, कूट प्रश्नांद्वारे गणितात स्वारस्य निर्माण होते, हे सोदाहरण सांगितले आहे. गणितातील प्रत्येक प्रश्न हे आपण एक कोडे मानले तर हा विषय नक्कीच रंजक होईल, असा विश्वास लेखकाला वाटतो. गणिती प्रश्न सोडवताना मुलांना येणारी मजा, संख्या आणि अंकांशी त्यांचे खेळणे हे सारे गणित या विषयात गती मिळण्याकरिता कसे महत्त्वाचे ठरते, हे लेखकाने यात सांगितले आहे. या पुस्तकात अक्षरे टाकू कोडय़ात, सोडवून तर पाहा, थोडी कोडी- थोडी गंमत अशी वेगवेगळी प्रकरणे अंतर्भूत करण्यात आली आहेत.
जमलं ७ तर = गणित- भास भामरे, परममित्र पब्लिकेशन्स, पृष्ठे- १०४, किंमत- १५० रु.

ई-शासनाची रूपरेषा
alt
ई-प्रश्नांची सखोल माहिती, त्यात सामील होणारे नवे जागतिक प्रवाह याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. संगणक शाखेतील विद्यार्थ्यांर्ना ई-प्रशासन संकल्पनेत प्रकल्प आणि करिअर करण्यासाठी या माहितीचा वापर होऊ शकेल. या पुस्तकात संगणकांचा दैनंदिन जीवनातील अविभाज्य शिरकाव, ई-शासनाची गरज आणि संकल्पना, ई-शासनपद्धतीचे इतर देशांतील चित्र, ई-शासन : आपण कुठे आहोत, ई-शासन प्रकल्पांची रूपरेषा कशी ठरते, प्रकल्पांची तांत्रिक अंमलबजावणी कशी होते, ई-शासनामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सुलभ होणारे दैनंदिन व्यवहार, शेतकऱ्यांना होणारे फायदे, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना होणारे लाभ, ई-शासनामुळे सुलभ होणारे व्यवहार अशा विविध प्रकारची माहिती या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आली आहे.
ई-गव्हर्नन्स- डॉ. दीपक शिकारपूर, पृष्ठे- ८६, मूल्य- रु. १२५.

यश मिळविण्यासाठी..
alt
काही गोष्टी आत्मसात करून आयुष्यात छोटे-मोठे यश प्राप्त करू शकतो खरे; मात्र जीवनाचे उत्तुंग ध्येय साध्य करण्यासाठी खडतर मार्गावरून वाटचाल करावी लागते. शॉर्टकट न अवलंबता सातत्यपूर्ण मेहनतीद्वारे यशाच्या दिशेने मार्गक्रमण कसे करावे, हे रणजित लिखित ‘यशाचे खडतर मार्ग’ या पुस्तकात सांगितले आहे. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करताना सकारात्मक विचारांची आवश्यकता कशी असते, हेही या पुस्तकात कथन केले आहे. सकारात्मक दृष्टिकोनामुळे यश मिळवण्याचे विविध मार्ग सुचतात आणि आत्मविश्वास दुणावतो, असे लेखकाचे म्हणणे आहे. यश मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्या वयाचे आहात हा मुद्दा गौण ठरत असल्याचेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. उद्दिष्ट ठरवताना ते गाठता येऊ शकेल, असे असावे, याकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे आणि ध्येय वास्तवदर्शी असावे आणि त्यासाठी योग्य तयारीही असावी, असेही पुस्तकात म्हटले आहे. निश्चय, भीतीवर मात, वेळेचे व्यवस्थापन, कामाबाबत आत्मीयता, स्पर्धेला सामोरे जाताना, खिलाडूवृत्ती, स्वओळख, संभाषण चातुर्य, संतापाला आवर, संधींचा शोध या मुद्दय़ांवरही भर देण्यात आला आहे.
यशाचे खडतर मार्ग- रणजित, अरविंद प्रकाशन, पृष्ठे- १३६, किंमत- १४० रु.